पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताक दौरा (29 ऑगस्ट - 1 सप्टेंबर 2026)

Posted On: 28 AUG 2026 8:01PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29-30 ऑगस्ट दरम्यान द्विपक्षीय दौऱ्यासाठी उझबेकिस्तानला, तर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत 26 व्या एससीओ शिखर परिषदेसाठी किर्गिझ प्रजासत्ताकाला भेट देतील.

उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 29-30 ऑगस्ट 2026 रोजी ताश्कंदला भेट देतील. पंतप्रधानांचा हा चौथा उझबेकिस्तान दौरा असेल. या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत पंतप्रधान मोदी मिर्झीयोयेव यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. दोन्ही नेते व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, शिक्षण आणि जनतेमधील परस्पर संबंध या क्षेत्रांमधील सहकार्याचा आढावा घेतील आणि सहकार्याच्या पुढील वाटचालीचा मार्ग निश्चित करतील. तसेच 'विकसित भारत 2047' आणि 'उझबेकिस्तान-2030' या सामायिक विकासात्मक संकल्पनांना पुढे नेण्याबाबतच्या विचारांची देवाणघेवाण करतील. पंतप्रधान ताश्कंदमधील शास्त्री स्मारक आणि ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमधील महात्मा गांधी केंद्रालाही भेट देण्याची शक्यता आहे.

ताश्कंदहून पंतप्रधान मोदी किर्गिझ प्रजासत्ताकचे अध्यक्ष सादिर झापारोव यांच्या निमंत्रणावरून 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान बिश्केक येथे होणाऱ्या 26व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होतील. ही शिखर परिषद शांघाय सहकार्य संघटनेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली आहे. भारत 2017 पासून या संघटनेचा पूर्ण सदस्य आहे. पंतप्रधान या शिखर परिषदेला संबोधित करताना भारताची सुरक्षा, संपर्क व्यवस्था आणि संधी या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकतील. पंतप्रधान शिखर परिषदेच्या निमित्ताने एससीओ नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेतील. तसेच मध्य आशियाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या 6व्या जागतिक भटक्या जमातींच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. 

***

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304440) अभ्यागत कक्ष : 15