पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते जयपूर इथे डब्ल्यूडब्ल्यूएफ जागतिक संवर्धन परिषदेचे उद्घाटन
स्थानिक समुदायांना सामावून घेऊन संवर्धन आणि सहअस्तित्वावर जागतिक कृती करण्याचे भूपेंद्र यादव यांचे आवाहन
Posted On:
21 SEP 2026 5:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2026
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज जयपूर इथे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरच्या जागतिक संवर्धन परिषदेचे उद्घाटन केले.

100 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना, मंत्र्यांनी संवर्धन आणि सहजीवनावर कृती करण्याची, एक समुदाय म्हणून पुन्हा जोडले जाण्याची, होत असलेल्या प्रगतीतून आत्मविश्वास मिळवण्याची आणि आशा व प्रगतीच्या दिशेची सामायिक भावना निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. यादव यांनी वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्राविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन सामायिक केला आणि गेल्या दशकात संरक्षित क्षेत्रांची संख्या सुमारे 750 वरून 1000 हून अधिक संख्येवर पोहोचली आहे याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे, याच काळात व्याघ्र प्रकल्पांची संख्या 47 वरून 58 आणि हत्ती प्रकल्पांची संख्या 30 वरून 33 पर्यंत वाढली आहे, तर रामसर स्थळांची संख्या 24 वरून 101 पर्यंत वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतातल्या चित्ता पुनर्वसन प्रकल्पाच्या यशाचेही वर्णन केले.

प्रजातींच्या संवर्धनासाठी भारताची बांधिलकी संवैधानिक आणि सांस्कृतिक दोन्ही आहे, आणि ती आधुनिक संरक्षित-क्षेत्र कायद्याच्या खूप आधीपासून अस्तित्वात असलेल्या जागतिक दृष्टिकोनात रुजलेली आहे, असे यादव यांनी नमूद केले. भारत सीआयटीईएस, सीएमएस, सीबीडी आणि रामसर कराराचाही एक भाग आहे आणि वाघ, हत्ती, गेंडे तसेच आशियाई सिंहांच्या संख्येत झालेली वाढ शाश्वत राजकीय इच्छाशक्ती काय साध्य करू शकते हे दर्शवते, असे ते यावेळी म्हणाले.
देशात वैज्ञानिक संशोधन आणि देखरेख यंत्रणांमुळे संवर्धनात कसे यश मिळाले आहे याचाही मंत्र्यांनी उल्लेख केला. वाघ, हत्ती, डॉल्फिन, सिंह आणि हिमबिबट्या यांसारख्या प्रजातींच्या अखिल भारतीय संख्येच्या अंदाजामुळे त्यांच्या अधिवासात सुधारणा करण्यासाठी, मार्ग सुरक्षित करण्यासाठी आणि मोठ्या प्राण्यांच्या प्रजातींच्या बाबतीत लँडस्केप दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी अंतर्दृष्टी मिळाली आहे, असे यादव यांनी नमूद केले.
यादव यांनी जंगले आणि पाणथळ जागांसह गवताळ प्रदेशांच्या संवर्धनाच्या गरजेवर भर दिला. वन्यजीव संवर्धकांनी केवळ चिंतन करण्यासाठीच नव्हे, तर पुढे जाण्यासाठी, जे यशस्वी ठरते त्यातून शिकण्यासाठी आणि त्याचे कृतीत रूपांतर करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313117)
अभ्यागत कक्ष : 7