उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात ‘ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी आणि टेक इनोव्हेशन फोरम’चे उद्घाटन
भारत दर्जेदार शिक्षण आणि संशोधनासाठी जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे: उपराष्ट्रपती
विद्यार्थ्याना अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचे आणि ‘नशा मुक्त भारता’च्या उभारणीत योगदान देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
Posted On:
04 SEP 2026 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2026
उपराष्ट्रपती आणि पंजाब विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज चंदीगड येथील पंजाब विद्यापीठाला भेट दिली. या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपतींनी 'सोफिस्टिकेटेड ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी/सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन लॅबोरेटरीज' (एसएआयएफ/सीआयएल) येथील 'ॲडव्हान्स्ड इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी'चे उद्घाटन केले. तसेच, त्यांनी 'पंजाब युनिव्हर्सिटी टेक इनोव्हेशन फोरम'चे (पीयू-टीआयएफ)चे देखील उद्घाटन केले.
उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन परिसंस्थेत परिवर्तनकारी बदल घडून आला आहे. दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष यासाठी भारत जागतिक केंद्र म्हणून वेगाने उदयाला येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तरुण संशोधकांना संबोधित करताना, विशिष्ट उद्दिष्टासह विज्ञानाचा ध्यास घेण्याचे, अपयशाच्या प्रसंगी खंबीर राहण्याचे आणि समावेशक, विस्तारक्षम आणि समाजाच्या वास्तविक गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम नाविन्यपूर्ण गोष्टी विकसित करण्याचे त्यांनी आवाहन केले. संशोधनाचा समाजावर अर्थपूर्ण परिणाम झाला पाहिजे असे ते म्हणाले. संशोधक आणि विद्यार्थ्यांनी योग्य दिशेने संशोधन करावे, यामुळे त्याचे फायदे समाजात व्यापक स्तरावर पोहोचतील, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारतासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करताना सी.पी.राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचे आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींनाही याचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.
त्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आवाहन केले की, वर्गात आणि प्रयोगशाळांमधून निर्माण होणाऱ्या कल्पनांचे तरुणांसाठीच्या संधींमध्ये रूपांतर व्हावे आणि त्यामधून 'विकसित भारत' आणि 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनांच्या पूर्ततेला हातभार लागावा. तसेच, पंजाब विद्यापीठाला उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातील जागतिक दर्जाची संस्था बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून, ही गोष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठ परिवाराने उपाय सुचवावेत असे आवाहन त्यांनी केले.
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306760)
अभ्यागत कक्ष : 14