कृषी मंत्रालय
आयसीएमआर द्वारे विकसित आफ्रिकन स्वाइन फीव्हर (एएसएफ) या आजारावरील स्वदेशी लस भारताच्या जैव-सुरक्षेला बळकटी देणार
आयसीएआरच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ही लस राष्ट्राला समर्पित
पशुवैद्यकीय लस विकास क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नेणारे हे पाऊल परवडणाऱ्या एएसएफ लसींचा जागतिक पुरवठादार म्हणून भारताचे स्थान बळकट करणार
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2026 6:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2026
आफ्रिकन स्वाइन फीव्हर व्हायरस (एएसएफव्ही) मुळे होणारा आफ्रिकन स्वाइन फिव्हर (एएसएफ), हा जगभरातील पाळीव आणि रानटी डुकरांना प्रभावित करणाऱ्या अत्यंत विनाशकारी आंतरराष्ट्रीय प्राणी रोगांपैकी एक आहे. तीव्र ताप, रक्तस्राव आणि 100 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकणारा मृत्यूदर, ही या रोगाची वैशिष्ट्ये असून, यामुळे जगभरातील डुक्कर पालन क्षेत्राचे मोठे सामाजिक-आर्थिक नुकसान झाले आहे. 2020 मध्ये भारतात पहिल्यांदा आढळल्यापासून, आफ्रिकन स्वाइन फिव्हर (एएसएफ) अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला. परिणामी, मोठ्या प्रमाणावर डुकरे दगावली आहेत, डुक्कर उत्पादनात अडथळे निर्माण झाले, तसेच प्राण्यांची वाहतूक आणि व्यापारावर बंधने आली आहेत. विशेषतः ईशान्य भारतातील छोट्या डुक्कर पालकांच्या उपजीविकेचे मोठे नुकसान झाले आहे. भारतात प्रभावी उपचार किंवा व्यावसायिकदृष्ट्या मान्यताप्राप्त लस उपलब्ध नसल्यामुळे, या रोगाचे नियंत्रण प्रामुख्याने जलद निदान, बाधित प्राण्यांची विल्हेवाट (culling) आणि कठोर जैवसुरक्षा उपाययोजनांवर अवलंबून राहिले आहे.

भारतात एएसएफ च्या उद्रेकांचा आर्थिक परिणाम लक्षणीय राहिला आहे. 2020 आणि 2021 मध्ये आसाममध्ये झालेल्या सुरुवातीच्या उद्रेकांदरम्यान, डुकरांचा मृत्यू आणि त्यांची केलेली विल्हेवाट (culling) यामुळे अंदाजे 276 कोटी रुपयांचे नुकसान झाले. मिझोराममध्ये, एएसएफच्या उद्रेकामुळे 2025 पर्यंत 11,382 हून अधिक कुटुंबांना फटका बसला, परिणामी अंदाजे 982 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. या उद्रेकांनी, या रोगाचा सामना करण्याच्या तयारीला बळकटी देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी आणि देशातील डुक्कर पालन क्षेत्रात लवचिकता निर्माण करण्यासाठी प्रभावी आणि स्वदेशी उपाययोजनेची तातडीची गरज अधोरेखित केली आहे.
या गंभीर आव्हानावर उपाय म्हणून, भोपाळ येथील 'आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस' (आयसीएआर-एनआयएचएसएडी) मधील शास्त्रज्ञांनी डुकरांसाठी भारतातील पहिली स्वदेशी एमए-104 सेल-लाइन' (MA-104 Cell Line) आधारित 'लाइव्ह ॲटेन्युएटेड' आफ्रिकन स्वाइन फीव्हर (एएसएफ) लस विकसित केली आहे.
एमए -104 सेल लाइनमधील अद्वितीय जनुक विलोपनासह नवीन क्षीण एएसएफव्ही जीनोटाइप II विषाणूचा वापर करून विकसित केलेली ही लस पशुवैद्यकीय संशोधन क्षेत्रातील एक मोठे यश असून, मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी योग्य आहे.
या लसीची निर्जंतुकीकरण, शुद्धता, सुरक्षितता, जनुकीय स्थैर्य, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्याची क्षमता, संरक्षणात्मक परिणामकारकता आणि विषाणूची तीव्रता पूर्ववत न होण्याच्या क्षमतेच्या बाबतीत सर्वंकष प्रयोगशाळा मूल्यमापन चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. यासोबतच केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अखत्यारितील पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सहकार्याने या लसीचे प्रत्यक्ष वापराच्या पातळीवरही प्रमाणीकरण करण्यात आले आहे. या प्रक्रियांमधून प्रत्यक्ष वापराच्या परिस्थितीत या लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध झाली आहे. आठ आठवड्यांपेक्षा जास्त वयाच्या सुदृढ डुकरांवर या लसीचा वापर करता येणार आहे. ही लस 1 मिली प्रमाणात स्नायूंमध्ये दिल्या जाणार्या इंजेक्शनद्वारे दिली जाते, त्यानंतर प्राथमिक लसीकरणानंतर 14 दिवसांनी या लसीची वर्धक मात्रा दिली जातै.
या स्वदेशी लसीमुळे डुकरांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणावर कमी होईल, आर्थिक नुकसान टाळता येईल आणि देशभरातील डुक्करपालकांच्या उपजीविकेत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. या लसीमुळे जगातील अत्यंत धोकादायक पशुरोगांपैकी एका रोगाविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना उपलब्ध झाली आहे. परिणामी या लसीमुळे देशभरातील पशु आरोग्य सुरक्षेला लक्षणीय बळकटी मिळेल, तसेच डुक्करपालन क्षेत्राच्या शाश्वत विकासालाही मोठे पाठबळ मिळेल.
कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे (DARE) सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांनी या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. या लसीचा शोध म्हणजे पशुवैद्यकीय विज्ञानातील एका नव्या युगाची पहाट असल्याचे त्यांनी नमूद केले. या शोधातून जागतिक दर्जाची पशु आरोग्य विषयक उपाययोजना विकसित करण्याची भारताची वाढती वैज्ञानिक क्षमता दिसून येते असे ते म्हणाले. या लसीमुळे पशुधनाच्या आरोग्याला बळकटी देणाऱ्या, रोगांना प्रतिबंध करण्यासंबंधीच्या पूर्वतयारीला गती देणाऱ्या तसेच देशाची अन्न आणि जैविक सुरक्षेला आधार देणाऱ्या अत्याधुनिक स्वदेशी लसी आणि नवोन्मेषी तंत्रज्ञानाचा मार्ग प्रशस्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या व्हिएतनाममध्ये आफ्रिकन स्वाइन फीव्हरच्या (ASF - African Swine Fever) केवळ दोनच व्यावसायिक मान्यताप्राप्त लसी उपलब्ध आहेत. या लसी पेटंट असलेल्या विशेष सेल लाईन्सचा वापर करून तयार केल्या जातात. याउलट भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारितील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने (ICAR-NIHSAD - National Institute of High Security Animal Diseases) विकसित केलेल्या या स्वदेशी लसीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या MA-104 या सेल लाईनचा वापर करण्यात आला आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या कसोटीवर हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. यामुळे पेटंट असलेल्या उत्पादन प्रणालींवरील अवलंबित्व संपुष्टात येईल, मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन शक्य होईल आणि उत्पादनावरील खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकणार आहे.
सुषमा काणे/राजश्री आगाशे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2294468)
आगंतुक पटल : 22