संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भर भारताला मोठे पाठबळ : भारतीय हवाई दलासाठी 160 सॅटेलाईट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन्स च्या खरेदीसाठी, संरक्षण मंत्रालयाचा बीडीएल सोबत 811 कोटी रुपयांचा करार

Posted On: 23 SEP 2026 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026

संरक्षण मंत्रालयाने, भारतीय हवाई दलासाठी आवश्यक अशा 160 सॅटेलाईट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन्स (SAT-SAAW) च्या खरेदीसाठी भारत डायनामिक्स लिमिटेड सोबत, करार केला आहे. एकूण 810.79 कोटी रुपये किमतीचा हा करार, बाय (भारतीय- स्वदेशी बनावटीचे, विकसित आणि उत्पादित) या श्रेणीत करण्यात आला आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आज, म्हणजेच 23 सप्टेंबर 2026 रोजी हा करार करण्यात आला.

सॅटेलाईट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन्स (SAT-SAAW) हे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असे, गाइडेड ग्लाईड बॉम्ब असून, ते जग्वार,हॉक, आणि सुखोई- 30 एमकेआय अशा प्लॅटफॉर्म वरुन लॉन्च केले जाऊ शकतात. या बॉम्बमध्ये अत्यंत लांब पल्ल्याच्या अंतरावरून, शत्रूचे  विमानतळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी पद्धतीने या प्रणालीची रचना आणि विकास केला आहे. या प्रणालीमध्ये 60 टक्के स्वदेशी उत्पादने वापरली जातील. तसेच इनिशियल मेजरमेंट युनिट (IMU), लाँग इम्पॅक्ट डिले फ्यूज आणि ट्विन स्टोअर कॅरिअर यांसारख्या उपप्रणालीही स्वदेशी बनावटीच्याच असतील. या प्रणालीमुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला आणखी चालना मिळेल.

सॅटेलाईट स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपन्स, वर्ष 2027-2028 आणि 2028-2029 या काळात मिळण्याची अपेक्षा आहे. ही प्रणाली हवाई दलात समाविष्ट झाल्यानंतर, देशाची  संरक्षण सज्जता अधिक भक्कम होण्याबरोबरच  हवाई दलाच्या युद्ध क्षमतेत निश्चित वाढ होणार आहे.

निलिमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2314110) अभ्यागत कक्ष : 14