गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत 52व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित


आगामी काळात भारत रत्ने आणि आभूषणांचे जागतिक केंद्र बनेल.

पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये निर्यातदार, उत्पादक, बँकर्स आणि महिला उद्योजकांचा समावेश आहे; या सर्वांनी मिळून भारताच्या विकासासाठी नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांचे युग आता उदयास येण्यासाठी सज्ज आहे. या बाजारपेठेचा आकार सध्याच्या हिऱ्यांच्या बाजारपेठेच्या जवळपास 50 पट वाढण्याची अपेक्षा आहे.

प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांसाठी संपूर्ण परिसंस्था आणि संपूर्ण उत्पादन मूल्यसाखळी भारतीयांच्या हातात राहील, अशा पद्धतीने आपण स्वतःला तयार केले पाहिजे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने रत्ने आणि आभूषण व्यापाराला भारताच्या निर्यातीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Posted On: 13 SEP 2026 7:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज मुंबई येथे 52 व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था, समृद्धी आणि जागतिक कीर्ती वाढविण्यात सातत्याने योगदान देणाऱ्या जेम्स अँड ज्वेलरी पुरस्कारांच्या माध्यमातून आज अनेक नामवंत यशस्वी व्यक्तींचा गौरव होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. इंडिया डायमंड बोर्सचा हा उपक्रम भारताचा आत्मविश्वास, कौशल्य, समृद्धी आणि जागतिक महत्त्वाकांक्षांचे प्रतिबिंब आहे. आगामी काळात भारत रत्ने आणि आभूषणांचे जागतिक केंद्र बनेल.

CR3_0627.JPG.jpeg

1975 मध्ये जेव्हा या पुरस्कारांची सुरुवात झाली तेव्हा हा छोटासा उपक्रम पाच दशकांनंतर, देशाच्या रत्न आणि आभूषण उद्योगासाठीचे मान्यताप्राप्त व्यासपीठ होईल आणि हा उद्योग राष्ट्रीय विकासात आणि एमएसएमई उद्योग क्षेत्राच्या विस्तारात एवढी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी कल्पना फार थोड्या लोकांनी केली असेल. शाह म्हणाले की, आज सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये निर्यातदार, उत्पादक, बँक तज्ज्ञ आणि महिला उद्योजक यांचा समावेश आहे. या सर्वांनी एकत्रितपणे भारताच्या विकासात नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत.

अमित शाह म्हणाले की, रत्ने आणि आभूषणे नेहमीच भारताच्या ओळखीचा अविभाज्य घटक राहिला आहे. 6000 वर्षांहून अधिक काळापासून भारतातील रत्ने आणि आभूषणांचा जगभरात व्यापार होत राहिला आहे. रोमन लेखक प्लिनी याने लिहिले होते की भारतीय रत्ने आणि मसाले यांच्या व्यापारामुळे रोमचा खजिना रिता होत राहिला कारण या व्यापारामुळे रोमने कमावलेली संपत्ती भारताकडे प्रवाहित होत होती. शतकानुशतके भारतीय कारागीरांनी या परंपरेला नवे आयाम दिले आहेत असे शाह यावेळी म्हणाले. मध्ययुगीन काळात आभूषण निर्मितीच्या कलेला राजाश्रय मिळाला आणि कलेने नवी शिखरे गाठली होती. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने, रत्न आणि आभूषण उद्योगाला भारताच्या निर्यातीचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारत डायमंड बोर्स हे जगभरात होणाऱ्या भारताच्या रत्न आणि आभूषण व्यापाराचे प्रतीक म्हणून उदयाला आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या 12 वर्षांत देशात अनेक परिवर्तनात्मक बदल घडवून आणले असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले.  2014 मध्ये भारताची गणना फ्रेजाईल फाईव्ह अर्थात कमकुवत अर्थव्यवस्था असलेल्या पाच देशांममध्ये केली जात होती, मात्र आज भारताचा समावेश जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये झाला असल्याचे त्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील सकल देशांतर्गत उत्पादनासंदर्भात अलिकडेच जाहीर झालेल्या आकडेवारीतून,  भारत 7.8 टक्के इतक्या विकास दरासह जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयाला आला असल्याचे ते म्हणाले. हा बदल केवळ आर्थिक घडामोडींपुरता मर्यादित नाही, तर पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम केले आहे असे ते म्हणाले.

आज भारत अमेरिका, मध्य पूर्वेचा प्रदेश, हाँगकाँग आणि युरोपमधल्या देशांसाठी दागिन्यांच्या आयातीचा एक प्रमुख स्त्रोत म्हणून उदयाला आला असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. ही वाटचाल अशीच पुढे चालू राहीली पाहीजे अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने युरोपीय संघ, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि युनायटेड किंगडम यांच्यासोबत केलेले मुक्त व्यापार करार, देशाच्या व्यापाराचा विस्तार करण्यासाठी एक मोठी संधी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, काळ बदलत आहे आणि त्यासोबतच ग्राहकांचे प्राधान्यक्रमही बदलत आहेत; हे परिवर्तन रत्न आणि आभूषणे व्यवसायासाठी एक मोठी संधी घेऊन आले आहे. या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी सराफांनी सज्ज राहिले पाहिजे, ते म्हणाले की, आता प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांचे युग सुरू होत आहे आणि या क्षेत्रातील बाजारपेठ सध्याच्या हिऱ्यांच्या बाजारपेठेच्या तुलनेत जवळपास 50 पटीने वाढण्याची अपेक्षा आहे. ही एक प्रचंड मोठी संधी आहे. जेव्हा जागतिक दागिने व्यवसायाचे आधुनिकीकरण होत होते, तेव्हा भारत वसाहतवादी राजवटीखाली होता; त्यावेळी अनेक देश, अगदी लहान देशही, आपल्यापेक्षा पुढे गेले. परंतु, प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या युगाच्या आगमनावेळी भारताकडे आवश्यक पायाभूत सुविधा, कौशल्ये, भांडवल आणि सक्षम उद्योजक उपलब्ध आहेत.  आपण स्वतःला अशा प्रकारे तयार केले पाहिजे की लॅब-ग्रोन डायमंड्सची संपूर्ण व्यवस्था आणि संपूर्ण उत्पादन मूल्य साखळी भारतीयांच्या हातात असेल. यंत्रांचे उत्पादन असो, लॅब-ग्रोन डायमंड्सची निर्मिती असो, दागिने बनवणे असो किंवा भारतीय ब्रँड्स विकसित करून जगभरातील शहरांमध्ये शोरूम्स सुरू करणे असो – ही संपूर्ण मूल्य साखळी आपल्या आवाक्यात असली पाहिजे. भारतीय दागिने व्यापारी हे साध्य करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, असेही ते म्हणाले.  शाह म्हणाले की, भारत सरकारने या दिशेने पुढाकार घेतला आहे आणि सूरत व मुंबईतील काही उद्योजक व्यापाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र सरकार पूरक धोरणे आणत आहेत आणि भारत सरकारही योग्य धोरणे जाहीर करेल.  लॅब-ग्रोन डायमंड्सच्या या नवीन युगात भारताने एक अग्रणी उद्योग म्हणून उदयास आले पाहिजे आणि भारतीय ब्रँड्स हे जागतिक ब्रँड्स बनले पाहिजेत, ज्यामुळे या जागतिक व्यवसायात भारत आणि भारतीय दागिने व्यापाऱ्यांचे भक्कम अस्तित्व निर्माण होईल. यासाठी मोदी सरकार सर्वतोपरी सहकार्य करण्यास सज्ज आहे.

***

शैलेश पाटील/राधिका अघोर/हेमांगी कुलकर्णी/विजयालक्ष्मी साळवी साने/तुषार पवार/राजेश शिरभाते/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2309904) अभ्यागत कक्ष : 8