संरक्षण मंत्रालय
भारत – जपान संयुक्त निवेदन
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2026 3:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजीरो कोईझुमी यांच्यात आज, म्हणजेच 20 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीत द्वीपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेले संयुक्त निवेदन खालीलप्रमाणे :
“20 ऑगस्ट 2026 रोजी, जपानचे संरक्षण मंत्री शिंजीरो कोईझुमी आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांच्यात नवी दिल्ली इथे, जपान- भारत संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि जपान यांच्यातले संरक्षणविषयक सहकार्य हळूहळू अधिकाधिक बळकट होत गेल्याचे स्वागत केले. यात, दोन्ही देशांमधील संरक्षण मंत्रालये आणि संरक्षण दले यांचाही समावेश असून, त्यांच्यात सामाईक धोरणात्मक दृष्टिकोन आहे. “भारत आणि जपान यांच्यात विशेष सामारीक आणि जागतिक भागीदारी” अंतर्गत, हे सामाईक आहे. हिंद- प्रशांत क्षेत्रात, शांतता, स्थैर्य आणि समृद्धी नांदण्यासठी ही भागीदारी अत्यंत महत्वाची आहे.
जुलै 2026 मध्ये दोन्ही देशांच्या नेत्यांनी जारी केलेल्या जपान-भारत संयुक्त निवेदनाचे स्मरण करून देत, दोन्ही मंत्र्यांनी मुक्त आणि खुले इंडो-पॅसिफिक क्षेत्र साकारण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
जागतिक पातळीवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांमध्ये प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीबाबतच्या आकलनांची परस्पर देवाणघेवाण करणे महत्त्वाचे आहे, यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती व्यक्त केली. नौवहन आणि हवाई वाहतुकीचे स्वातंत्र्य व सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही एकतर्फी कृती, तसेच बळाचा किंवा दबावाचा वापर करून सद्यस्थितीत बदल घडवून आणण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना त्यांनी तीव्र विरोध दर्शविला.
सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात व्यावहारिक आणि प्रभावी पद्धतीने काम करण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्यावर, दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. त्यानुसार, त्यांनी सागरी सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला तसेच, जपानचे संरक्षण मंत्रालय व भारताच्या संरक्षण मंत्रालयादरम्यान सागरी सुरक्षा सहकार्याबाबतच्या सामंजस्य व्यवस्थेवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या सामंजस्य करारामुळे, सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक पुढे नेण्यासाठी एक निश्चित आराखडा उपलब्ध होणार आहे. विशेषतः, सागरी क्षेत्राविषयीची जागरूकता या क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण करण्यासह, जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स आणि भारतीय नौदलादरम्यानचे सहकार्य अधिक बळकट करण्याचा यात समावेश आहे. तसेच, शोध आणि बचाव आणि मानवतावादी मदत व आपत्ती निवारण यांसारख्या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढविण्यात येणार आहे
नौदलाची जहाजे आणि तुकड्या यांच्यातील परस्पर भेटी, संयुक्त सराव, कर्मचारी तसेच विषयतज्ज्ञांची देवाणघेवाण आणि बंदरांचा वापर, देखभाल व दुरुस्ती सुविधांसह लॉजिस्टिक सहाय्याच्या माध्यमातून सागरी दळणवळण मार्गांच्या संरक्षणासाठी दोन्ही बाजूंमधील समन्वय अधिक बळकट करण्याविषयी, दोन्ही मंत्र्यांनी सहमती व्यक्त केली. अशा प्रकारचे सहकार्य केवळ जपान आणि भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण प्रदेश आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सामरिक तसेच परिचालनविषयक गरजांची पूर्तता करणारे ठोस सागरी सुरक्षा सहकार्य प्रत्यक्षात साकार करण्यासाठी वेगाने कार्यवाही करण्याबाबत दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाले. सुरुंग विरोधी क्षमता सुधारण्यासाठी दोन्ही बाजूंनी अधिकाधिक समन्वय राखावा तसेच आपापल्या संबंधित धोरणांशी सुसंगतता राखत, जपानचे तांत्रिक कौशल्य आणि भारताच्या उत्पादन क्षमतांचा वापर करून नौदल जहाजबांधणी तसेच संरचना यासाठी संयुक्त विकासाच्या संधींचा शोध घ्यावा असे मत त्यांनी नोंदवले. ते पुढे म्हणाले की, दोन्ही देशांनी संरक्षण दलांसाठी जहाजबांधणी तसेच संबंधित क्षेत्रांमध्ये एकमेकांच्या बलस्थानांचा वापर करून घ्यावा आणि जपानतर्फे “मेक इन इंडिया”च्या आराखड्याअंतर्गत भारताच्या उत्पादन क्षमतांच्या वापरासंदर्भातील चर्चा आणखी सखोलपणे घडवून आणावी. नजीकच्या भविष्यात जहाज दुरुस्तीसंदर्भातील कराराची पूर्तता करण्यासह परस्परांसाठी जहाज दुरुस्ती सुविधांची उपलब्धता आणखी वाढवण्याबाबत देखील दोन्ही मंत्र्यांचे सहमत झाले.
जपान आणि भारताच्या लष्कराचा ‘धर्म गार्डियन’ सराव तसेच दोन्ही देशांच्या नौदलांचा “जयमेक्स” हा सागरी सराव या उपक्रमांसह जपान आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय सरावाचा सातत्याने होत असलेला विस्तार आणि वाढती गहनता यांचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. या वर्षी होऊ घातलेल्या “वीर गार्डियन 26” या जपान-भारत हवाई दल सरावासाठी, दोन्ही देशांच्या समन्वयात होत असलेल्या सातत्यपूर्ण प्रगतीचे या दोन्ही नेत्यांनी विशेष स्वागत केले. या “वीर गार्डियन 26” सरावादरम्यान जपानी हवाई स्वयंसंरक्षक दलाचे लढाऊ विमान पहिल्यांदाच भारताला भेट देऊन सरावात सहभागी होणार आहे. अधिक गुंतागुंत, मानवरहित प्रणालींचा समावेश तसेच संधी मिळेल तेव्हा अल्पकालीन सूचनेसह संयुक्त सराव आयोजित करण्यातून द्विपक्षीय सरावांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाले.
दोन्ही देशांच्या संरक्षण दलांतील सहकार्य आणखी वाढवण्याच्या दृष्टीने, दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या संबंधित विशेष कृती दलांमध्ये देवाणघेवाणीला चालना देण्यावर तसेच त्यांच्या स्थापनेनंतर भारताच्या एकात्मिक थियेटर कमांड्ससह सहकार्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत दोन्ही मंत्र्यांमध्ये एकवाक्यता झाली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण साधने आणि तंत्रज्ञान यांच्या हस्तांतरणासाठीच्या आराखड्याच्या जपानने नुकत्याच घेतलेल्या आढाव्याचे स्वागत केले आणि जपान देश हिंद-प्रशांत परिसर तसेच अधिक विस्तृत जगामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी वाढीव योगदान देईल अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण आणि तंत्रज्ञान भागीदारी आणखी दृढ करण्याबाबत स्वतःच्या अपेक्षा त्यांनी विशेषत्वाने व्यक्त केल्या.
दोन्ही देशांमधील पहिला संरक्षण साधने हस्तांतरण प्रकल्प असलेल्या जहाजावरील युनिकॉर्न एकात्मिक संपर्क अँटेना प्रणालीशी संबंधित प्रकल्पाबाबत दोन्ही मंत्र्यांनी आपापले दृष्टीकोन सामायिक केले. सदर प्रकल्प हा संरक्षण साधने आणि तंत्रज्ञान यांच्या हस्तांतरणाच्या क्षेत्रात भारत आणि जपान यांच्या दरम्यान सहकार्य आणखी दृढ होत असल्याचे प्रतीक आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने दोन्ही मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन काम करण्याच्या कटिबद्धतेला त्यांनी दुजोरा दिला.
संरक्षण साधने आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर प्रकल्प प्रत्यक्ष साकारण्याच्या दृष्टीने, दोन्ही देशांच्या संबंधित सेवा दलांमधील 'कार्यन्वयनविषयक गरजां'विषयीची चर्चा पुढे नेण्याबाबत त्यांनी सहमती व्यक्त केली. तसेच, अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील डीआरडीओ आणि एटीएलए यांच्यातील संरक्षण संशोधन व विकास सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतच्या आपल्या कटिबद्धतेचा दोन्ही मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. याशिवाय, 'संरक्षण उद्योग मंच' बैठक आयोजित करण्याच्या आपल्या हेतूवरही दोन्ही मंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले.
या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जपान, भारत आणि इंडोनेशिया यांच्या सहभागाने पार पडलेल्या 'पॅसेक्स' या पहिल्या त्रिपक्षीय नौदल सरावाचे दोन्ही मंत्र्यांनी स्वागत केले.हिंद-प्रशांत क्षेत्राकडे समावेशक दृष्टीकोनातून पाहण्याच्या आणि या क्षेत्रासह जागतिक शांतता आणि स्थिरतेमध्ये संयुक्तपणे योगदान देण्याच्या दृष्टीने, उच्च-स्तरीय संवाद, सराव आणि इतर संबंधित उपक्रमांच्या माध्यमातून तिसऱ्या देशांशी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांच्यात एकमत झाले..
नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी कर्मचारी आणि साहित्याची वाहतूक करून त्याद्वारे भागीदार देशांना मदत करण्याच्या अनुषंगाने, 'इंडो-पॅसिफिक लॉजिस्टिक्स नेटवर्क' (आयपीएलएन) द्वारे सहकार्यात आणखी वाढ करण्याबाबतही दोन्ही मंत्र्यांमध्ये सहमती झाली. या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात जपानच्या संरक्षण मंत्रालयात नियोजित असलेल्या आयपीएलएनच्या दुसऱ्या 'सपाट मैदानावरील सरावाचे' (टेबलटॉप एक्झरसाइझ) त्यांनी स्वागत केले.
जुलै 2026 मध्ये दोन्ही देशांच्या नेत्यांनी जारी केलेल्या 'जपान-भारत संयुक्त निवेदनातील' मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन, या वर्षी टोकियोमध्ये चौथी 'जपान-भारत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय बैठक' (“2+2”) आयोजित करण्याच्या दिशेने चर्चांना गती देण्याबाबतही दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाले.
दोन्ही देशांची सुरक्षा तसेच या प्रदेशातील शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी, गरज भासल्यास जपान आणि भारत यांच्यात चर्चा करण्याबाबतही दोन्ही मंत्र्यांमध्ये सहमती झाली.
प्रत्येक देशाची संबंधित धोरणे आणि सार्वभौम निर्णयांचा पूर्ण आदर राखून; परिचालन, गोपनीय माहिती, उपकरणे, तंत्रज्ञान आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये एकात्मिक पद्धतीने सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी 'महासंचालक' किंवा 'सहसचिव' स्तरावरील प्रमुखांच्या नेतृत्वाखाली एक 'कार्यगट' स्थापन करण्यावर दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाले. हा कार्यगट दोन्ही मंत्र्यांनी मान्य केलेल्या सहकार्याच्या दिशेने समावेशक समन्वय राखेल, सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त समन्वयासह त्यांच्या अंमलबजावणीला गती देईल.
बैठकीपूर्वी, संरक्षण मंत्री कोइझुमी यांनी नवी दिल्ली येथील 'राष्ट्रीय युद्ध स्मारका'वर पुष्पचक्र अर्पण करून युद्धात वीरमरण आलेल्या भारताच्या सैनिकांना आदरांजली वाहिली; यावेळी त्यांना तिन्ही सैन्यदलांच्या संयुक्त 'गार्ड ऑफ ऑनर' द्वारे समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. संरक्षण मंत्री कोइझुमी यांनी मुंबईतील 'वेस्टर्न नेव्हल कमांड' ला (डब्ल्यूएनसी) तसेच 'आयएनएस चेन्नई' या भारतीय युद्धनौकेलाही भेट दिली.
सुषमा काणे/राधिका अघोर/संजना चिटणीस/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301526)
आगंतुक पटल : 11