शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते प्राथमिक शिक्षक संबंधी शिक्षणातील सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र (ब्रिज)अभ्यासक्रमाचा प्रारंभ


हा अभ्यासक्रम गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रदान करेल

Posted On: 17 SEP 2026 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 16 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे प्राथमिक शिक्षक शिक्षणातील सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र (ब्रिज) अभ्यासक्रमाचा प्रारंभ केला. हा अभ्यासक्रम विशेषतः बी.एड. पदवी असलेल्या आणि सध्या कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी तयार करण्यात आला आहे. प्राथमिक स्तरावर अध्यापन करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र मिळवण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम अशा शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल. हा विशेष व्यावसायिक विकास कार्यक्रम शिक्षकांना सर्वसमावेशक प्रशिक्षण  प्रदान करेल, ज्यामुळे प्राथमिक स्तरावरील (इयत्ता 1 ली ते 5 वी) विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यास त्यांना मदत होईल.

हा 'ब्रिज' अभ्यासक्रम 'राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था (NIOS) द्वारे राबविला जाईल. यामुळे शिक्षकांना बाल-केंद्रित, सर्वसमावेशक आणि मुलांच्या विकासाच्या टप्प्यांशी सुसंगत अशा अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण मिळेल, ज्यामुळे मूलभूत आणि प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

'राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद ' (NCTE) च्या आराखड्यानुसार तयार करण्यात आलेला हा अभ्यासक्रम; शैक्षणिक अध्ययनासह किमान 10 दिवसांचे ऑनलाइन संपर्क वर्ग आणि किमान 20 दिवसांचा विद्यालय आधारित अनुभवाद्वारे प्राथमिक स्तरावरील अध्यापन-कौशल्ये अधिक सक्षम करेल.

हा अभ्यासक्रम शिक्षकांना लहान मुलांच्या विविध अध्ययन-गरजा पूर्ण करण्यास सक्षम करेल. सहा सैद्धांतिक अभ्यासक्रम आणि शाळेतील प्रत्यक्ष कृती-अनुभव  यांचा समावेश असलेला हा कार्यक्रम, शैक्षणिक सिद्धांत आणि वर्गातील प्रत्यक्ष अध्यापन पद्धती यांची सांगड घालण्यासाठी एक भक्कम आराखडा प्रदान करतो. प्राथमिक वर्गांमधील सर्व मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आजीवन अध्ययन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, दृष्टिकोन आणि चिंतन क्षमतांनी प्राथमिक शिक्षकांना सक्षम करणे हे या 'ब्रिज 'अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा अभ्यासक्रम अध्यापनाकडे एक गतिमान, संदर्भ-संवेदनशील आणि चौकस-वृत्तीवर आधारित पेशा  म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन रुजवतो.

या कार्यक्रमात मूलभूत अध्ययनाच्या तत्त्वांवर आधारित सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही घटकांचा समावेश आहे. शिक्षणाचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. मात्र, शिक्षकांना सार्वजनिक परीक्षा (लेखी) संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी कोणत्याही भाषेत लिहिण्याची मुभा असेल. हा अभ्यासक्रम 'ओपन अँड डिस्टन्स लर्निंग' म्हणजेच मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे राबविला जाईल.

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश  NIOS च्या अधिकृत 'ब्रिज कोर्स' पोर्टलद्वारे (https://bridge.nios.ac.in) ऑनलाइन पद्धतीने पार पडेल. पात्र शिक्षक नोंदणी करू शकतात, आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात आणि निर्धारित डॅशबोर्डद्वारे आपल्या प्रवेशाची स्थिती पाहू शकतात.

 
राधिका अघोर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2311612) अभ्यागत कक्ष : 8