अर्थ मंत्रालय
कृत्रिम अंमली पदार्थांविरुद्धची मोहीम तीव्र करत डीआरआय'ने दोन कारवायांमध्ये सुमारे 18 किलो ॲम्फेटामाइन आणि एमडीएमए जप्त केले, चार जणांना अटक
डीआरआय'ने पंधरवड्यात सुमारे 150 किलो ॲम्फेटामाइन-प्रकारचे उत्तेजक अमली पदार्थ जप्त केले
Posted On:
29 AUG 2026 5:14PM by PIB Mumbai
सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धची आपली सातत्यपूर्ण मोहीम सुरू ठेवत, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने (डीआरआय) अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने 25.08.2026 रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या दोन कारवायांमध्ये, बंगळुरू येथे सुमारे 14.9 किलो ॲम्फेटामाइन आणि पुणे येथे अंदाजे 2.53 किलो ॲम्फेटामाइन तसेच 878८ ग्रॅम एमडीएमए'च्या गोळ्या जप्त केल्या. या सर्वांचे एकत्रित वजन 18 किलोपेक्षा जास्त आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार या दोन प्रकरणांमध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे.
25.08.2026 रोजी, गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या एका कारवाईत, डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकावर एका भारतीय महिला प्रवाशाला अडवले. ती नवी दिल्ली ते बंगळुरू असा रेल्वे प्रवास करत होती आणि तिच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अंमली पदार्थ असल्याची शंका होती.
तिच्या सामानाची सविस्तर तपासणी केली असता, त्यात स्फटिकसदृश पदार्थ असलेली सात पाकिटे सापडली. त्यांचे वजन सुमारे 14.9 किलो होते आणि फील्ड ड्रग डिटेक्शन किट अर्थात घटनास्थळी अमली पदार्थ चाचणी उपकरण वापरून केलेल्या प्राथमिक चाचणीत त्यात ॲम्फेटामाइन असल्याचे दिसून आले. जप्त केलेल्या या सायकोट्रॉपिक पदार्थांबरोबर संबंधित पॅकिंग आणि लपवण्यासाठी वापरलेले साहित्य, एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आले.
डीआरआय अधिकाऱ्यांनी या कारवाईदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपींनी ठरवलेल्या माल पोहोचवण्याच्या जागी त्वरित पुढील कारवाई केली. वाहकाकडून सामान घेण्यासाठी घटनास्थळी आलेल्या एका व्यक्तीला अधिकाऱ्यांनी अडवले. त्यानंतरच्या कारवाईत, पहिल्या व्यक्तीकडून तो प्रतिबंधित माल घेण्यासाठी आलेल्या आणखी एका व्यक्तीलाही पकडण्यात आले. प्रतिबंधित मालाची वाहतूक आणि तो स्वीकारण्याचा प्रयत्न यात सहभागी असलेल्या तिन्ही व्यक्तींना एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली.
25.08.2026 रोजीच गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या दुसऱ्या कारवाईत, डीआरआय'ने पुणे जंक्शन स्थानकावर एका भारतीय महिला प्रवाशाला अडवले. ती दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून पुणेमार्गे रेल्वेने प्रवास करत होती. तिच्या सामानाची सखोल तपासणी केली असता, अंदाजे 2.53 किलो वजनाचा पांढऱ्या/पिवळसर रंगाचा स्फटिकयुक्त पदार्थ (जो ॲम्फेटामाइन असल्याचे मानले जाते) आणि 878 ग्रॅम (एकूण वजन) वजनाच्या गोळ्या (ज्या 3,4 -मिथिलिनडायऑक्सीमेथॅम्फेटामाइन किंवा एमडीएमए असल्याचे मानले जाते) आढळून आल्या. जप्त केलेला हा प्रतिबंधित माल एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आला आणि संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली.
ही जप्तीची कारवाई म्हणजे देशभरात चालणारे अमली पदार्थांचे तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि कृत्रिम अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी डीआरआय'ने तीव्र केलेल्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. गेल्या पंधरवड्यात, डीआरआय 'ने पाच वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे 150 किलो ॲम्फेटामाइन-टाइप स्टिम्युलंट, एटीएस वर्गातील अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये भारताच्या ईशान्य सीमेवरील दोन कारवायांमध्ये जप्त केलेल्या 76 किलो मेथॅम्फेटामाइन गोळ्यांचा आणि सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पाठवल्या जाणाऱ्या मालामध्ये मक्यामध्ये मिसळून लपवून ठेवलेल्या 55.86 किलो मेथॅम्फेटामाइनचा समावेश आहे.
***
माधुरी पांगे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304592)
अभ्यागत कक्ष : 9