अर्थ मंत्रालय
ईशान्येकडील सीमेवर दोन मोठ्या कारवायांमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाकडून (डीआरआय) मेथाम्फेटामाइनच्या 76 किलो गोळ्या जप्त
वाहनांमध्ये विशेष प्रकारे बनवून घेतलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये लपवला होता अंमली पदार्थ; दोन जणांना अटक
Posted On:
28 AUG 2026 12:12AM by PIB Mumbai
ईशान्येकडील सीमेवर अमली पदार्थांच्या तस्कराविरुद्धची आपली सातत्यपूर्ण मोहीम पुढे सुरू ठेवत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आसाम आणि मिझोरममध्ये गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या दोन कारवायांमध्ये 76 किलो मेथामफेटामाइन गोळ्या जप्त केल्या आहेत. अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
56 किलो मेथाम्फेटामाइन जप्त
25.08.26 रोजी, गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या ताज्या कारवाईत, डीआरआय च्या अधिकाऱ्यांनी सिलचरच्या आसाम रायफल्सच्या 38 व्या बटालियनच्या, कर्मचाऱ्यांच्या मदतीने आसाम-मणिपूर सीमेजवळ सिलचरपासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या लालपानी येथे एका संशयित 12-चाकी ट्रकला रोखले. मणिपूरमधील जिरीबाम येथून येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या ताफ्यातून अतिशय बारकाईने देखरेख ठेवून हा ट्रक निवडण्यात आला होता.
ट्रकची बारकाईने तपासणी केली असता, चालकाच्या केबिनमध्ये ड्रायव्हरच्या सीटच्या मागे खास तयार केलेला एक गुप्त कप्पा आढळून आला. यामध्ये मेथाम्फेटामाइन असल्याचा संशय असलेली, गुलाबी-केशरी रंगाच्या गोळ्या असलेली 1 किलो वजनाची विटांच्या आकाराची 36 पाकिटे आणि 200 ग्रॅम वजनाची 100 छोटी पाकिटे सापडली.
फील्ड डिटेक्शन किटचा वापर करून नमुन्यांची प्राथमिक चाचणी केली असता, त्यात अँफेटामाइन असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. 56 किलो वजनाच्या जप्त केलेल्या अंमली पदार्थाच्या ट्रकसह एनडीपीएस कायदा, 1985 च्या संबंधित तरतुदींनुसार जप्त करण्यात आला. तसेच या वाहनात असलेल्यांनाही अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी, 18.08.2026 रोजी मिझोरममधील ऐझवाल-चंफई रस्त्यावर गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या दुसऱ्या कारवाईत, DRI च्या अधिकाऱ्यांनी ऐझवालपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या बंग बांगला येथे एका कारला अडवले. वाहनाची सखोल झडती घेतली असता, कारच्या दोन्ही बाजूंच्या रॉकर पॅनेल्स/साइड सिल्समधील खोल कप्प्यांमध्ये आणि इंधनाची टाकी व कारच्या फरशीमधील मोकळ्या जागेत लपवून ठेवलेली मेथाम्फेटामाइन असल्याचा संशय असलेली गुलाबी-केशरी रंगाच्या गोळ्यांची 20 किलो वजनाची 64 विविध आकाराची पाकिटे जप्त करण्यात आली.

20 किलो मेथाम्फेटामाइन जप्त करण्याची कारवाई
एनडीपीएस फील्ड टेस्ट किटचा वापर करून केलेल्या चाचण्यांमध्ये अँफेटामाइन असल्याचा निष्कर्ष निघाला. प्राथमिक तपासातून असे दिसून आले की हे अमली पदार्थ म्यानमारमधून जोखाव्थर-चंफई सेक्टरद्वारे मिझोरममध्ये तस्करी करून आणले गेले होते. 20 किलो अमली पदार्थ त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनासह एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आला. वाहनाच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.
मेथाम्फेटामाइन हे मेंदूवर अतिशय जास्त परिणाम करणारे आणि व्यसनाधीनतेची उच्च शक्यता असलेले मज्जासंस्थेला उत्तेजित करणारे एक शक्तिशाली सिंथेटिक औषध आहे. याच्या अयोग्य सेवनामुळे हृदयविकार, अस्वस्थता, पॅरानोया (अतिसंशय) आणि सायकोसिस (मानसिक संतुलन बिघडणे) यासह गंभीर शारीरिक आणि मानसिक परिणाम होऊ शकतात; तर दीर्घकाळ सेवन केल्याने तीव्र व्यसन आणि मज्जासंस्थेशी संबंधित व वर्तनातील गंभीर बिघाड होऊ शकतो. मेथाम्फेटामाइन हे एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत सायकोट्रॉपिक पदार्थ म्हणून अधिसूचित केले गेले आहे आणि त्याचे बेकायदेशीर उत्पादन, ताबा, वाहतूक व तस्करी केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे.
***
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304102)
अभ्यागत कक्ष : 10