पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते जैसलमेर येथील डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये 2 नर माळढोक पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले


​​​​​​​शास्त्रज्ञ, संशोधक आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या जवळपास दशकभराच्या अविरत समर्पणाचे हे महत्त्वपूर्ण फलित : भूपेंद्र यादव

Posted On: 04 OCT 2026 11:33AM by PIB Mumbai

विलुप्तीच्या अतिशय गंभीर धोक्यात असलेल्या माळढोक पक्ष्याच्या (जीआयबी) संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज राजस्थानातील जैसलमेर येथील डेझर्ट नॅशनल पार्कमधील साम येथे 2 नर माळढोक पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. राजस्थानचे वन आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय शर्मा तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘एक्स’वरील आपल्या संदेशामध्ये श्री. यादव यांनी माळढोक पक्षी तसेच इतर प्रजातींच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक समुदायाला कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पाठबळ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

मंत्री म्हणाले की, राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात माळढोक पक्ष्याची संख्या पुन्हा वाढण्यास मदत करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञ, संशोधक आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी जवळपास दशकभर केलेल्या अविरत समर्पणाचे हे महत्त्वपूर्ण फलित आहे.

या माळढोक पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या उपक्रमामुळे भारताच्या माळढोक संवर्धन कार्यक्रमात संवर्धन प्रजननाच्या माध्यमातून सक्षम आणि व्यवहार्य संख्या निर्माण करण्यापासून या प्रजातीला पुन्हा नैसर्गिक अधिवासात प्रस्थापित करण्याच्या आणि तिची संख्या नैसर्गिक अधिवासात वाढवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण संक्रमण झाले आहे. या पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या अनुभवांचा उपयोग पुढील टप्प्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या पक्ष्यांसाठीच्या कार्यपद्धती अधिकाधिक प्रभावी करण्यासाठी केला जाईल.

माळढोक पुनर्वसन कार्यक्रम हा पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, राजस्थान वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थान यांचा संयुक्त उपक्रम आहे. या कार्यक्रमाला इंटरनॅशनल फंड फॉर हौबारा कॉन्झर्व्हेशनचे तांत्रिक सहकार्य आणि राष्ट्रीय प्रतिपूरक वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणाकडून आर्थिक सहाय्य मिळत आहे. या कार्यक्रमाचा भर संवर्धनासाठी प्रजनन, अधिवास व्यवस्थापन, धोक्यांचे निर्मूलन, अधिवास पुनर्स्थापना आणि समुदायाचा सहभाग यावर आहे.

संवर्धनासाठी प्रजनन कार्यक्रमात लक्षणीय प्रगती झाली आहे. सॅम आणि रामदेवरा येथील ग्रेट इंडियन बस्टर्ड (जीआयबी) केंद्रांमध्ये सध्या 97 पक्षी आहेत. यापैकी 40 पक्षी जंगलात घातलेल्या अंड्यांमधून मिळाले आहेत, तर 57 पक्ष्यांची बंदिस्त वातावरणात पैदास करण्यात आली आहे. यापैकी 86 पक्ष्यांची बंदिस्त प्रजननासाठी देखभाल केली जात आहे, तर 11 पक्ष्यांना जंगलात सोडण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. या 11 पक्ष्यांपैकी 2 पक्ष्यांना आज डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये जंगलात सोडण्यात आले. बंदिस्त वातावरणातील प्रजननातून 2025 मध्ये 24 जिवंत पिल्ले, तर 2026 मध्ये 29 पिल्ले जन्माला आली.

‘जंपस्टार्ट’ या नाविन्यपूर्ण पद्धतीसह वैज्ञानिक हस्तक्षेपांनीही या प्रजातीच्या पुनर्वसनाला हातभार लावला आहे. या पद्धतीअंतर्गत, जंगलातील घरट्यांमध्ये ठेवण्यात आलेली बंदिस्त वातावरणात घातलेली अंडी उबवणाऱ्या मादी पक्ष्यांनी स्वीकारली. परिणामी, राजस्थानमध्ये सहा आणि गुजरातमध्ये दोन पिल्ले उबवण्यात यश आले.

राजस्थान वन विभागाकडून अधिवास पुनर्स्थापनेच्या माध्यमातून या प्रयत्नांना आणखी बळ दिले जात आहे. यामध्ये डेझर्ट नॅशनल पार्कच्या परिसरात सुमारे 200 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या कुंपणयुक्त गवताळ प्रदेशांची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय वन्यजीव संस्थानने केलेल्या दीर्घकालीन टेलिमेट्री अभ्यासातून हे कुंपणयुक्त क्षेत्र या प्रजातीच्या प्रजननासाठी प्रमुख अधिवास असल्याचे समोर आले आहे. या प्रजातीच्या संवर्धनासाठीच्या उपाययोजना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या मार्गदर्शनानुसार केल्या जात आहेत. यासाठी गठित करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींचा त्यात आधार घेण्यात आला आहे.

***

आशिष सांगळे/नितीन गायकवाड/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2318865) अभ्यागत कक्ष : 11