इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
एनआयईएलआयटीकडून सायबर कुस्ती 2026 चा शुभारंभ: राष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हॅकथॉन वेगाऐवजी निर्णयक्षमतेवर आधारित
हॅकथॉनची अंतिम फेरी सायबर सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक आणि इंटेलिजन्सवरच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेमध्ये (NCCDFI 2026) होणार
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2026 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2026
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेने (NIELIT) 15 ऑगस्ट रोजी सायबर कुस्ती 2026 चा शुभारंभ केला. ही एक राष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हॅकथॉन असून ती सायबर सुरक्षा मूल्यमापनामध्ये मानवी निर्णयक्षमतेची चाचणी घेण्यासाठी आणि त्याला मान्यता देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
निएलिटचे महासंचालक आणि निएलिट अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) एम.एम. त्रिपाठी यांनी सायबर सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इंटेलिजन्सवरच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेची (एनसीसीडीएफआय 2026) अधिकृत समांतर तांत्रिक शाखा म्हणून या हॅकाथॉनचा औपचारिक शुभारंभ केला. ही स्पर्धा राष्ट्रीय सुरक्षा डेटाबेस (एनएसडी) अंतर्गत इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ॲनालिसिस सेंटरच्या (आयसॅक फाउंडेशन) सहकार्याने आयोजित केली जात असून, सर्ट-इन हा या स्पर्धेचा ज्ञान भागीदार आहे. सायबर कुस्ती 2026 साठी नोंदणी 15 ऑगस्ट पासून सुरू झाली असून ती 10 सप्टेंबर 2026 पर्यंत खुली राहणार आहे. यात सहभाग विनामूल्य आहे आणि तीन सदस्यांच्या संघांसाठी विद्यार्थी तसेच स्वतंत्र संशोधकांसाठी खुला आहे.


केवळ शोध नाही, तर निर्णयक्षमतेवर आधारित हॅकथॉन
परंपरागत सायबर सुरक्षा स्पर्धांप्रमाणे ही हॅकॅथॉन केवळ त्रुटी शोधणे किंवा कॅप्चर द फ्लॅग (CTF) आव्हानांवर आधारित नसून, सायबर कुस्ती 2026 ही सहभागींच्या सायबर सुरक्षा निर्णयांचे मूल्यांकन, प्राधान्यक्रम ठरवणे आणि त्याचे समर्थन करणे या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
प्रत्येक सहभागी संघाला एकसारखे आणि मुद्दाम अपूर्ण असलेले सुरक्षा मूल्यमापन पॅकेज दिले जाईल. यात कृत्रिम बुद्धिमत्ता-निर्मित निष्कर्ष, स्थिर विश्लेषण परिणाम, अवलंबित्व आणि गुप्त माहिती स्कॅन, आर्किटेक्चर दस्तऐवज, स्त्रोत कोड आणि अनुप्रयोग नोंदी यांचा समावेश असेल.

या पॅकेजमध्ये चुकीचे, पुनरावृत्ती झालेले आणि खरे निष्कर्ष असतील, तसेच काही वास्तविक त्रुटी मुद्दाम वगळल्या जातील. सहभागी संघांनी सुधारित आणि प्राधान्यक्रमित सुरक्षा मूल्यमापन तयार करणे आणि त्यांच्या निर्णयांचे समर्थन करणे अपेक्षित आहे. स्पर्धेत केवळ खरी समस्या ओळखण्यावरच नव्हे, तर चुकीच्या निष्कर्षांना योग्यरित्या नाकारणाऱ्या संघांनाही गुण दिले जातील.
या प्रसंगी बोलताना, प्रा. (डॉ.) एम. एम. त्रिपाठी म्हणाले, “सुरक्षा क्षेत्रातला सर्वात कठीण भाग आता बदलला आहे. अनेक वर्षे समस्या शोधणे हे दुर्मिळ कौशल्य होते. आज यंत्रणा इतक्या वेगाने निष्कर्ष निर्माण करतात की कोणतीही टीम ते पूर्णपणे वाचू शकत नाही. पण कोणते निष्कर्ष खरे आहेत, कोणते महत्त्वाचे आहेत आणि प्रथम काय दुरुस्त करणे आवश्यक आहे हे सांगणे यंत्रांना अजूनही पूर्णपणे जमत नाही. हीच निर्णयक्षमता आता महत्त्वाचे कौशल्य बनली आहे आणि या स्पर्धेत याचीच चाचणी घेतील जाणार आहे.”
सर्व संघांना एकसारखी साधनांनी तयार केलेली माहिती एकाच वेळी दिली जाणार असल्यामुळे महागड्या सुरक्षा साधनांचा वापर कमी करण्यासाठी ही संरचना तयार करण्यात आली आहे. सहभागी त्यांच्या पसंतीनुसार कोणतीही कृत्रिम बुद्धिमत्ता साधने वापरू शकतील.
प्रा. त्रिपाठी पुढे म्हणाले, “या स्पर्धेत देशाच्या कोणत्याही भागातला महाविद्यालयातील विद्यार्थी कॉर्पोरेट टीमशी समान पातळीवर स्पर्धा करू शकतो. हे जाणीवपूर्वक केले आहे. आम्ही ही स्पर्धा स्वातंत्र्यदिनी सुरू करत आहोत कारण वाढत्या यंत्रक्षमतेच्या युगात दिलेल्या माहितीचे परीक्षण करण्याचा आत्मविश्वास असणे, त्याला विरोध करण्याची क्षमता असणे आणि त्यामागील कारण स्पष्टपणे सांगणे हा स्वातंत्र्याचा नवा अर्थ आहे.”

तीन फेऱ्या: आखाडा, दंगल आणि केसरी
सायबर कुश्ती 2026 ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे:
- फेरी 1 – आखाडा: 15 सप्टेंबर 2026 रोजी ऑनलाइन फेरी आयोजित केली जाईल. या फेरीतून 50 संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील.
- फेरी 2 – दंगल: 24 सप्टेंबर 2026 रोजी ऑनलाइन फेरी आयोजित केली जाईल. या फेरीतून 10 अंतिम फेरीतील संघांची निवड केली जाईल.
- अंतिम फेरी – केसरी: 9 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्ली येथील डाॅ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे प्रत्यक्ष पद्धतीने अंतिम फेरी आयोजित केली जाईल. या फेरीत 10 अंतिम संघ देखरेखीखाली काम करतील. त्यानंतर ते एनसीसीडीएफआय 2026 च्या मुख्य मंचावर आपल्या विश्लेषणाचे सादरीकरण करून त्याचे समर्थन करतील.
अंतिम फेरीदरम्यान, त्याच विश्लेषण सामग्रीचे स्वयंचलित विश्लेषण संघांच्या सादरीकरणासोबत प्रदर्शित केले जाईल. यामुळे यंत्राद्वारे तयार केलेले विश्लेषण आणि तज्ज्ञांचा मानवी निर्णय यामध्ये कुठे साम्य आहे आणि कुठे फरक आहे, हे प्रतिनिधींना पाहता येईल.
सन्मान आणि पुरस्कार
अंतिम फेरीतील संघांचे मूल्यमापन नायलीट आणि आयएसएसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या नामवंत परीक्षक मंडळाकडून केले जाईल. या मंडळात सरकार, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ सायबर सुरक्षा व्यावसायिक आणि तज्ज्ञांचा समावेश असेल. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा माहितीभांडार (एनएसडी) अंतर्गत मान्यताप्राप्त राष्ट्रीय सायबर सुरक्षा तज्ज्ञ यांचाही समावेश असेल.
विजेत्या संघाला `सायबर केसरी 2026` हा किताब देऊन पारंपरिक गदा प्रदान केली जाईल. उपविजेत्या संघांना `रुस्तुम` आणि `पहलवान` हे किताब देऊन गौरविण्यात येईल.
फेरी 1 मधील सहभागींना सहभाग प्रमाणपत्र आणि वैयक्तिक गुणपत्रिका देण्यात येईल, तर फेरी 1 नंतर पुढील फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या सहभागींना एनएसडी मान्यता गुण देण्यात येतील. चुकीचे सादरीकरण करणाऱ्या मात्र सर्वाधिक शिकवण देणाऱ्या सहभागीच्या सादरीकरणाला विशेष पुरस्कारही देण्यात येईल. यामध्ये स्पष्टपणे नोंदवलेल्या आणि शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरणाऱ्या तर्कशुद्ध विचारप्रक्रियेला प्रोत्साहन दिले जाईल.
नियंत्रित आणि सुरक्षित स्पर्धेचे वातावरण
सायबर कुश्ती 2026 मधील सर्व उपक्रम आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या नियंत्रित वातावरणात आयोजित केले जातील. स्पर्धेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागींना कोणत्याही प्रत्यक्ष कार्यरत प्रणाली, तृतीय पक्ष किंवा सार्वजनिक पायाभूत सुविधांशी संपर्क साधण्यास प्रवृत्त केले जाणार नाही किंवा त्यांना तशी परवानगी दिली जाणार नाही.
एनसीसीडीएफआय 2026 विषयी
राष्ट्रीय सायबर सुरक्षा, डिजिटल न्यायवैद्यक आणि गुप्तवार्ता परिषद (एनसीसीडीएफआय) हा सरकार, कायदा अंमलबजावणी संस्था, न्यायव्यवस्था, उद्योग, शिक्षण क्षेत्र, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणणारा बहुविषयक मंच आहे. एनसीसीडीएफआय ची तिसरी आवृत्ती नायलेटद्वारे 9–10 आॅक्टोबर 2026 रोजी नवी दिल्ली येथील डाॅ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित केली जात आहे.

नायलीट (NIELIT) विषयी
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (नायलीट - एनआयईएलआयटी) ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमइआयटीवाय), भारत सरकार अंतर्गत कार्यरत स्वायत्त वैज्ञानिक संस्था असून, कौशल्य विकास आणि डिजिटल सक्षमीकरणाच्या क्षेत्रात अग्रणी संस्था आहे.
56 नायलीट केंद्रे, 700 हून अधिक मान्यताप्राप्त संस्था आणि 8,000 हून अधिक सुविधा केंद्रांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे नायलीटने ई अॅंड आयसीटी क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये लाखो विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणित केले आहे.
नायलीटला शिक्षण मंत्रालयाकडून विशिष्ट श्रेणीअंतर्गत अभिमत विद्यापीठ हा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. रोपार (पंजाब) येथे मुख्य परिसर असून आयझॉल, आगरतळा, कालिकत, छत्रपती संभाजीनगर, गोरखपूर, इम्फाळ, इटानगर, अजमेर, कोहिमा, पाटणा आणि श्रीनगर येथे 11 घटक परिसर आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ई अॅंड आयसीटी क्षेत्रातील उच्च शिक्षणामध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
आयएसएसी प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय सुरक्षा माहितीभांडार विषयी
माहिती सामायिकरण आणि विश्लेषण केंद्र (आयएसएसी प्रतिष्ठान) ही भारतात सेक्शन 8 संस्था म्हणून कार्यरत असलेली नोंदणीकृत ना-नफा तत्त्वावरील सायबर सुरक्षा संस्था आहे. ही संस्था सायबर सुरक्षा, एआय आणि व्यावसायिक नीतिमत्ता या क्षेत्रांवर केंद्रित आहे.
राष्ट्रीय सुरक्षा माहितीभांडार हा माहिती सुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी मान्यता आणि प्रमाणन देणारा उपक्रम आहे.
सीईआरटी इन, जीओआय हे ज्ञान भागीदार आहे.
* * *
नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300157)
आगंतुक पटल : 11