कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केवळ एखाद्या विशिष्ट भागात माशांमध्ये परजीवी आढळल्याच्या वृत्तामुळे ग्राहकांनी ट्युना मासे खाणे टाळण्याची गरज नाही असा आयसीएआर-सीएमएफआरआयचा सल्ला

Posted On: 24 SEP 2026 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

केवळ एखाद्या विशिष्ट भागात माशांमध्ये परजीवी आढळल्याच्या वृत्तामुळे ग्राहकांनी ट्युना  मासे खाणे टाळण्याची गरज नाही असा सल्ला भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय सागरी मत्स्योद्योग संशोधन संस्थेच्या कोची येथील विभागाने दिला आहे. भारतीय किनारपट्टीजवळ आढळणाऱ्या ट्युना आणि इतर माशांची तपासणी केली असता त्यांच्यात  हानिकारक परजीवींचा कोणताही बाह्य प्रादुर्भाव आढळलेला नाही तसेच एका भौगोलिक क्षेत्रातील निष्कर्ष भारताच्या सागरी हद्दीत आढळणाऱ्या माशांना जसेच्या तसे लागू होत नाहीत, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

ब्राझील मधील अटलांटिक महासागरात आढळणाऱ्या स्किपजॅक ट्युना प्रजातीच्या माशांचा अभ्यास केला असता त्यांच्यात परजीवी आढळल्याच्या वृत्तामुळे संस्थेने ही मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. माशामध्ये परजीवींची उपस्थिती किंवा त्यांचे कमी अधिक प्रमाण हे प्रत्येक माशावर तसेच त्या त्या भौगोलिक प्रदेशातील पर्यावरणीय परिस्थिती आणि कोपपॉडसारख्या मध्यवर्ती किंवा दुय्यम होस्टच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात, असे आयसीएआर-सीएमएफआरआयने सांगितले आहे.    

मत्स्य जीवशास्त्र अभ्यासाचा भाग म्हणून तसेच त्यांच्यात होणारे बदल जाणून घेण्यासाठी संस्थेतील शास्त्रज्ञ नियमितपणे आणि आवश्यकतेनुसार माशांमधील विकृती किंवा परजीवींचे निरीक्षण करत असतात, यामध्ये स्किपजॅक ट्युना माशाचा देखील समावेश असतो, असे आयसीएआर-सीएमएफआरआयचे संचालक, डॉ. ग्रिन्सन जॉर्ज यांनी सांगितले. संस्थेने तपासलेल्या माशांमध्ये हानिकारक परजीवी प्रादुर्भावाची बाह्य लक्षणे दिसून आली नाहीत, असे ते म्हणाले.

जागतिक स्तरावर माशांचे वेगवेगळे साठे  किंवा त्यांच्या लोकसंख्येमधील फरक ओळखण्यासाठी, त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या परजीवींच्या प्रमाणातील भिन्नतेचा एक निर्देशक म्हणून वापर केला जातो. त्यामुळे, एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील माशांशी संबंधित असलेले निष्कर्ष, दुसऱ्या क्षेत्रातील त्याच प्रजातीच्या माशांना आपोआप लागू केले जाऊ शकत नाहीत, असे संस्थेने म्हटले आहे.

अन्नसुरक्षेसाठी अतिरिक्त खबरदारी म्हणून मासे हाताळताना आणि त्यांच्यावर प्रक्रिया करताना त्यांचे आतडे आणि  इतर अंतर्गत अवयव त्वरित आणि योग्यरित्या काढून टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माशांची साफसफाई करताना आणि त्यांच्यावर प्रक्रिया करताना साधारणपणे त्यांचे आतडे आणि  इतर अंतर्गत अवयव  काढून टाकले जातात. त्याशिवाय योग्य तापमानावर मासे शिजवल्यास त्यांच्यातील परजीवी नष्ट होतात आणि अन्नसुरक्षेशी निगडित धोके देखील कमी होतात.

काही देशांमध्ये त्यांच्या पारंपरिक पद्धतीनुसार कच्चे किंवा अतिशय कमी शिजवलेले सागरी खाद्य सेवन केले जाते, अशा ठिकाणी माशांमध्ये परजीवींचा प्रादुर्भाव असेल आणि त्यांची योग्यपद्धतीने तपासणी केली नसेल तर त्या विशिष्ट भागात जोखीम जास्त असू शकते. भारतात साधारणपणे सागरीखाद्य हे साधारणपणे उच्च तापमानावर शिजवून केले जाते त्यामुळे आपोआपच अतिरिक्त अन्नसुरक्षा उपाय देखील केला जातो, असे संस्थेने म्हटले आहे.

केवळ एखाद्या विशिष्ट भागात माशांमध्ये परजीवी आढळल्याच्या वृत्तामुळे ग्राहकांनी ट्युना मासे खाणे टाळण्याची गरज नाही यावर आयसीएआर-सीएमएफआरआयने भर दिला आहे. ग्राहकांनी माशाची योग्य हाताळणी, स्वच्छता आणि स्वयंपाकाच्या योग्य पद्धतींचा वापर करुन संभाव्य धोके टाळावेत आणि त्याचवेळी मासे आणि इतर सागरी खाद्याच्या सेवनामुळे मिळणाऱ्या पोषण मूल्यांचा लाभ घेणे सुरु ठेवावे असा सल्ला देखील दिला आहे.

 

* * *

सुषमा काणे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314521) अभ्यागत कक्ष : 9