आयुष मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सुलभ, लोक -केंद्रित आणि दर्जेदार आयुष सेवा पुरवण्याचे केले आवाहन
आयुष परिसंस्था बळकट करण्यासंबंधी नीती आयोगाद्वारे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्र सरकार तसेच 30 हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग
Posted On:
09 SEP 2026 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देशभरात सुलभ, लोक-केंद्रित आणि दर्जेदार आयुष सेवांचे वितरण अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. हैदराबादमधील 'कान्हा शांती वनम' येथे नीती आयोगाद्वारे आयोजित 'राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयुष परिसंस्था बळकट करणे' या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते.
सामायिक अनुभव, सर्वोत्तम कार्यपद्धती आणि सहकार्याच्या माध्यमातून 'आयुष' परिसंस्था बळकट करण्याबाबत चर्चा करण्यासाठी या कार्यशाळेत केंद्र सरकार, 30 हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध संस्थांमधील तज्ज्ञ एकत्र आले होते.
प्रतापराव जाधव उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) प्रा. (डॉ.) एम. श्रीनिवास आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा हे देखील यावेळी उपस्थित होते.
आपल्या बीजभाषणात, जाधव यांनी 'आयुष' प्रणालींचा विस्तार आणि प्रभाव वाढवण्यासाठी केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वित प्रयत्नांच्या गरजेवर भर दिला. तसेच, जनतेच्या बदलत्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी 'आयुष' आरोग्य सेवांची गुणवत्ता, उपलब्धता आणि लोक-केंद्रित वितरणावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रा. (डॉ.) एम. श्रीनिवास यांनी एकात्मिक आरोग्यसेवेसाठी तंत्रज्ञान आणि पुरावा आधारित पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले , ज्यात भारतात आणि बाहेर आरोग्यविषयक परिणाम सुधारण्याची क्षमता आहे.
वैद्य राजेश कोटेचा यांनी 'आयुष' परिसंस्था बळकट करण्यात आणि तळागाळापर्यंत 'आयुष' सेवांची प्रभावी अंमलबजावणी व उपलब्धता सुनिश्चित करण्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.
या कार्यशाळेने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रमुख क्षेत्रांमधील अनुभव, सर्वोत्तम कार्यपद्धती आणि अभिनव कल्पना सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या क्षेत्रांमध्ये 'आयुष' आरोग्यसेवा वितरण, शिक्षण, संशोधन, क्षमता निर्मिती आणि व्यापक आरोग्यसेवा प्रणालीशी एकत्रीकरण समाविष्ट आहे.
या चर्चेतून एक अधिक मजबूत, सुलभ आणि लोक-केंद्रित 'आयुष' परिसंस्था उभारण्याच्या तसेच सर्वांसाठी समग्र आणि एकात्मिक आरोग्यसेवेचे सरकारचे ध्येय पुढे नेण्याच्या दृष्टीने केंद्र-राज्य सहकार्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308265)
अभ्यागत कक्ष : 8