पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
ग्लॉ सरोवर ठरले अरुणाचल प्रदेशातील पहिले रामसर स्थळ, भारतातील रामसर स्थळांची संख्या पोहोचली 101 वर
केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी या महत्त्वपूर्ण समावेशाची केली घोषणा, पाणथळ जागांचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत उपजीविका यांच्याप्रति भारताची वचनबद्धता केली अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
03 AUG 2026 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026
अरुणाचल प्रदेशातील ग्लॉ सरोवराला भारताच्या 101 व्या रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्याचे केंद्रीय पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज घोषित केले. राज्याला मिळालेले हे पहिले रामसर स्थळ असून हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 'X' या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये मंत्र्यांनी ही घडामोड म्हणजे जैवविविधता संवर्धन, जल आणि हवामान सुरक्षा तसेच शाश्वत उपजीविकेसाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या रामसर जाळ्याचा उल्लेखनीय विस्तार होत असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. “2014 मधील 26 रामसर स्थळांपासून ते आज 101 पर्यंतचा हा उल्लेखनीय प्रवास पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि शाश्वत विकासाप्रति असलेली आमची अतूट वचनबद्धता दर्शवतो”, असे ते म्हणाले. प्रत्येक नवीन रामसर स्थळ हे निसर्गाचे संरक्षण करण्याचा भारताचा संकल्प अधिक दृढ करते, तसेच या महत्त्वपूर्ण परिसंस्थांवर अवलंबून असलेल्या समुदायांच्या हिताचे रक्षण करते, यावर त्यांनी भर दिला.
या यशाचा आनंद साजरा करताना मंत्री म्हणाले, “रामसर स्थळे नामनिर्देशित करण्याच्या बाबतीत भारताने एक शतक ओलांडले असून आपला प्रवास पुढे सुरूच ठेवला आहे.” ग्लॉ सरोवराच्या समावेशामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या 101 झाली आहे, जे देशाच्या अमूल्य पाणथळ परिसंस्थांच्या संवर्धनाप्रति असलेल्या निरंतर वचनबद्धतेचे द्योतक आहे.
कामलांग व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत असलेले ग्लॉ सरोवर हे पूर्व हिमालयातील एक निर्मळ गोड्या पाण्याचे सरोवर आणि जैवविविधतेचे केंद्र आहे. या सरोवराला बारमाही पर्वतीय झऱ्यांचे पाणी मिळते आणि ते हिरव्यागार वनराईने वेढलेले आहे, ज्यामुळे येथे समृद्ध वनस्पती वैविध्य आढळते. या पाणथळ जागेत आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रात 150 पेक्षा जास्त वृक्षांच्या प्रजाती आणि ऑर्किडच्या 49 प्रजातींची नोंद झाली आहे, जे ग्लॉ सरोवर आणि त्याच्या सभोवतालच्या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करते, अशी माहिती त्यांनी दिली.
माधुरी पांगे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2294107)
आगंतुक पटल : 8