महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून 'राष्ट्रीय पोषण माह 2026' चा शुभारंभ: आहारातील विविधता, प्रथिनांचे पुरेसे सेवन आणि ताजे गरम शिजवलेले अन्न यावर देशव्यापी मोहिमेचा भर
14 लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रांमार्फत 7.5 कोटींहून अधिक बालके आणि 1.10 कोटी गर्भवती आणि स्तनदा मातांना पोषण, आरोग्य आणि बालपणाच्या सुरुवातीच्या काळातील काळजीविषयक सेवा पुरवल्या जात असल्याचे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचे प्रतिपादन
Posted On:
09 SEP 2026 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026
महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आज रुद्राक्ष इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (आरआयसीसीसी), वाराणसी येथे 9 व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 चा शुभारंभ केला. यावेळी "हमारी अंगणवाडी,हमारी जिम्मेदारी" या संकल्पनेअंतर्गत पोषणासाठी महिनाभर चालणाऱ्या देशव्यापी जन-चळवळीचा प्रारंभ झाला.

या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, विकास भागीदार, आघाडीचे कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आपल्या बीजभाषणात, मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 च्या माध्यमातून पोषण विषयक स्थिती सुधारण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, 14 लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रे सध्या 7.5 कोटींहून अधिक बालके, 1.10 कोटी गर्भवती आणि स्तनदा माता आणि सुमारे 16 लाख किशोरवयीन मुलींना पोषण, आरोग्य आणि बालपणाच्या सुरुवातीच्या काळातील काळजीविषयक सेवा पुरवत आहेत. जन्मानंतर सुरुवातीच्या 1,000 दिवसांच्या महत्त्वावर भर देत त्यांनी नमूद केले की, सरकार 2 लाख अंगणवाडी केंद्रांचे 'सक्षम अंगणवाड्यां'मध्ये रूपांतर करत असून, यापैकी उत्तर प्रदेशातील सुमारे 24,000 केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजने'च्या (पीएमएमव्हीवाय) अंमलबजावणीला दहा वर्षे पूर्ण झाली असून, या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील 4.65 कोटींहून अधिक मातांना 'थेट लाभ हस्तांतरणा'द्वारे (डीबीटी) 21,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले. आहारातील विविधता, प्रथिनांचे पुरेसे सेवन, ताजे आणि गरम शिजवलेले अन्न, स्वच्छता आणि बालवयातील विकास या बाबींमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्यांनी लोकसहभागाच्या भूमिकेवर विशेष भर दिला, तसेच 'सुपोषित भारत' आणि 'विकसित भारत @ 2047' चे स्वप्न साकारण्यासाठी पोषणविषयक उपक्रमाला खऱ्या अर्थाने 'लोकचळवळ' बनवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी बोलताना, महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी विविध समुदाय, पंचायत राज संस्था, स्वयं-सहायता गट आणि कुटुंबांना पोषणविषयक चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचे तसेच पोषण आणि बालसंगोपन सेवांची तळागाळातील अंमलबजावणी अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

देशभरात 9 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत 'राष्ट्रीय पोषण माह 2026' साजरा केला जाईल. यामध्ये पुढील बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करणारे उपक्रम राबवले जातील:
· आहारातील विविधता आणि प्रथिनांचे (प्रोटीन) पुरेसे सेवन
· अंगणवाडी केंद्रांमध्ये ताजे आणि गरम शिजवलेले जेवण
· अंगणवाडी व्यवस्थापन समित्या आणि एसएनपी मेनू बोर्डांच्या माध्यमातून सामुदायिक सहभाग आणि मालकी
· बालविकासासाठी पोषण आणि सुरुवातीच्या टप्प्यातील प्रोत्साहन
· प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची (पीएमएमव्हीवाय) 10 वर्षे
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308424)
अभ्यागत कक्ष : 13