कृषी मंत्रालय
कृषिमंत्री शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली 18 ऑगस्टला पुसा इथे ‘शक्तीच्या सप्तधारा’ शपथ अभियान
सहा कोटी लखपती दीदी, मजबूत कृषी व्यवस्था : शक्तीच्या सप्त धारा ग्रामीण विकास कार्यक्रमाला देणार चालना
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2026 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2026
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान उद्या म्हणजेच, 18 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पुसा परिसरात त्यांच्या अखत्यारीतील दोन्ही मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांना ‘सप्त धारा ऑफ शक्ती’ची शपथ देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मांडलेल्या ‘सप्त धारा ऑफ शक्ती’च्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात विविध विभागांच्या आगामी कृती आराखड्याचा आढावा, ‘लखपती दीदी’ कार्यक्रमाचा विस्तार तसेच शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होणार आहे. कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रासाठी स्पष्ट आणि कृतीक्षम आराखडा तयार करून 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने पुढे जाणे, हा या बैठकीचा उद्देश आहे. प्रगतिशील शेतकरी, लखपती दीदी, कृषी निर्यातदार आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रातील प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
“शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांना थेट लाभ मिळावा आणि 2047 पर्यंत विकसित भारत साकारण्याच्या प्रयत्नांना गती मिळावी, हे आमचे उद्दिष्ट आहे. या दिशेने आम्ही विभागांच्या कृती आराखड्यांचा आढावा घेऊन त्यांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी काम करू.” असे चौहान यांनी म्हटले आहे.
जागतिक संकटे आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनुदानीत दरात खतांचा पुरवठा करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. कृषी तसेच सागरी उत्पादनांसह, विशेषतः सी-फूडसाठी, नवीन जागतिक बाजारपेठा आणि संधी निर्माण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
लखपती दीदींच्या संख्येत वाढ करण्यावर भर
ग्रामीण विकास मंत्रालयाचा ‘लखपती दीदी’ कार्यक्रम 18 ऑगस्टच्या बैठकीतील महत्त्वाचा विषय असेल. आतापर्यंत तीन कोटी ग्रामीण महिला लखपती दीदी बनल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संख्या सहा कोटींपर्यंत वाढविण्याचे नवे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
या कार्यक्रमाचा विस्तार करून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या अंमलबजावणी आराखड्यावर चौहान चर्चा करणार आहेत. महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ‘शी-मार्ट्स’ (She-Marts) सारख्या उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. शी-मार्ट्स आणि ब्रँडिंगच्या माध्यमातून योग, आयुर्वेद, हस्तकला तसेच इतर ग्रामीण उद्योगांशी संबंधित उत्पादनांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत व्यापक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण विकासाच्या पुढील टप्प्यात, ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांसाठी अधिक सक्षम बाजारपेठ निर्माण करणे याला सरकारचे प्राधान्य राहणार आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300580)
आगंतुक पटल : 8