अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते नवी दिल्लीत ब्रिक्स कर प्राधिकरण प्रमुखांच्या बैठकीचे झाले उद्घाटन
भारताच्या ब्रिक्स कर अध्यक्षपदाच्या काळात तंत्रज्ञान, प्रशासन आणि मनुष्यबळ या क्षेत्रात महत्त्वपूर्ण परिणाम साध्य
आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि महसूल सांख्यिकी या विषयांवर भारताच्या नेतृत्वाखालील औपचारिकरित्या दोन नवीन कार्यगट स्थापन; ब्रिक्स कर प्रगती अहवाल 2026 चा स्वीकार
Posted On:
23 SEP 2026 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत ब्रिक्स कर प्राधिकरण प्रमुखांच्या बैठकीचे उद्घाटन केले. कर सहकार्य क्षेत्रातील भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा हा समारोप आहे. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव यांनीही संबोधित केले.
ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या दहा ब्रिक्स देशांच्या कर प्रशासनांचे प्रतिनिधी त्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी तसेच सहकार्य आणि समन्वयातून निर्माण होणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीत सहभागी झाले.


सीतारमण यांनी या प्रसंगी आपल्या भाषणात, भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात ब्रिक्स कर सहकार्याचे तंत्रज्ञान, प्रशासन आणि मनुष्यबळ हे तीन प्रमुख विषय असल्याचे अधोरेखित केले. अर्थमंत्र्यांनी कर प्रशासन अधिक अचूक आणि सुलभ बनवण्यासाठी डेटा आणि डिजिटल पायाभूत सुविधांची भूमिका स्पष्ट केली. तसेच अध्यक्षपदाचा कालावधी संपल्यानंतरही सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत संस्थात्मक यंत्रणा आणि व्यावहारिक साधनांच्या निर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले. कर प्रशासनांमध्ये व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी तसेच मनुष्यबळाच्या विकासासाठी गुंतवणूक करण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय कर सहकार्यावरील संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क कन्व्हेन्शनवरील वाटाघाटींसह, सुरू असलेल्या बहुपक्षीय कर वाटाघाटींची निष्पक्षता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी ब्रिक्स अर्थव्यवस्थांचे दृष्टिकोन आवश्यक आहेत, असेही त्या म्हणाल्या.

या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निष्कर्षांना औपचारिकपणे मान्यता देण्यात आली. आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण किंमत तसेच महसूल सांख्यिकी या दोन विषयांवर नवीन कार्यगटांची स्थापना करण्यात आली. या दोन्ही गटांचे नेतृत्व भारत करणार आहे, त्यामुळे अध्यक्षपद कोणत्याही देशाकडे असले तरी हे संस्थात्मक मंच निरंतर काम करत राहतील. एप्रिल 2026 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये आयोजित पहिला प्रत्यक्ष 'ब्रिक्स तरुण कर व्यावसायिक क्षमता विकास कार्यक्रमाला' ब्रिक्स कर सहकार्याचे वार्षिक वैशिष्ट्य म्हणून संस्थात्मक स्वरूप देण्यात आले. 'ब्रिक्स टॅक्स क्रॉस-लर्निंग लॅब' औपचारिकपणे सुरू करण्यात आली. यात 'ग्राहक-केंद्रित प्रशासन' आणि 'मानव संसाधन पद्धती' या कार्यगटांच्या कार्याला एका संयुक्त समवयस्क-शिक्षण मंचावर एकत्रित करण्यात आले. 'ब्रिक्स कर सहाय्य नेटवर्क'च्या कार्यकक्षेलाही मंजुरी देण्यात आली.

या बैठकीचा समारोप 'ब्रिक्स कर प्रगती अहवाल 2026' वर औपचारिक स्वाक्षरी करून झाला. हा भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातील ब्रिक्स कर सहकार्याचा संपूर्ण अहवाल आहे. 2027 साठी ब्रिक्स कर सहकार्याचे आगामी अध्यक्ष म्हणून चीन प्रजासत्ताकाचे स्वागत करण्यात आले.

कर प्राधिकरणांच्या प्रमुखांनी बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि ब्रिक्स कर सहकार्याच्या क्षेत्रातील भारताच्या अध्यक्षपदाच्या कामाची गुणवत्तेबद्दल आणि व्याप्तीबद्दल भारत सरकारची प्रशंसा केली.

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314208)
अभ्यागत कक्ष : 7