वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'वर्ल्डस्किल्स शांघाय 2026'मध्ये एनआयएफटीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिंकली दोन रौप्य पदके आणि उत्कृष्टतेसाठी पदक


फॅशन टेक्नॉलॉजी, डिजिटल इंटरॅक्टिव्ह मीडिया डिझाइन, रिटेल सेल्स आणि व्हिज्युअल मर्चेंडायझिंगमध्ये एनआयएफटीच्या सहभागींनी केली उत्कृष्ट कामगिरी

'वर्ल्डस्किल्स 2026’ मधील एनआयएफटीचा सहभाग जागतिक मानके आणि उद्योग सज्जतेला बळकटी देणारा

Posted On: 29 SEP 2026 2:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2026

 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) ने शांघाय येथे सुरू असलेल्या 48व्या 'वर्ल्डस्किल्स शांघाय 2026’ स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण यश संपादित केले आहे. या स्पर्धेत एनआयएफटीचे विद्यार्थी आणि तज्ञांनी फॅशन टेक्नॉलॉजी, डिजिटल इंटरॅक्टिव्ह मीडिया डिझाइन, रिटेल सेल्स आणि व्हिज्युअल मर्चेंडायझिंग यांसारख्या प्रमुख फॅशन आणि सर्जनशील कौशल्य क्षेत्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

चीनमधील शांघाय येथे 23 ते 26 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 मध्ये, 64 कौशल्य प्रकारांमध्ये सुमारे 68 देश आणि प्रदेशांमधील 1,400 हून अधिक तरुण स्पर्धकांनी भाग घेतला. भारताने 63 कौशल्य प्रकारांमध्ये 70 स्पर्धकांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तुकडीसह भाग घेत 6 रौप्य पदके आणि 20 उत्कृष्टतेसाठीची पदके मिळवून 10वे स्थान पटकावले.

या स्पर्धेत, एनआयएफटी’ने फॅशन टेक्नॉलॉजी, व्हिज्युअल मर्चेंडायझिंग, रिटेल सेल्स आणि डिजिटल इंटरॅक्टिव्ह मीडिया डिझाइन या चार कौशल्य क्षेत्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या सहभागातून सर्जनशील, डिजिटल आणि रिटेल-केंद्रित कौशल्य क्षेत्रांमध्ये फॅशन शिक्षणाची वाढती भूमिका दिसून आली. एनआयएफटी च्या सहभागींनी तीन कौशल्य प्रकारात 2 रौप्य आणि एक उत्कृष्टता पदक मिळवून देशाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले. 

फॅशन टेक्नॉलॉजी हे एनआयएफटीच्या या स्पर्धेतील सहभागाचे एक दीर्घकाळापासूनचे क्षेत्र असून ही संस्था 2011 पासून स्पर्धेत सहभागी होत आहे. शांघाय 2026 स्पर्धेत, एनआयएफटी गांधीनगरच्या फॅशन डिझाइन पदवीधर विधी निरवकुमार सुथार यांनी फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि उत्कृष्टता पदक मिळवले.

विधी यांनी एनआयएफटी नवी दिल्ली येथे भारतीय तज्ञ प्रा. (डॉ.) मोनिका गुप्ता आणि एनआयएफटी प्रशिक्षण पथकाच्या मार्गदर्शनाखाली चार महिन्यांचे सखोल प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. फॅशन डिझाइन आणि या स्पर्धेचा व्यापक अनुभव असलेल्या प्रा. गुप्ता यांनी संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत विधी यांना सखोल मार्गदर्शन केले आणि सल्ला दिला. या कार्यक्रमात तांत्रिक प्राविण्य, अचूकता, आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन आणि विशेषतः या स्पर्धेच्या परिस्थितीत कामगिरी करण्याची क्षमता मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

डिजिटल इंटरॅक्टिव्ह मीडिया डिझाइनमध्ये, एनआयएफटी मुंबईच्या कोविद अजय गंगाडे यांनी रौप्य पदक जिंकले, तर एनआयएफटी पंचकुलाच्या सानिया जोशी यांनी किरकोळ विक्री मध्ये रौप्य पदक जिंकले. त्यांची ही कामगिरी विशेष लक्षणीय आहे, कारण किरकोळ विक्री आणि डिजिटल इंटरॅक्टिव्ह मीडिया डिझाइन हे या स्पर्धेत मांडलेल्या नवीन आणि उदयोन्मुख कौशल्य प्रकारांपैकी आहेत. हे कौशल्य प्रकार फॅशन आणि सर्जनशील उद्योगांचे बदलणारे स्वरूप तसेच या क्षेत्रात तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ग्राहक अनुभवाचे वाढते एकत्रीकरण दर्शवतात.

   

‘एनआयएफटी’ने व्हिज्युअल मर्चेंडायझिंग या कौशल्य प्रकारातही सहभाग नोंदवला. या कौशल्य प्रकारात एनआयएफटी बंगळूरुच्या अनुजा अजय वारे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

एनआयएफटी साठी या स्पर्धेचा प्रवास हा केवळ एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागापेक्षा अधिक आहे. यातून विद्यार्थ्यांना जागतिक व्यावसायिक मानके, उदयोन्मुख तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय मापदंड आणि उद्योगाच्या अपेक्षांची ओळख करून दिली जाते. हा अनुभव एनआयएफटी ला आपल्या प्रशिक्षण पद्धती सतत अद्ययावत करण्यास तसेच जागतिक सर्वोत्तम पद्धतींना आपल्या शैक्षणिक आणि कौशल्य-विकास परिसंस्थेमध्ये समाविष्ट करण्यास सक्षम करतो.

जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 मधील एनआयएफटी च्या सहभागींचे यश हे फॅशन, तंत्रज्ञान, सर्जनशीलता, रिटेल आणि डिजिटल कौशल्ये एकत्र करून सर्वोच्च आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सुसज्ज व्यावसायिक घडवण्याच्या संस्थेच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रदर्शन करते.

एनआयएफटी ने आपले विद्यार्थी, तज्ञ, प्रशिक्षक, अधिकारी, वस्त्रोद्योग मंत्रालय तसेच त्यांच्या या स्पर्धेच्या तयारी आणि सहभागात योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.

 

* * *

नितीन फुल्लुके/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316454) अभ्यागत कक्ष : 8