कृषी मंत्रालय
नवी दिल्लीत उद्यापासून रब्बी हंगाम 2026 वरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद सुरू होणार
कृषी क्षेत्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमधला समन्वय मजबूत करणे आणि परिणाम केंद्रित धोरण विकसित करण्यावर परिषदेत भर दिला जाणार
आगामी रब्बी हंगामाची सज्जता आणि महत्त्वाच्या प्राधान्यक्रमांवर राज्यांचे कृषी मंत्री, केंद्र तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि इतर भागधारक करणार विचारमंथन
Posted On:
27 SEP 2026 3:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितील कृषी आणि शेतकरी कल्याणाच्या वतीने रब्बी हंगाम 2026 वर राष्ट्रीय कृषी परिषदचे आयोजन केले जाणार आहे. येत्या 28 आणि 29 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील पुसा इथल्या एनएएससी (NASC) संकुलातील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृहात ही परिषद होईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, आगामी रब्बी हंगामाची पूर्वतयारी आणि महत्त्वाच्या प्राधान्यक्रमांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. यासाठी राज्यांचे कृषी मंत्री, केंद्र तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि इतर भागधारक या परिषदेच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.
या दोन दिवसीय परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारांमधला समन्वय अधिक मजबूत करण्यावर तसेच, कृषी उत्पादन, उत्पादकता, शाश्वतता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ साध्य करण्यासाठी समन्वित, परिणाम केंद्रित धोरण विकसित करण्यासंबंधीच्या मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कृषी परिषदांमधील महत्त्वाचे निष्कर्ष तसेच लक्षात आलेल्या मुद्यांच्या आधारावर या परिषदेतील चर्चा होणार आहे.
परिषदेच्या पहिल्या दिवशी तीन व्यापक क्षेत्रांचा अंतर्भाव असलेल्या तीन समांतर संकल्पनाधारित गट चर्चांचे आयोजन केले जाईल. याअंतर्गत आत्मनिर्भरता - वैविध्यिकरण आणि उत्पादन वाढ, शाश्वतता आणि हवामानाच्या दृष्टीने लवचिक कृषी क्षेत्र, तसेच डिजिटल कृषी, पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा आणि जोखीम व्यवस्थापन या तीन व्यापक विषयांचा समावेश असेल.
या परिषदेतील चर्चांमध्ये कडधान्ये-डाळी, तेलबिया आणि ऑइल पाम, फलोत्पादन, कापूस, बियाण्यांची उपलब्धता या बाबतीतील आत्मनिर्भरता अभियान, यासोबतच बियाणे मूल्य साखळीतील सुधारणा, नैसर्गिक शेती, मृदा आरोग्य, कृषी यांत्रिकीकरण, शेतकरी उत्पादक संघटनांसाठी (FPO) वित्तपुरवठा आणि पायाभूत सुविधा, विपणनातील सुधारणा, प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना, किसान क्रेडिट कार्डाच्या व्याप्तीचा विस्तार, डिजिटल कृषी क्षेत्र, प्रधानमंत्री पीक विमा योजना, रोपांचे संरक्षण आणि कृषी सांख्यिकी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा केली जाणार आहे.
विषयाधारित चर्चेचा उद्देश रब्बी हंगामातील अंमलबजावणीची प्रमुख आव्हाने, राज्यांच्या विशिष्ट गरजा आणि त्यावर करावयाच्या ठोस उपाययोजना निश्चित करणे हा आहे. विविध योजनांमध्ये अधिक चांगला समन्वय साधणे, वितरण व्यवस्था मजबूत करणे आणि या योजनांचा थेट शेतपातळीवर प्रभावी लाभ पोहोचवणे, यावर या चर्चेत विशेष भर दिला जाणार आहे.
दुसऱ्या दिवशी, विभागीय परिषदांमध्ये झालेल्या चर्चेतील महत्त्वाचे निष्कर्ष आणि पहिल्या दिवशीच्या विषयाधारित चर्चेतून समोर आलेल्या मुद्द्यांवर भर दिला जाईल. या दिवशीच्या कार्यक्रमात रब्बी हंगामातील हवामानाचा अंदाज, खतांची उपलब्धता आणि खतांचा संतुलित वापर, डिजिटल कृषी अभियान, शेतकरी नोंदणी, डिजिटल पीक पाहणी आणि कृषी माहिती संचय (ॲग्रीस्टॅक), डाळींमध्ये स्वावलंबनासाठीचे अभियान, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, पीक आणि बियाण्यांची स्थिती, नवीन वाणांचा स्वीकार, पीएम धन-धान्य कृषी योजना आणि विपणन सुधारणा या विषयांवर चर्चा होईल. तसेच, आत्मा अर्थात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून कृषी योजना तयार करण्यावरही भर दिला जाईल.
ही परिषद राज्यांच्या कृषिमंत्र्यांना त्यांचे विचार आणि अनुभव, राज्यांचे प्राधान्यक्रम तसेच कृषी विकास आणि रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठीच्या सूचना मांडण्याची संधी देईल. राज्यांकडून मिळालेल्या सूचना आणि विषयाधारित चर्चेतील निष्कर्षांच्या आधारे रब्बी हंगाम 2026 साठी एकत्रित आणि प्रभावी धोरण तयार करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
समारोपाच्या सत्रात आतापर्यंत झालेल्या चर्चांचा सारांश मांडला जाईल. तसेच रब्बी पिकांचे उत्पादन वाढवणे, अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे आणि ‘आत्मनिर्भर आणि विकसित भारत’ चे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणारा ठोस आराखडा तयार करण्यावर भर दिला जाईल.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315541)
अभ्यागत कक्ष : 16