संरक्षण मंत्रालय
16 वे 'एरो इंडिया' प्रदर्शन 8-12, फेब्रुवारी 2027 दरम्यान बंगळुरूमध्ये होणार
www.aeroindia.gov.in या संकेतस्थळावरून 3 सप्टेंबर 2026 पासून ऑनलाइन नोंदणी आणि प्रदर्शनातील जागेचे आरक्षण सुरू होणार
Posted On:
02 SEP 2026 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2026
आशियातील सर्वात मोठे हवाई प्रदर्शन आणि जगातील प्रमुख एरोस्पेस व संरक्षण प्रदर्शनांपैकी एक असलेल्या 'एरो इंडिया'ची 16 वी आवृत्ती कर्नाटकातील बंगळूर येथील येलहंका हवाई दलाच्या तळावर 8 ते 12 फेब्रुवारी 2027 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या 'संरक्षण उत्पादन विभागा'द्वारे आयोजित या कार्यक्रमात जागतिक स्तरावरील आघाडीच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपन्या, धोरणकर्ते, तंत्रज्ञान तज्ज्ञ, नवोन्मेषक, उद्योग क्षेत्रातील संबंधित घटक आणि संरक्षण दलांचे जवान एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
एरो इंडिया हा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रम म्हणून उदयास आला आहे, जो एरोस्पेस, संरक्षण उत्पादन, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील देशाच्या वाढत्या क्षमतांचे प्रदर्शन करतो. हा कार्यक्रम व्यावसायिक संबंध, तंत्रज्ञान आदान-प्रदान, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि धोरणात्मक संवादासाठी एक गतिमान व्यासपीठ प्रदान करतो, तसेच भारताच्या विस्तारत असलेल्या संरक्षण औद्योगिक परिसंस्थेवर आणि जागतिक एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील त्याची वाढती भूमिका अधोरेखित करतो.
पाच दिवसांच्या या कार्यक्रमात एक व्यापक प्रदर्शन आणि विविध व्यावसायिक व धोरणात्मक उपक्रमांचा समावेश असेल, जे उद्योग ते उद्योग संवाद, सरकार-उद्योग सहभाग, तंत्रज्ञान प्रात्यक्षिके आणि सहयोगासाठी संधी उपलब्ध करून देतील. यामध्ये भारतीय हवाई दल आणि सहभागी आंतरराष्ट्रीय उड्डाण पथकांद्वारे नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिके देखील सादर केली जातील, ज्यामुळे उपस्थितांना प्रगत हवाई क्षमता प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळेल.
'एरो इंडिया 2027 साठी प्रदर्शक आणि अभ्यागत यांच्यासाठी सुलभ सहभाग आणि सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक समर्पित वेब-आधारित पोर्टल विकसित करण्यात आले आहे. www.aeroindia.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन नोंदणी आणि प्रदर्शनाच्या जागेचे आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध असेल; प्रदर्शकांची नोंदणी 3, सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.
'एरो इंडिया 2027' मुळे भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेला आणि जागतिक संरक्षण व एरोस्पेस पुरवठा साखळीतील एक विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताच्या उदयाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमामुळे एमएसएमई आणि स्टार्ट-अप्ससह भारतीय संरक्षण उद्योगांचा सहभाग वाढण्यास मदत होईल, तसेच भागीदारी, गुंतवणूक, निर्यात आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्यासाठी नवीन संधी निर्माण होतील.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306124)
अभ्यागत कक्ष : 8