पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 1 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर



आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम येथे पंतप्रधान 17,900 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करणार.

भोगपुरम येथील अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन 

हवाई संपर्क व्यवस्था बळकट करण्याच्या आणि प्रादेशिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने 5,640 कोटी रुपये खर्चून हे अत्याधुनिक 'ग्रीनफील्ड' विमानतळ विकसित 

विमानतळ टर्मिनलची रचना आंध्र प्रदेशातील 'चुट्टिलू' पद्धतीची घरे, अराकू व्हॅली आणि फ्लाईंग फिश या  वैशिष्ट्यांवर आधारित

आंध्र प्रदेशातील पहिल्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पाचीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार पायाभरणी 

पंतप्रधान म्हैसूर येथील श्री रामकृष्ण आश्रमातील 'स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारक'चे उद्घाटन करणार 

स्वामी विवेकानंदांनी नोव्हेंबर 1892 मध्ये म्हैसूरला दिलेल्या ऐतिहासिक भेटीचे स्मरण म्हणून विवेक स्मारकाची उभारणी

मूल्य-आधारित शिक्षण, नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकासाद्वारे  'विवेक स्मारक' तरुणांना  प्रेरणा देणार

प्रविष्टि तिथि: 31 JUL 2026 9:56AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली: 31 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट 2026 रोजी आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम येथे उभारण्यात आलेल्या 'अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळा'च्या प्रवासी टर्मिनल इमारतीची पाहणी करतील. त्यानंतर, सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास, ते या विमानतळाचे उद्घाटन करतील तसेच त्यांच्या हस्ते भोगपुरम येथील 17,900 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन आणि लोकार्पणही करण्यात येईल. यावेळी होणाऱ्या सभेला ते संबोधित करतील. त्यानंतर, दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान म्हैसूर येथील रामकृष्ण आश्रमात 'स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारक'चे उद्घाटन करणार असून या कार्यक्रमातही ते उपस्थितांना संबोधित करतील.

पंतप्रधानांची आंध्र प्रदेश भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील भोगपुरम येथील 'अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे' उद्घाटन करण्यात येणार आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर 5,640 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह विकसित करण्यात आलेल्या या 'ग्रीनफील्ड' विमानतळाची रचना दरवर्षी 60 लाख प्रवाशांची हाताळणी करता येऊ शकेल अशा पद्धतीने करण्यात आली आहे.

या विमानतळाच्या प्रवासी टर्मिनल इमारतीची रचना प्रवाशांना आधुनिक, सुखकर आणि कार्यक्षम प्रवास अनुभवता येईल अशा उद्देशाने करण्यात आली आहे. कार्यान्वयन कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच भविष्यातील विमान वाहतुकीच्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी या विमानतळामध्ये प्रगत पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

हे विमानतळ कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (बीआयएम), एअरसाइड 4.0 तंत्रज्ञान, एअरपोर्ट प्रेडिक्टिव्ह ऑपरेशन्स सेंटर (एपीओसी), बायोमेट्रिक प्रवासी प्रक्रिया, स्वयंचलित बॅगेज हाताळणी प्रणाली आणि इंटेलिजंट कार्यान्वयन देखरेख उपाययोजना यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या प्रणालींमुळे परिचालन कार्यक्षमता वाढण्याबरोबरच प्रवाशांची सोय आणि सुरक्षाही वाढणार असल्याने संसाधनांचा अधिक प्रभावीपणे वापर होईल अशी अपेक्षा आहे.

या प्रकल्पामध्ये ऊर्जा-कार्यक्षम एचव्हीएसी ( हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग) प्रणाली, ऊर्जा-कार्यक्षम प्रकाश योजना, 5 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, पावसाच्या पाण्याचे संकलन (रेनवॉटर हार्वेस्टिंग), स्मार्ट बिल्डिंग व्यवस्थापन प्रणाली, कचरा व्यवस्थापन उपक्रम, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा आणि पर्यावरण देखरेख उपाय यांसारख्या अनेक पर्यावरणपूरक शाश्वत वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या टर्मिनलची रचना 'ग्रीन बिल्डिंग' मानकांनुसार करण्यात आली असून, त्याची 'यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिल' (युएसजीबीसी) कडे नोंदणी करण्यात आली आहे.

या विमानतळाची वास्तुरचना आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक वारशापासून प्रेरणा घेऊन केली गेली आहे. टर्मिनलच्या छताची रचनेतून 'चुट्टिलु' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक झोपड्या आणि अराकू खोऱ्यातील निसर्गदृश्यांचे दर्शन घडते; त्याच वेळी, त्याचा लयबद्ध आकार 'फ्लाइंग फिश'च्या (उडणाऱ्या माशाच्या) डौलदार हालचालींचे प्रतीक असून याद्वारे प्रादेशिक वास्तुकलेची वैशिष्ट्ये आणि आधुनिक विमानतळ रचनेचा यांचा सुरेख संगम साधला गेला आहे. या विमानतळामुळे आंध्र प्रदेशातील पर्यटन, व्यापार, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळण्यासोबतच, या भागातील हवाई संपर्क व्यवस्थाही अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान विशाखापट्टणम येथे 460 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून विकसित करण्यात येत असलेल्या 'एएसआयपी सेमीकंडक्टर प्रकल्पा'ची पायाभरणी करतील. हा प्रकल्प 'एएसआयपी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड'द्वारे दक्षिण कोरियातील 'एपॅक्ट' च्या भागीदारीतून विकसित करण्यात येत आहे. 'इंडिया सेमीकंडक्टर मिशन' अंतर्गत मंजूर करण्यात आलेला हा आंध्र प्रदेशातील पहिलाच सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये दरवर्षी सुमारे 96 दशलक्ष सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन केले जाणार असून त्यामुळे उच्च-कौशल्यासाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत; तसेच, सेमीकंडक्टर निर्मितीला पूरक ठरणारी भक्कम सहाय्यक परिसंस्था विकसित करण्यासही यामुळे चालना मिळेल.

पंतप्रधानांच्या हस्ते 'कुर्नूल-4 नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र (आरईझेड) - टप्पा-I (4.5 गिगावॅट)' चे पारेषण प्रणालीशी (ट्रान्समिशन सिस्टम) एकत्रीकरण करण्यासाठीच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे; सुमारे 5,550 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 'पॉवरग्रीड' द्वारे 'विशेष उद्देशीय वाहका'च्या (एसपीव्ही) माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे.

सुमारे 3,550 कोटी रुपये खर्चून साकारण्यात येत असलेल्या कुर्नूल पवन ऊर्जा क्षेत्र / सौर ऊर्जा क्षेत्राच्या (आंध्र प्रदेश)  भाग 'अ' आणि भाग 'ब' साठीच्या पारेषण प्रणालीचे, तसेच पॉवरग्रिडद्वारे 820 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्चून साकारण्यात आलेल्या अनंतपुरम (2,500 मेगावॅट) आणि कुर्नूल (1,000 मेगावॅट) येथील सौर ऊर्जा क्षेत्रासाठीच्या पारेषण योजनेचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

या पारेषण प्रकल्पांमुळे कर्नूल आणि अनंतपुरम येथील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांत निर्माण होणारी वीज बाहेर नेण्यास आणि 'नॅशनल ग्रिड'द्वारे देशभरातील लाभार्थ्यांपर्यंत ती पोहोचवणे शक्य होईल. यामुळे ग्रिडमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीकरणीय ऊर्जेचा समावेश करणे सुलभ होईल, मागणी असलेल्या केंद्रांना स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता अधिक सुलभ होईल तसेच जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी होऊन भारताच्या ऊर्जा संक्रमण आणि 'डीकार्बोनायझेशन' (कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या) प्रयत्नांना हातभार लागणार आहे.

पंतप्रधान 1,880 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. राष्ट्राला अर्पण करण्यात येणार असलेल्या या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग-365BG वरील रेचेर्ला ते गुरुवायगुडेम आणि गुरुवायगुडेम ते देवरापल्ले या टप्प्यांवरील चार-पदरी 'ॲक्सेस-कंट्रोल्ड' ग्रीनफील्ड महामार्ग, तसेच एनएच-67 वरील चार-पदरी ताडीपत्री बायपासचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पंतप्रधानांच्या हस्ते एनएच-565 वरील पेन्चालकोना-येरपेडू टप्प्यातील लिंगसमुद्रम येथील अधिक उंचीच्या पुलाची पायाभरणीही करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विजयवाडा आणि इतर अनेक शहरांमधील वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच रस्ते सुरक्षा सुधारण्यासह विशाखापट्टणम आणि हैदराबाद दरम्यानच्या प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होईल आणि प्रादेशिक संपर्क व्यवस्थाही अधिक बळकट होईल.

पंतप्रधानांच्या कर्नाटक भेटीतील कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात म्हैसूर येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे उद्घाटन करतील.

स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या भारत भ्रमण दरम्यान नोव्हेंबर 1892 मध्ये म्हैसूरला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे 'विवेक स्मारक' उभारण्यात आले आहे. या भेटीतील वास्तव्याच्या काळात त्यांनी व्याख्याने दिली होती तसेच विद्वान आणि भाविकांशी संवाद साधला होता; त्यांना महाराज श्री चामराजेंद्र वाडियार (दहावे) यांनी केलेल्या मदतीमुळे, 1893 मध्ये शिकागो येथील 'धर्म-परिषदे'ला जाणे शक्य झाले होते .

ऐतिहासिक 'निरंजन मठ' येथे 81,000 चौरस फुटांहून अधिक जागेवर बांधण्यात आलेल्या या 'विवेक स्मारकात' मुख्य इमारत आणि जोड-इमारतीचा (ॲनेक्स ब्लॉक) समावेश आहे. या केंद्रात '4-डी अनुभव केंद्र', प्रदर्शन कक्ष, सुमारे 700 प्रेक्षकांची आसनक्षमता असलेले प्रेक्षागृह (ॲम्फीथिएटर), वर्गखोल्या, परिषद कक्ष, ग्रंथालय, वाचन कक्ष, ध्यान व योग कक्ष आणि पुस्तक विक्री केंद्र आहे. तसेच, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथे खास सुविधांचीही सोय करण्यात आली आहे.

स्वामी विवेकानंद यांचे जीवन, संदेश आणि आदर्श यांना समर्पित असलेले हे 'सांस्कृतिक युवा केंद्र' , मूल्य-आधारित शिक्षण, नेतृत्व विकास आणि व्यक्तिमत्त्व घडण यांसाठीचे प्रेरणादायी केंद्र म्हणून काम करेल. राष्ट्रनिर्मिती आणि चारित्र्य-घडण यांविषयीच्या स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानावर आधारित व्याख्याने, कार्यशाळा, अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आणि क्षमता-बांधणी कार्यक्रम यांच्या माध्यमातून, परिसरातील शैक्षणिक संस्थांमधील 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांना तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांना याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

***

अंबादास यादव/मंजिरी गानू/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2292227) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Telugu , Kannada , Malayalam