संरक्षण मंत्रालय
मैत्री-XV अर्थात भारत आणि थायलंड यांच्यातील संयुक्त सरावाच्या 15व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारतीय सैन्य दल रवाना
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2026 10:59AM by PIB Mumbai
भारत आणि थायलंड यांच्यातील मैत्री-XV अर्थात संयुक्त सरावाच्या 15व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी आज थायलंडला रवाना झाली. थायलंडमधील सुरत थानी येथील विभावडी रंगसित कॅम्पमध्ये 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 दरम्यान हा संयुक्त सराव होणार आहे. या आधीच्या आवृत्तीत मेघालयातील उमरोई येथील संयुक्त प्रशिक्षण नोड (जेटीएन) येथे सप्टेंबर 2025 मध्ये अशाप्रकाचा संयुक्त सराव झाला होता.
भारतीय लष्कर आणि थाई आर्मीच्या तुकडीमध्ये प्रत्येकी 85 जवानांचा समावेश आहे. भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने 9 गोरख रायफल्सची बटालियन करत आहे तर रॉयल थाई आर्मीच्या तुकडीमध्ये पाचव्या डिव्हिजनच्या 25व्या इन्फंट्री ब्रिगेडच्या तिसरी बटालियनच्या जवानांचा समावेश आहे. या संयुक्त सरावात जंगल आणि निमशहरी प्रदेशातील कारवायांवर लक्ष केंद्रित करणारे कंपनी-स्तरीय संयुक्त प्रशिक्षण समाविष्ट असेल.
भारत आणि थायलंड यांच्यातील लष्करी सहकार्य वृद्धिंगत करणे हा मैत्री या सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत जंगल आणि शहरी पर्यावरणातील घुसखोरी / दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्कराची क्षमतावृद्धी होईल. प्रशिक्षणामध्ये मैदानी सराव, लढाऊ विषयांवरील चर्चा, व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि शेवटी एक समारोपात्मक प्रमाणीकरण सराव यांचा समावेश असेल. या सरावादरम्यान दोन्ही सैन्य दले परिचालन अनुभवाची देवाणघेवाण करतील आणि संयुक्त मोहिमांदरम्यान वापरण्यात येणारी अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करतील.
2006 मध्ये सुरू झालेला मैत्री सराव हे भारत आणि थायलंडमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासह लष्करी सहकार्य मजबूत करण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमधील आंतर-कार्यक्षमता, परस्पर सामंजस्य आणि सौहार्द वाढवण्यास मदत होईल तसेच दोन्ही देशांमधील दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.

***
NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300338)
आगंतुक पटल : 13