आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
चांदीपुरा विषाणूच्या उद्रेकासंदर्भात विविध संस्थांमार्फत तपासकार्य वेगाने सुरु असून केंद्र सरकारकडून 'राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक' (NJORT) तैनात
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2026 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने चांदीपुरा विषाणू आजाराच्या सध्या सुरू असलेल्या उद्रेकाचा सामना अधिक तीव्रतेने करण्यासाठी, गुजरात आणि राजस्थानमध्ये 'राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक' (NJORT) तैनात केले आहे. देशातील प्रमुख संशोधन संस्थांद्वारे निरंतर आणि अधिक सखोल वैज्ञानिक तपास सुरू असून 'एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमांतर्गत' रोगावर सतत देखरेख ठेवली जात आहे. 'राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र '(एनसीडीसी) द्वारे राज्यांमधील देखरेख संस्थांच्या निकटच्या सहकार्याने यात समन्वय साधला जात आहे. या समन्वित प्रयत्नांचा उद्देश विषाणूची प्रसार प्रक्रिया, आजाराची लक्षणे व स्वरूप , महामारीविज्ञान आणि संभाव्य उपचार पद्धती यांबाबत माहिती देणे , तसेच पुराव्यांवर आधारित सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांसाठी मार्गदर्शन करणे हा आहे. राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथकाला सहाय्य करण्यासाठी एनसीडीसीच्या 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी नियंत्रण केंद्र ' (PHEOC) देखील कार्यान्वित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग (DAHD) मधील तज्ञांचा समावेश असलेले बहुशाखीय राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक साथीचा तपास, महामारी विज्ञान संबंधी मूल्यांकन, वैद्यकीय व्यवस्थापन, प्रयोगशाळा समन्वय, रोगवाहक देखरेख आणि सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांच्या अंमलबजावणीत दोन्ही राज्य सरकारांच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करेल. हे पथक राज्य आरोग्य विभागांसोबत मिळून प्रत्यक्ष प्रतिसादाचा आढावा घेईल आणि आपले क्षेत्रीय मूल्यांकन पूर्ण केल्यानंतर मंत्रालयाला शिफारसी सादर करेल.

गेल्या काही वर्षांत चांदीपुरा विषाणूसाठी हाती घेण्यात आलेल्या सर्वात व्यापक वैज्ञानिक तपासांपैकी एकाच्या पार्श्वभूमीवर ही तैनाती करण्यात आली आहे. आयसीएमआर-राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्था (ICMR-NIE), चेन्नई; आयसीएमआर-राष्ट्रीय व्हेक्टर नियंत्रण संशोधन (ICMR-NIVCR), पुदुचेरी; आयसीएमआर-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (ICMR-NIV), पुणे; आयसीएमआर-राष्ट्रीय पूर्व-नैदानिक संशोधन संस्था (ICMR-NIPCR), हैदराबाद; आणि आयसीएआर-राष्ट्रीय पशु चिकित्सा महामारी विज्ञान आणि रोग सूचना विज्ञान संस्था (ICAR-NIVEDI), बंगळूरू येथील तज्ञ, या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या तपासासाठी गुजरात राज्य आरोग्य विभागासोबत निकट समन्वयाने काम करत आहेत.
या सहयोगी उपक्रमात, चांदीपुरा विषाणू संसर्गाचे सौम्य तापापासून ते तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम (AES) पर्यंतचे संपूर्ण क्लिनिकल स्पेक्ट्रम समजून घेण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी पुरावे निर्माण करण्यासाठी महामारी विज्ञान , विषाणू विज्ञान , कीटकशास्त्र, पशुवैद्यकीय विज्ञान आणि प्रयोगशाळा निदान या क्षेत्रांतील तज्ञ एकत्र आले आहेत.
तपासाचा एक भाग म्हणून, बाधित जिल्ह्यांमध्ये तीव्र तापाचा आजार (AFI) आणि तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम (AES) लक्षणे असलेल्या रुग्णांवर सातत्याने पाळत ठेवली जात आहे; तर लक्षणविरहित संसर्गाचा अंदाज घेण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची खरी व्याप्ती जाणून घेण्यासाठी समुदायाधारित सिरो सर्वे (Serosurveys) केले जात आहेत. त्याचबरोबर, प्रयोगशाळेतील पथके निदान चाचण्या अधिक सक्षम करण्यासाठी आणि रोगाच्या पॅथोजेनेसिसबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी सुधारित प्राणी नमुने विकसित करण्याचे काम करत आहेत.
तपासातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे विषाणू संक्रमणाचे चक्र उलगडणे. सँडफ्लाय या चांदीपुरा विषाणूचे प्रस्थापित वाहक असल्या तरी, शास्त्रज्ञ डास, गोचीड (टिक्स) आणि कुंभी (माईट्स) यांसारख्या इतर आर्थ्रोपॉड्स वर्गीय प्राण्यांची संक्रमणातील संभाव्य भूमिका तपासत आहेत. बाधित भागांतून मोठ्या संख्येने गोळा करण्यात आलेल्या वाहक नमुन्यांचे सध्या प्रयोगशाळेत विश्लेषण सुरू आहे. सध्याच्या उद्रेकास जबाबदार असलेला वाहक निश्चित करणे हे वैज्ञानिक तपास पूर्ण होईपर्यंत घाईचे ठरेल, हे लक्षात घेऊन अधिकारी कार्यरत आहेत.
पाळीव प्राण्यांमध्ये हा विषाणू संक्रमित होत आहे का, आणि हे प्राणी संभाव्य साठवण स्थान म्हणून काम करू शकतात का, हे निश्चित करण्यासाठी प्राण्यांवर पाळत ठेवली जात आहे. गायी, म्हशी आणि शेळ्यांच्या रक्ताचे नमुने, तसेच दुधाचे नमुने चाचणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 70 प्राण्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले असून त्यांचे चांदीपुरा विषाणू आणि इतर संबंधित रोगजनकां- (pathogens) साठी विश्लेषण केले जात आहे. प्रयोगशाळेतील तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढता येणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सुरू असलेल्या तपासात गुजरातमधील 2024 मधील चांदीपुरा विषाणू उद्रेकाच्या वेळेस आलेल्या अनुभवांचाही आधार घेतला जात आहे. त्या उद्रेकादरम्यान, सँडफ्लायसह अनेक वाहक प्रजातींचे नमुने गोळा करून त्यांची चाचणी करण्यात आली होती, मात्र सर्व नमुने सीएचपीव्हीसाठी निगेटिव्ह आढळले आणि कोणताही विशिष्ट वाहक निर्णायकपणे यासाठी जबाबदार असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही.
विषाणूमध्ये जनुकीय बदल झाले आहेत का, हेदेखील शास्त्रज्ञ बारकाईने तपासत आहेत. सध्याच्या उद्रेकातील विषाणू नमुन्यांचे संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर (GBRC), गांधीनगर इथे केले जात आहे. प्राथमिक विश्लेषणात किरकोळ जनुकीय बदल आढळून आले आहेत, मात्र सध्या प्रसारित होत असलेला विषाणू पूर्वीच्या उद्रेकांशी संबंधित स्ट्रेन्सपासून उत्क्रांत झाला आहे का, हे निश्चित करण्यासाठी सविस्तर तुलनात्मक जिनॉमिक अभ्यास आवश्यक आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वाढत्या वैज्ञानिक पुराव्यांमध्ये भर घालत, आयसीएमआर-एनआयव्ही, पुणे इथल्या संशोधकांनी आयसीएमआर-राजेंद्र मेमोरियल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्च (ICMR-RMNIHR), पाटणा, बी. जे. मेडिकल कॉलेज (BJMC), अहमदाबाद, पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग तसेच गुजरात सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहकार्याने, "इन्वेस्टिगेशन्स इनटू द आऊटब्रेक ऑफ चांदीपुरा वायरस एन्सिफलॅटिस, गुजरात, इंडिया, 2024" या शीर्षकाचा शोधनिबंध नुकताच प्रकाशित केला आहे. या निबंधात याआधी झालेल्या उद्रेकादरम्यान करण्यात आलेल्या बहुविद्याशाखीय तपासांचा सविस्तर आढावा नोंदविला आहे.
सध्याच्या तपासांना भारताच्या रुग्णालय-आधारित तीव्र मेंदूज्वर सिंड्रोम (AES) देखरेख नेटवर्कचेही पाठबळ मिळत आहे. हा देशभरातील 15 तृतीयस्तरीय रुग्णालयांमध्ये राबविण्यात येणारा बहुकेंद्री, देखरेख कार्यक्रम आहे. प्रमाणित वैद्यकीय प्रोटोकॉल, सेरोलॉजिकल आणि रेण्विक निदान पद्धती तसेच निवडक नेक्स्ट-जनरेशन सिक्वेन्सिंगच्या साहाय्याने हे नेटवर्क उद्रेकांचे निदान अधिक अचूक करण्यासाठी, तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम (AES) कारणमीमांसेविषयी अधिक समजून घेण्यासाठी आणि वेळेवर सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना राबविण्यासाठी आवश्यक असे महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करीत आहे.
राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक तैनात करण्यात आल्याने आणि विविध राष्ट्रीय संस्थांकडून समांतर तपास करण्यात आल्याने, केंद्र सरकारने गुजरात आणि राजस्थानला दिलेले वैज्ञानिक तसेच क्षेत्रीय सहाय्य लक्षणीयरीत्या वाढले आहे. यामुळे मानवी, प्राणी आणि रोग वाहक देखरेख यांचे एकत्रीकरण करणाऱ्या समन्वित "वन हेल्थ" दृष्टिकोनाचे चित्र दिसून येते. या दृष्टिकोनाच्या माध्यमातून चांदीपुरा विषाणूच्या उद्रेकाचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन करून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आशिष सांगळे /सुषमा काणे /रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295168)
आगंतुक पटल : 17