आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सीसीआरएएसच्या 27 व्या नियामक मंडळाची बैठक संपन्न


आयुर्वेदाचे भविष्य तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषामध्ये आहे : प्रतापराव जाधव

तरुण संशोधक आणि स्टार्टअप्सनी आयुर्वेदाला प्रयोगशाळेतून बाजारपेठेपर्यंत नेले पाहिजे : जाधव

प्रविष्टि तिथि: 06 AUG 2026 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026

केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे 'सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस' (CCRAS) च्या  नियामक  मंडळाची 27 वी बैठक पार पडली.

या बैठकीदरम्यान जाधव यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली. यामध्ये पुणे येथील 'प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेतील (RARI) 'ॲनिमल हाऊस' आणि राणीखेत येथील RARI मधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान संकुलाचे आभासी उद्घाटन झाले. तसेच, नागपूर येथील RARI मधील 50 खाटांच्या नवीन आयुर्वेद रुग्णालयाचे भूमिपूजनही त्यांनी केले. याशिवाय, भारताच्या स्थानिक आरोग्य परंपरा, वांशिक-वैद्यकीय पद्धती आणि पारंपरिक पशुवैद्यकीय ज्ञानाचे पद्धतशीर दस्तऐवजीकरण, मूल्यमापन व वैज्ञानिक प्रमाणीकरण करण्यासाठी 'CCRAS-परंपरा' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ त्यांनी केला.

प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 'CCRAS नॅशनल रिसर्च रिकग्निशन' पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये CCRAS 'प्रकाश' (PRAKASA), CCRAS 'नवोन्मेष' (NAVONMESA) आणि CCRAS 'प्रबोध 3 एमटी' (PRABODH 3MT) यांचा समावेश असून, पदव्युत्तर आयुर्वेद संशोधन, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि वैज्ञानिक संवादातील उत्कृष्टतेचा गौरव करणारे हे एक पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. याशिवाय, त्यांनी 'आयुर्-डिक्ट' (Ayur-dict) या CCRAS च्या पहिल्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनचाही शुभारंभ केला. हे ॲप आयुर्वेदातील अनेक शब्दकोशांना एकाच शोधण्यायोग्य प्लॅटफॉर्मवर एकत्र आणते. या बैठकीत मंडळाच्या अलिकडच्या उल्लेखनीय यशाचा आढावा घेण्यात आला, महत्त्वाच्या धोरणात्मक उपक्रमांना मंजुरी देण्यात आली, तसेच पुरावा-आधारित आयुर्वेदाला बळकट करण्याच्या उद्देशाने प्रमुख संशोधन पायाभूत सुविधा आणि डिजिटल उपक्रमांची सुरुवात करण्यात आली.

मंत्री जाधव यांनी नियामक  मंडळाला  संबोधित केले. आयुर्वेद आज एका परिवर्तनीय युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे, जिथे वैज्ञानिक प्रमाणीकरण, नवोपक्रम आणि जागतिक प्रसार  भारताच्या समृद्ध पारंपारिक ज्ञान प्रणालीला पूरक ठरले पाहिजे, असे ते म्हणाले. CCRAS ने पुरावा-आधारित संशोधनाची निर्मिती करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, यावर त्यांनी भर दिला. आयुर्वेदाला अधिक वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम, जागतिक स्तरावर स्वीकार्य व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे बनवण्यासाठी संस्थेने आपले प्रयत्न अधिक तीव्र करावेत, असे आवाहन जाधव यांनी केले.

आयुर्वेदाच्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात तंत्रज्ञान, उद्योजकता आणि बाजारपेठेच्या संलग्नतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे यावर जाधव यांनी भर दिला . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, “आयुर्वेद उपचार घ्या, भारतात बरे व्हा आणि मेक इन इंडिया’ या दूरदृष्टिपूर्ण संकल्पनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, आयुर्वेदाने वैज्ञानिक उत्कृष्टता, प्रमाणीकरण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून एक जागतिक आरोग्यउपचार सेवा म्हणून उदयाला आले पाहिजे. पारंपरिक आणि शास्त्रीय आयुर्वेदिक ज्ञानाची सत्यता आणि मूळ तत्त्वे जतन करत, आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत अधिक सहकार्याला चालना देण्याचे, अनुवादात्मक  संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे; आणि त्याचबरोबर, चिकीत्सात्मक संशोधन, डेटा व्यवस्थापन आणि वैयक्तिक आरोग्यसेवेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी सीसीआरएएसला केले.

आयुर्वेदाचे भविष्य घडवण्यात भारतातील युवकांचे  महत्त्व अधोरेखित करताना जाधव म्हणाले की, आयुर्वेदाला प्रयोगशाळांमधून बाजारपेठेपर्यन्त  आणण्यासाठी  तरुण संशोधक, स्टार्टअप्स, उद्योजक आणि उद्योगांनी सक्रिय भागीदार बनले पाहिजे. त्यांनी संशोधन अनुदान, इनक्युबेशन सहाय्य,  मार्गदर्शन आणि उद्योग भागीदारीद्वारे एक चैतन्यपूर्ण अशी  नवोन्मेष परिसंस्था तयार करण्याचे आवाहन केले. नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताला जागतिक आरोग्य केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी युवा संशोधन निधी, आयुर्वेद स्टार्टअप प्रकल्पांना चालना आणि ‘ग्लोबल आयुर्वेद चॅलेंज’ यासारख्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचनाही त्यांनी केली. आयुर्वेदाला आधुनिक, पुरावा आधारित अर्थात सप्रमाणीत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यासाठी नियामक मंडळाने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी नियामक मंडळाला केले.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा नियामक मंडळाला संबोधित करताना म्हणाले की, " गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा, डिजिटल नवोन्मेष आणि वैज्ञानिक उत्कृष्टता यांच्या माध्यमातून “सप्रमाणीत आयुर्वेद' अधिक बळकट करणारी, संशोधनावर आधारित परिसंस्था विकसित करण्यासाठी मंत्रालय कटिबद्ध आहे. आज सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे संशोधन क्षमता, शैक्षणिक उत्कृष्टता आणि ज्ञानाची उपलब्धता यांत आणखी वाढ होईल."

सीसीआरएएस (CCRAS) चे महासंचालक आणि नियामक मंडळाचे सदस्य-सचिव प्रा. (वैद्य) रविनारायण आचार्य यांनी मंडळाची   आजपर्यंतची कामगिरी आणि भविष्यातील कार्ययोजना सादर केली.

या बैठकीला  सीसीआरएएस (CCRAS) च्या नियामक मंडळाचे सदस्य, आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सीसीआरएएस (CCRAS) चे वैज्ञानिक आणि अधिकारी उपस्थित होते. नियामक मंडळाने परिषदेच्या कामगिरीचे कौतुक केले आणि संशोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम, संस्थात्मक क्षमता तसेच आयुर्वेदाचा जागतिक स्तरावरील विस्तार अधिक बळकट करण्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन केले.

दर्जेदार संशोधन, नवोन्मेष आणि संस्थात्मक उत्कृष्टतेद्वारे पुराव्यावर आधारित आयुर्वेदाला बळकटी देण्याच्या आयुष मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा या बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला. या  बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे सीसीआरएएसच्या  आयुर्वेद संशोधनातील नेतृत्वात आणखी वृद्धी होऊन, त्याच्या जागतिक आरोग्य सेवेतील योगदानाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

सुषमा काणे/वैभवी जोशी/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2295719) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil