उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून सेल्युलर कारागृहामध्ये स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन


वीर सावरकर निर्भीड क्रांतिकारक होते, त्यांच्या देशभक्तीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली- उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

Posted On: 08 AUG 2026 9:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2026

 

उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरील सेल्युलर कारागृहाला भेट दिली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात यातना सहन केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी यावेळी आदरांजली वाहिली. हुतात्मा स्तंभावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर, सावरकरांच्या कोठडीत जाऊन त्यांनी अभिवादन केले तसेच स्वातंत्र्य ज्योती, मध्यवर्ती मनोरा, फाशीगृह आणि संग्रहालय व प्रदर्शन दालनाला भेट दिली. स्वातंत्र्यलढ्याची शौर्यगाथा सादर करणारा सोहळा त्यांनी पाहिला.

   

या भेटीदरम्यान बोलताना उपराष्ट्रपतींनी सावरकरांचा उल्लेख अद्वितीय आणि निर्भीड क्रांतिकारक म्हणून केला. त्यांच्या प्रखर देशभक्तीने भारतीय तरुणांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली, असे त्यांनी सांगितले. सेल्युलर कारागृहातील सावरकर यांच्या प्रदीर्घ कारावासाचा आणि त्यांनी सहन केलेल्या कठोर यातनांबद्दल बोलतांना उपराष्ट्रपती म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांना कारागृहात डांबण्यामागे त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश होता. मात्र, सावरकर कधीही खचले नाहीत, उलट अखेरीस ब्रिटिश राजवटीचेच मनोबल खच्ची झाले, असे ते म्हणाले. अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरोधातील लढ्यात सावरकरांनी   दिलेल्या योगदानाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

   

आपला देशाचा सामर्थ्यशाली होण्याचा विचार किंवा तसा प्रयत्न हा इतर देशांवर आपल्या अटी लादण्यासाठी नाही, तर जगातील कोणत्याही देशाने भारतावर आपल्या अटी लादू नयेत, यासाठी देशाला सक्षम करणे हा त्यामागचा उद्देश आहे आणि हेच खरे स्वातंत्र्य आहे, असे राधाकृष्णन आवर्जून म्हणाले. उपराष्ट्रपती दोन दिवसांच्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते हर घर तिरंगा अभियानाच्या प्रारंभासह विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस बेटालाही ते भेट देणार आहेत.

   

 

* * *

शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2296687) अभ्यागत कक्ष : 44