अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अंमली पदार्थ विरोधी पथकाने 'ऑपरेशन वज्र 2.0' अंतर्गत मोठ्या आंतर-राज्यीय औषधनिर्माण अवैध वाहतूक टोळीकडून 66.80 लाख सायकोट्रॉपिक गोळ्या केल्या जप्त, एकाला अटक

Posted On: 29 AUG 2026 5:40PM by PIB Mumbai

 

सीबीएन म्हणजेच केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या मध्यप्रदेश विभागाने, नीमचच्या विभागाने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे, सायकोट्रॉपिक गोळ्यांची अवैध वाहतूक आणि तस्करीविरोधात एक  यशस्वी कारवाई केली.

सायकोट्रॉपिक गोळ्यांची अवैध वाहतूक पंजाब - हिमाचल प्रदेश मार्गिकेमार्गे होणार असल्याविषयी मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, सीबीएन मध्यप्रदेश विभागाने आपली टेहळणी वाढवली आणि चंडीगढ-बड्डी या मार्गावर व्यूहरचना केली. ऑपरेशन वज्र 2.0 म्हणजेच, दुसऱ्या टप्प्याअंतर्गत, 27 -28 ऑगस्ट 2026 रोजी कारवाई करण्यात आली.

 

या कारवाईत 66,79,980 सायकोट्रॉपिक गोळ्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या गोळ्यांमध्ये अल्प्राझोलॅम , ट्रामाडोल, नायट्राझेपॅम आणि क्लोनाझेपॅम यांचा समावेश आहे. आवश्यक वैधानिक कागदपत्रांशिवाय या गोळ्यांची वाहतूक केली जात होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, एक SML ट्रकही जप्त करण्यात आला आहे.

27 ऑगस्ट रोजी रात्रभर पाळत ठेवल्यानंतर, या पथकाला उत्तरप्रदेशची नोंदणी असलेल्या या एसएमएल ट्रकमध्ये काहीतरी संशयास्पद आढळले, त्यामुळे त्यांनी सखोल तपासणीसाठी पथकाला एका सुरक्षित स्थळी हलवले.

ट्रकमधल्या मालाची प्रत्येक खोक्यानुसार सखोल तपासणी केली असता त्यामध्ये नियंत्रित सायकोट्रॉपिक पदार्थ असलेली 120 मास्टर कार्टन आढळून आली. या साठ्यात अल्प्राझोलॅम, ट्रामाडोल, नायट्राझेपॅम आणि क्लोनाझेपॅम या औषधांच्या गोळ्यांचा समावेश असून, त्यांची एकूण संख्या 66,79,980 गोळ्या इतकी आहे.

प्राथमिक तपासणीत, बेकायदेशीर औषधपुरवठा साखळी लपवण्यासाठी आणि नियामक यंत्रणेकडून होणारी तपासणी  टाळण्यासाठी जाणीवपूर्वक काही उपाययोजना केल्याचे दिसून आले. ब्लिस्टर स्ट्रिप्स आणि औषधांच्या बॉक्सवरील बॅच क्रमांक, उत्पादनाच्या तारखा आणि एक्सपायरी डेट्स पुसून टाकण्यात आल्या होत्या.

तसेच, “पंजाब-हरियाणा मध्ये विकण्यास प्रतिबंध” असे निर्देश लिहिलेले औषधांचे खोकेही, कुठलीही कागदपत्रे नसताना,  त्या प्रदेशात पाठवले जात असल्याचे आढळले. त्यांची बिले किंवा इतर कागदपत्रेही सोबत नव्हती.  

सविस्तर मालसाठा नोंदणी, तपासणी आणि सीलबंद करण्याची प्रक्रिया रात्री 14 तासांहून अधिक काळ सुरू होती.

एनडीपीएस कायदा, 1985 मधील संबंधित तरतुदींनुसार एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

औषधांची अवैध वाहतूक करणाऱ्या या मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या औषधांच्या बेकायदेशीर उत्पादन व पुरवठ्याच्या मूळ साखळ्या तसेच पुढील वितरणाचे जाळे शोधून ते समूळ उद्ध्वस्त करण्यासाठी सखोल पाठपुरावा तपास सुरू आहे.

“औषधांचा सुरक्षित वापर” आणि “नशामुक्त भारत अभियान (NMBA)” यासाठी, केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभाग, मोहीम राबवत आहे. त्या अंतर्गत, अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांची बेकायदेशीर तस्करी व अवैध वाहतुकीविरोधात प्राप्त होणाऱ्या गुप्त माहितीच्या आधारे अंमलबजावणीच्या कारवाया सातत्याने सुरू आहेत.

चालू वर्षात केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने तस्करीविरोधात जोरदार कारवाई करत, 197 प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवला आहे आणि या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी 272 व्यक्तींना अटक केली आहे.

सिंथेटिक अमली पदार्थांच्या निर्मितीच्या कारवायांविरोधात आक्रमक अंमलबजावणी करत, या विभागाने,यासाठी गुप्तपणे चालविल्या जाणाऱ्या सहा प्रयोगशाळांचा पर्दाफाश केला. याशिवाय, विभागाने केलेल्या व्यापक अंमलबजावणीच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले. यामध्ये सुमारे 51,000 किलो विविध एनडीपीएस अंमली पदार्थ, तसेच तब्बल 12,72,00,000 सायकोट्रॉपिक औषधांच्या गोळ्या आणि कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.

***

माधुरी पांगे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304570) अभ्यागत कक्ष : 17