अर्थ मंत्रालय
वित्तीय सेवा विभागाकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठीचे संमेलन 2026 आयोजित: पहिल्या दिवशीच्या चर्चेत चार संकल्पनांवर भर – ठेवी आकर्षित करणे, युवकांसाठी बँकिंग व्यवस्था, गुंतवणूक चक्राला पाठबळ देणे आणि जागतिक क्षमता केंद्रे
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंगच्या भवितव्यासाठी युवकांवर भर देण्याची गरज केली अधोरेखित
विकसित भारतासाठी, बँकिंग सुधारणा करण्याच्या दृष्टीने लवकरच उच्चस्तरीय समितीची घोषणा: निर्मला सीतारामन
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2026 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2026
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील, वित्तीय सेवा विभागाने आयोजित केलेल्या, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या दोन- दिवसीय संमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी, या सर्व बँकांमधील वरिष्ठ अधिकारी, तसेच सार्वजनिक वित्त सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि केंद्र सरकारमधील अधिकारी तसेच तज्ञ एकत्रित आले होते. या सर्वांनी, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील आगामी संधी आणि धोरणात्मक प्राधान्ये या विषयावर चर्चा केली.
या संमेलनाची संरचना, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्था यांच्यासाठी असलेल्या महत्वाच्या क्षेत्रातील सात संकल्पना लक्षात घेऊन करण्यात आली आहे. विशेषतः, त्यासाठी व्यावहारिक धोरणे आणि समस्यांवर असे उपाय शोधण्यावर भर देण्यात आला आहे, जे उपाय करणे सगळ्या संस्थांना शक्य आणि व्यवहार्य असेल.

या संमेलनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन तसेच वित्तीय सेवा विभागाच्या सचिवांनी संबोधित केले.
युवांसाठी बँकिंग या विषयावर भर देत, वित्तमंत्री म्हणाल्या, की भविष्यातील बँकिंग व्यवस्था भारतातील युवकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असली पाहिजे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 29 टक्के लोकसंख्या 15 ते 29 वर्षे वयोगटातील आहे.
युवांसाठी बँकिंग या विषयावरील चर्चेदरम्यान, युवकांचा व्यापक सहभाग वाढवण्यासाठी युवा व्यवहार विभाग, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) या राष्ट्रीय व्यासपीठाचा वापर करण्याविषयी चर्चा करण्यात आली. माय भारत च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रियांका शुक्ला यांनी तज्ज्ञ वक्त्या म्हणून सहभाग घेतला आणि युवकांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे मत मांडले. 2.60 कोटींपेक्षा अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आणि व्यापक नेटवर्क असलेल्या माय भारतच्या माध्यमातून, युवकांचा औपचारिक वित्तीय व्यवस्थेशी संपर्क अधिक वाढवता येऊ शकतो. तसेच शिक्षणासाठीचे वित्तपुरवठा, उद्योजकता, इंटर्नशिप आणि वित्तीय क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत युवकांमध्ये जागरूकता वाढविण्यासही मदत होऊ शकते, यावर यावेळी चर्चा झाली.

उद्या दुसऱ्या दिवशी तीन संकल्पनांवर आधारलेल्या तीन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे :
त्यामध्ये कृषी आणि फलोत्पादन मूल्यसाखळी पायाभूत सुविधा, प्राधान्य क्षेत्रातील कर्जपुरवठा आणि क्रेडिट कार्ड व्यवसायाची नव्याने संकल्पना यांचा समावेश आहे. त्यानंतर सर्व सात विषयाधारित गटांमधून समोर आलेल्या कृतीयोग्य धोरणांवर आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांवर सादरीकरणे करण्यात येतील.
बँकिंग क्षेत्राने साधलेल्या प्रगतीच्या आधारावर पुढे जात, उदयास येणाऱ्या नव्या संधींसाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब, या संमेलनाच्या आयोजनातून दिसून येते.
या चर्चांचा उद्देश संस्थात्मक क्षमता आणि स्पर्धात्मकता अधिक मजबूत करणे तसेच भारताच्या बदलत्या विकासाच्या आकांक्षांना आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या प्रवासाला प्रभावीपणे पाठबळ देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्था, यांना सक्षम बनवणे हा आहे.

* * *
सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300624)
आगंतुक पटल : 17