अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 3 कोटी रुपयांच्या 364 मेट्रिक टन बंदी घातलेल्या पाकिस्तानी खारकांचा साठा केला जप्त
कांडला बंदरात यूएईकडून आलेला साठा असल्याची खोटी माहिती जाहीर करून आयात केलेल्या खारकांचे 13 कंटेनर डीआरआयने रोखले, मात्र ही खेप पाकिस्तानमधून आलेली होती
भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2026 4:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026
भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर घातलेल्या बंदीचे उल्लंघन करून भारतात वस्तूंची निर्यात करण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी केलेल्या एका मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचलनालयाने (DRI) त्रयस्थ निर्यातदार देशांमार्फत पाकिस्तानच्या वस्तू गुप्तपणे पाठवण्याचा आणि मूळ निर्यातदार देशाची खोटी माहिती देण्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत 3 कोटी रुपये मूल्याचे 364 मेट्रिक टन (MT) पाकिस्तानी खारकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या एका कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी कांडला बंदरात सुमारे 3 कोटी रुपये मूल्याचे 364 मेट्रिक टन (MT) खारका भरलेले 13 कंटेनर रोखले. तपासात असे दिसून आले की, हा माल यूएई मधून आल्याची माहिती जाहीर केलेली असली , तरी प्रत्यक्षात तो मूळचा पाकिस्तानचा होता.
तपासातून असे स्पष्ट झाले आहे की, हा माल प्रथम पाकिस्तानमधून दुबईला पाठवण्यात आला आणि नंतर भारतात निर्यात करण्यापूर्वी तो दुसऱ्या कंटेनर्समध्ये हलवण्यात आला. आयातदारांनी पाकिस्तानच्या वस्तूंच्या आयातीवरील बंदी टाळण्याच्या उद्देशाने महत्त्वाची माहिती लपवली आणि मूळ देशाची खोटी माहिती दिल्याचे उघडकीला आले आहे. त्यानुसार, सीमाशुल्क कायदा, 1962 च्या संबंधित तरतुदींनुसार ही संपूर्ण खेप जप्त करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात, तुतिकोरिन बंदरात वस्तूचे वर्णन आणि मूळ देशाची खोटी माहिती देऊन सुमारे 1.4 कोटी रुपये मूल्याचे 14 मेट्रिक टन पाकिस्तानी गुग्गुळ रेझिन (गुग्गुळ राळ) आयात करण्याचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला होता. ही खेप सोमालियातून आलेली 'नैसर्गिक राळ' असल्याचे खोटे घोषित करून दुबईमार्गे पाठवण्यात आली होती.
भारत आणि पाकिस्तानच्या शुष्क भागांत आढळणारी गुग्गुळ राळ ही वनस्पती प्रजाती CITES च्या परिशिष्ट II (Appendix II) मध्ये नोंदवलेली असून, IUCN च्या लाल सूचीत (Red list) 'अतिसंकटग्रस्त' म्हणून वर्गीकृत आहे. तपासादरम्यान ही खेप गुग्गुळ राळेचीच असून ती मूळची पाकिस्तानची होती आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून ती पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या कटात सहभागी असलेल्या दोन जणांना अटकही करण्यात आली आहे.
परदेशी व्यापार धोरण 2023 अंतर्गत, DGFT अधिसूचना क्रमांक 06/2025-26 दिनांक 02.05.2025 अन्वये केलेल्या सुधारणेनुसार, पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या किंवा तिथून निर्यात केलेल्या सर्व वस्तूंची थेट किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक 02.05.2025 पासून प्रतिबंधित करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांमधील आयात या बंदीचे उल्लंघन करणारी आढळून आली आहे.
या यशस्वी कारवाया तस्करी, सीमाशुल्क फसवणूक आणि इतर प्रकारच्या बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय व्यापारात गुंतलेल्या संघटित जाळ्यांचा शोध घेणे, त्यांचा नायनाट करणे आणि त्या मोडून काढण्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) सततच्या प्रयत्नांना अधोरेखित करतात.
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2294898)
आगंतुक पटल : 13