गृह मंत्रालय
80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; सुरक्षित भारताची निर्मिती करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी
सशस्त्र नक्षलवाद्यांचा पराभव झाला आहे, मात्र नक्षली मानसिकता अद्याप कायम
ही नक्षली मानसिकता आपण ओळखली पाहिजे, अशा घटकांना समाजापासून दूर ठेवले पाहिजे आणि देशातील युवा पिढीला विकसित राष्ट्राच्या निर्मितीच्या मुख्य प्रवाहाशी जोडले पाहिजे
Posted On:
15 AUG 2026 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केलेल्या भाषणात सुरक्षित भारताची निर्मिती करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सशस्त्र नक्षलवाद्यांचा पराभव झाला आहे, मात्र नक्षली मानसिकता अद्याप कायम आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, ही नक्षली मानसिकता आपण ओळखली पाहिजे, अशा घटकांना समाजापासून दूर ठेवले पाहिजे आणि देशातील युवा पिढीला विकसित राष्ट्राच्या निर्मितीच्या मुख्य प्रवाहाशी जोडले पाहिजे.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नक्षलवाद आणि माओवादाने लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. तब्बल 4 दशके नक्षलवादाने देशातील मोठ्या भूभागाला आणि तेथील मोठ्या लोकसंख्येला आपल्या विळख्यात ठेवले आणि त्यांना बंदुकीच्या धाकाखाली जगण्यास भाग पाडले. नक्षलवादाने राज्य घटनेच्या अक्षरशः चिंध्या केल्या आणि देशातील सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठीच्या प्रयत्नांत आपल्या 3,500 हून अधिक पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले.
पंतप्रधान म्हणाले की, आज मला समाधान आहे की नक्षलवादी-माओवादी हिंसाचारात कदाचित आता शेवटचा श्वास घेण्याचीही क्षमता उरलेली नाही. ज्या ठिकाणी नक्षलवादी एकेकाळी बंदुका चालवत होते, ज्या भूमीवर एकेकाळी रक्ताचे डाग पडले होते, त्याच नक्षलग्रस्त भागांमध्ये आज विकास, विश्वास आणि प्रयत्नांचा तिरंगा डौलाने फडकत आहे, कारण हे भाग नक्षलवादमुक्त होत आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, सशस्त्र नक्षलवाद्यांचा पराभव झाला आहे, मात्र नक्षली मानसिकता अद्याप कायम आहे. या शक्ती संधीच्या शोधात आहेत. त्या हिंसाचार आणि अराजकतेचे मार्ग शोधत असून, समाजाला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या वापरत आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, ही नक्षली मानसिकता आपण ओळखली पाहिजे. अशा घटकांना समाजापासून दूर ठेवले पाहिजे आणि देशातील युवा पिढीला विकसित राष्ट्राच्या निर्मितीच्या मुख्य प्रवाहाशी जोडले पाहिजे.
पंतप्रधान म्हणाले की, सुरक्षित भारताची निर्मिती करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या सीमांच्या आतून किंवा सीमेपलीकडून आव्हान आले, तरी भारत प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. आज युद्धाचे स्वरूप बदलत आहे. युद्ध केवळ रणांगणावर किंवा सीमेवरच होईल, याची आता कोणतीही हमी राहिलेली नाही.
पंतप्रधान म्हणाले की, आज मी लाल किल्ल्यावरून घोषणा करत आहे की, येणाऱ्या काळात आपण सक्षम नागरी संरक्षणाचे जाळे उभारणार आहोत. आधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञानाने आपल्या नागरिकांना आणि नागरी संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांना सुसज्ज केले जाईल आणि त्यांना आधुनिक सज्जता पद्धतींची माहिती करून दिली जाईल.
* * *
नितीन फुल्लुके/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2300154)
अभ्यागत कक्ष : 54