आयुष मंत्रालय
11 वा आयुर्वेद दिन 23 सप्टेंबर रोजी भारतभर आणि जगभरात साजरा केला जाणार
Posted On:
22 SEP 2026 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026
आयुष मंत्रालयाच्या वतीने उद्या नागपुरात "स्वस्थ भविष्य के लिए आयुर्वेद" (Ayurveda for a Healthier Tomorrow - निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद) या संकल्पनेसह 11 व्या आयुर्वेद दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात भारतभरातील आणि जगभरातील आयुर्वेद संस्था, वैद्य (प्रॅक्टिशनर्स) आणि भागधारक सहभागी होतील.
नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमात विकसनशील देशांसाठीच्या रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टीमने तयार केलेल्या ‘आयुष सर्व्हिसेस सेक्टर’ वरील पहिल्यावहिल्या अहवालाचे अनावरण करण्यात येणार आहे. या अहवालातून आयुष सेवा क्षेत्राचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गोक्षुर आणि चंद्रशूर यांच्यावरील सुरक्षा दस्तऐवज, तसेच त्वचेच्या विकारांवरील मानक उपचार मार्गदर्शक तत्त्वे यांचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. याशिवाय आयुर्वेदातील पुरावे, संशोधन, नवोन्मेष आणि समुदाय कल्याणाला चालना देणारे विविध उपक्रम आणि प्रकाशने सुरू करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात ‘फ्रॉम ट्रॅडिशनल विस्डम टू ग्लोबल लीडरशिप: आयुष व्हिजन 2030’ हा अहवाल, भारतातील आयुष-संबंधित शोधांचा स्थिती अहवाल, तसेच सीसीआरएएस–अग्नी (सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस – आयुर्वेद ज्ञान नैपुण्य इनिशिएटिव्ह) असेसमेंट स्केल वेब पोर्टल यांचेही अनावरण करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चार पात्र उद्योगांना आयुष गुणवत्ता चिन्ह प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
या सोहळ्याला आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, विविध परिषदांचे प्रतिनिधी आणि आयुष क्षेत्रातील संस्थांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या उत्सवाच्या माध्यमातून आयुर्वेद क्षेत्रातील विविध भागधारक एकत्र येणार असून, ज्ञानाची देवाणघेवाण आणि व्यापक सहभागासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
11 व्या आयुर्वेद दिनाच्या आयोजनातून आयुर्वेद अधिक सक्षम करण्यासाठी आणि समुदायाचे आरोग्य तसेच कल्याण वाढवण्यासाठी पुरावे, संशोधन आणि नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. देशभरात तसेच जगभरात होणाऱ्या या सोहळ्यातून ‘निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद’ या ध्येयाला अधिक बळ दिले जाणार आहे.
सुषमा काणे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313648)
अभ्यागत कक्ष : 8