गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत ‘प्रहार - दहशतवादविरोधी धोरण आणि रणनीती’ यावरील परिषदेचे केले उद्घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत सरकारने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध 'शून्य-सहिष्णुता' धोरण स्वीकारले

'प्रहार' उपक्रमाची अंमलबजावणी पोलीस ठाण्याच्या पातळीपर्यंत सुनिश्चित करण्यासाठी, त्याच्या प्रत्येक पैलूबाबत सक्रिय दृष्टिकोन स्वीकारण्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला भर

परदेशात पलायन केलेल्या गुन्हेगारांना भारतात परत आणण्याच्या प्रयत्नांना गती देणाऱ्या एका नवीन प्रत्यार्पण पोर्टलचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले उद्घाटन

Posted On: 28 SEP 2026 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत ‘प्रहार - दहशतवादविरोधी धोरण आणि रणनीती’ यावरील परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत प्रतिबंध, प्रतिसाद, अंतर्गत क्षमता एकत्रित करणे, मानवाधिकार, दहशतवादासाठी कारणीभूत परिस्थिती कमी करणे, आंतरराष्ट्रीय प्रयत्नांनामध्ये समन्वय आणि संपूर्ण समाजाच्या सहभागातून पुनर्प्राप्ती आणि सक्षमता या 'प्रहार'च्या सात स्तंभांवर विचारमंथन करण्यात आले. या परिषदेला केंद्रीय गृहसचिव, परराष्ट्र सचिव, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल केंद्रीय पोलीस दलांचे प्रमुख, 15 राज्यांचे पोलीस महासंचालक, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते, तर इतर राज्यांचे पोलीस महासंचालक आणि पोलीस अधिकारी दूरदृष्टी प्रणालीमार्फत परिषदेत सामील झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध 'शून्य-सहिष्णुता' धोरण स्वीकारल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. दहशतवादी घटनांचे सातत्यपूर्ण विश्लेषण करून तसेच पुढील 10 वर्षांसाठी एक मजबूत आणि ठोस 'प्रहार' यंत्रणा स्थापन करून, 'प्रहार' धोरणाला बळकट आणि सुधारित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. 'प्रहार'ची तत्त्वे पोलीस ठाण्याच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करून, त्यांनी 'प्रहार' उपक्रमाच्या प्रत्येक पैलूबाबत सक्रिय दृष्टिकोन स्वीकारण्यावर भर दिला. दहशतवादाचा धोका कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपयोजनांचा उल्लेख करत त्यांनी प्रत्येक स्तरावर स्वयंचलित दहशतवादविरोधी प्रतिसाद संस्थात्मक स्वरूपात विकसित करण्याची गरज व्यक्त केली. प्रहारच्या प्रत्येक स्तंभाच्या अंमलबजावणीत परिणाम-केंद्रित दृष्टिकोनाच्या गरजेवर भर देत कारवाईतील कोणताही विलंब टाळण्यासाठी सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधण्याचे आवाहन त्यांनी केले. 2019 ते 2026 या काळात मोदी सरकारने 36 देशांमधून 288 फरार गुन्हेगारांना भारतात यशस्वीपणे परत आणल्याची माहिती त्यांनी दिली. विविध यंत्रणांमधील उत्तम समन्वयामुळे, शस्त्रे, स्फोटके आणि अमली पदार्थांच्या सीमापार तस्करीमध्ये सामील असलेल्या शहजाद भट्टी नेटवर्कच्या 40 हून अधिक गटांचा पर्दाफाश करण्यात आला, 100 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आणि 15 राज्यांमध्ये 350 जणांना अटक करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. त्याच वेळी मोदी सरकारने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध (यूएपीए) कायद्यांतर्गत शहजाद भट्टी नेटवर्कला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याचे त्यांनी सांगितले.

   

केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी एका नवीन प्रत्यार्पण पोर्टलचेही उद्घाटन केले. या पोर्टलच्या माध्यमातून परदेशात पलायन केलेल्या फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्याचा प्रयत्नात विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यास आणि प्रक्रिया अधिक गतिमान करण्यास मदत होणार आहे. परदेशात पलायन केलेल्या गुन्हेगारांना परत आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने काम करण्याकरिता राज्य पोलीस दलांनी विशेष पथके स्थापन करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316219) अभ्यागत कक्ष : 9