पंतप्रधान कार्यालय
'मन की बात'च्या 136 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (26.07.2026)
प्रविष्टि तिथि:
26 JUL 2026 12:08PM by PIB Mumbai
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार.
आपल्या जीवनात काही दिवस असे असतात की जे लक्षात ठेवण्यासाठी कॅलेंडर-दिनदर्शिका पाहण्याची गरज भासत नाही. आज, 26 जुलै हा असाच एक विशेष दिवस आहे. आज 'कारगिल विजय दिवस' आहे. हा दिवस आपल्या प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना जागवतो. हा दिवस आपल्या वीर जवानांच्या अद्वितीय शौर्याची आणि अतुलनीय पराक्रमाची आठवण करून देतो. कारगिलची उंचच उंच शिखरं, प्रतिकूल हवामान आणि शत्रूचं कठीण आव्हान-प्रत्येक संकट आपल्या सैनिकांसमोर उभं होतं. पण त्यांचा ताठ कणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास कोणत्याही आव्हानापेक्षा मोठा ठरला. त्यांनी भारतमातेच्या संरक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आज 'कारगिल विजय दिवसा'निमित्त मी सर्व वीर हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना आदरानं प्रणाम करतो.
मित्रांनो, आजचा भारत आपल्या वीरांचं केवळ स्मरणच करत नाही, तर त्यांच्या शौर्यगाथाही नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहे. याच भावनेतून यंदा विशेष 'शौर्य विजय यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. 14 जुलै रोजी दिल्लीच्या 'नॅशनल वॉर मेमोरियल' या राष्ट्रीय युद्ध स्मारका वरून सुरू झालेली ही दुचाकी फेरी, द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकापर्यंत पोहोचेल. ‘वन राइड, वन नेशन, वन सॅल्यूट' - एक यात्रा, एक राष्ट्र, एक सलाम हा या यात्रेचा संदेश आहे. राष्ट्रासाठी दिलेलं बलिदान कधीही विसरता येत नाही, याची जाणीव ही यात्रा आपल्याला करून देते.
मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या शौर्याबरोबरच स्वतःची तांत्रिक क्षमता देखील सातत्यानं बळकट करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ही युद्धनौका समाविष्ट करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेची रचना भारतातच केली गेली आहे आणि उभारणीही भारतातच झाली आहे. यात 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर झाला आहे. हे 'आत्मनिर्भर भारत'च्या वाढत्या शक्तीचं प्रतीक आहे. याच महिन्यात डीआरडीओ या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं, 'पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेट', या दीर्घ पल्ल्याच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी केली. या यशामागे आपल्या शास्त्रज्ञांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक परिश्रम आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वीच डीआरडीओनं 'कुश' या क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी घेतली आहे.
मित्रांनो, आज संरक्षण उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांसोबतचं राजकीय सहकार्य असो – भारत सातत्यानं नवी उंची गाठत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो. इथे ब्राह्मोस आणि अस्त्र क्षेपणास्त्रांसाठी एक मोठा करार झाला आहे. भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावरील जगाचा विश्वास वाढत आहे. चला, या 'कारगिल विजय दिवसा’ निमित्त आपण आपल्या अमर हुतात्म्यांना नमस्कार करूया आणि सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर-स्वावलंबी भारताच्या उभारणीचा आपला निर्धार अधिक दृढ करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 'मन की बात'च्या गेल्या भागात मी तुमच्याशी 'कॅच द रेन'- पावसाचं पाणी अडवण्याच्या मोहिमेविषयी चर्चा केली होती. पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याच्या या मोहिमेला लोकचळवळ बनवण्याचं आवाहन मी केलं होतं. 'कॅच द रेन'चा संदेश अतिशय सोपा आहे – जिथे पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, पाणी तिथेच साठवा. म्हणूनच 4 जुलैपासून देशभरात एक विशेष मोहीम राबवली जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याचं संकलन, भूजल पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी गती दिली जात आहे. मला अत्यंत आनंद होत आहे की, गावं असोत की शहरं, पंचायती असोत की सामाजिक संस्था – सर्वत्र लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आहे. कुठे जुन्या तलावांमधील गाळ काढला जात आहे, तर कुठे विहिरी आणि बारवांना पुन्हा नवसंजीवनी दिली जात आहे. बंद पडलेले बोअरवेल-नलकूप आता भूजल पुनर्भरण करण्याचं माध्यम बनत आहेत.
मित्रांनो, मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात सुमारे दीड हजार तलाव निर्माण करण्यात आले आहेत. नरसिंगपूरमध्ये 'अमृत सरोवरं' विकसित करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंद्यालमध्ये सर्व ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या असून, तेथील जुन्या तलावांचं पुनरुज्जीवन करून त्यांचा पुन्हा उपयोग सुरू करण्यात आला आहे. आपली शहरही मागे नाहीत. छत्तीसगडमधील कोरबा, ओदिशामधील भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशातील विजयनगरम इथेही या अभियानाचे उत्साहवर्धक परिणाम दिसून येत आहेत. चला, आपणही आपल्या परिसरातील एखाद्या तलावाची, विहिरीची किंवा बारवाची जबाबदारी स्वीकारूया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा निश्चय करूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब हा येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याची सर्वात मोठी पुंजी ठरेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमधील ग्लासगो इथे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांना सुरुवात झाली आहे. प्रत्येक देशवासीय भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे. आपल्या सर्व खेळाडूंनी आणि ॲथलीट्सनी उत्कृष्ट कामगिरी करावी, तसच आपल्या खेळभावनेनं सर्वांची मनही जिंकावीत, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मित्रांनो, आपल्या तरुणांनी अलिकडच्या दिवसांत क्रीडा क्षेत्रात अनेक नेत्रदीपक यश मिळवलं आहे. पी. व्ही. सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानही लंडनमधील लॉर्ड्स मैदानावरील आपला पहिला कसोटी सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. आपल्या संघानं 270 धावांच्या मोठ्या फरकानं हा सामना जिंकला आहे. पण गोष्ट एवढ्यावरच संपत नाही; लॉर्ड्सच्या प्रदीर्घ इतिहासात महिला संघाचा हा पहिलाच कसोटी सामना होता. 1983 मध्ये याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आता आपल्या महिला शक्तीनं इथे देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे.
मित्रांनो, काही लहान प्रयत्न असे असतात जे खूप महत्त्वाचे असतात. मला केरळमधील एर्नाकुलमच्या दक्षिण चित्तूरमधील क्रीडा क्षेत्रातील अशाच एका प्रयत्नाबद्दल माहिती मिळाली आहे. तिथल्या एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष जी अतिशय अनोख्या पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय करत आहेत. या प्रकल्पाला 'अक्षरकंदुकम्' असं नाव देण्यात आलं आहे. यामध्ये, संस्कृतमधील अक्षरं फुटबॉलमध्ये वापरल्या जाणाऱ्या संज्ञांशी जोडून अतिशय सोप्या पद्धतीनं शिकवली जातात. त्यामुळे शिकणं आनंददायक तर होतच आणि त्याचबरोबर खेळांशीही लोकांची नाळ जोडली जाते.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या रविवारी ‘विक्रम-1’च्या यशस्वी प्रक्षेपणानं प्रत्येक देशवासीयाचा ऊर अभिमानानं भरून आला आहे. आपण सर्वजण भारतीय अंतराळ क्षेत्रातील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनलो. खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलं गेलेलं हे भारताचं पहिलं रॉकेट-प्रक्षेपक आहे. आपल्या तरुण नवसंशोधकांनी कल्पनेपलीकडची कामगिरी साध्य करून दाखवली आहे. त्यांनी आपल्या अफाट कौशल्याचा, जिद्दीचा आणि संयमाचा परिचय दिला आहे. बराच काळ भारतातील अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुलं नव्हतं. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या अनेक तरुणांना आपल्या प्रतिभेला वाव देण्याची संधी मिळत नव्हती. तरुणांच्या आकांक्षा लक्षात घेऊन आपण अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज या निर्णयाचे सकारात्मक परिणाम संपूर्ण जग पाहत आहे.
मित्रांनो, आपल्या तरुण पिढीनं विज्ञान क्षेत्रातही भारताची मान अभिमानानं उंचावली आहे. 'सायन्स ऑलिम्पियाड्स', या जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक मानल्या जातात. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी होतात. याच महिन्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये भारतीय संघाची कामगिरी शानदार राहिली. भौतिकशास्त्र-फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये आपल्या पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं जिंकली आणि भारतानं पहिला क्रमांक पटकावला. गेल्या एका दशकात झालेल्या प्रत्येक फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये आपल्या देशातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण किंवा रौप्यपैकी एखादं पदक तरी हमखास जिंकलं आहे. केमिस्ट्री-रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं. ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. बायॉलॉजी-जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे, तर मॅथेमॅटिक्स-गणित ऑलिम्पियाडमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि चार रौप्य पदकं आपल्या नावे केली. मला देशाच्या युवा शक्तीचा खूप अभिमान वाटतो. भारतात ऑलिम्पियाड्स आणि हॅकाथॉनची संस्कृती निरंतर वाढत आहे हे पाहून आनंद होतो. मला पूर्ण विश्वास आहे की, देशातील अधिकाधिक तरुण अशा व्यासपीठांवर आपलं कौशल्य सिद्ध करतील आणि जगभर भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा कौशल्याला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द साथ देते, तेव्हा कोणतीही वाट कठीण राहत नाही. काश्मीरमधील पारंपरिक 'वगू' चटईच्या पुनरुज्जीवनासाठी आज होत असलेल्या प्रयत्नांमध्ये याचीच प्रचीती येते. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून तयार केली जाते. ही चटई बनवण्याची परंपरा वर्षानुवर्षे जुनी आहे. यासाठी सर्वात आधी काश्मीरच्या दलदलीच्या भागातील गवत आणि लव्हाळ्याची कापणी केली जाते. लव्हाळा आणि भाताचा पेंढा उन्हात वाळवल्यानंतर त्याची वर्गवारी केली जाते. त्यानंतर हातानं विणण्याचं काम सुरू होतं. दोन कारागिरांना एक चटई तयार करण्यासाठी सुमारे चार दिवस लागतात. ही चटई केवळ अनोखीच नाही, तर पर्यावरणपूरक देखील आहे. याचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात ती थंड राहते आणि हिवाळ्यात उबदारपणा देते! पूर्वी ही चटई काश्मीरमधील प्रत्येक घरात दिसायची, पण गेल्या काही वर्षांत तिचा वापर कमी झाला होता. अशा स्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसैन जी आणि त्यांची मुलगी तंजिला जी यांनी एक निश्चय केला. दोघेही 'वगू' कला परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामाला लागले. गुलाम हुसैनजी अतिशय साध्या कुटुंबातून आले आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण 'वगू' च्या संवर्धनाचा त्यांचा निर्धार कधीही डळमळला नाही. बघता बघता त्यांच्या या प्रयत्नांत अनेक लोक सहभागी झाले. गुलाम हुसैन जी यांनी या कौशल्याचा विस्तार केला. आपल्या या मोहिमेत त्यांना स्थानिक पातळीवर सरकारी सहकार्यही मिळालं. आज वेगानं लोकप्रिय होणारी 'वगू' देशाच्या इतर भागांतही पोहोचत आहे. मला या प्रयत्नात सहभागी सर्व लोकांचा खूप अभिमान वाटतो आहे. आज आपण सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. आपण 'व्होकल फॉर लोकल'-खरेदीत स्थानिक उत्पादनांचा आग्रहचा मंत्र घेऊन पुढे जात आहोत. अशा वेळी काश्मीरच्या पारंपरिक 'वगू' चटईला आपल्या घरात स्थान मिळावं, याचा आपण नक्की विचार करावा.
मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही – तो जिव्हाळ्याचा विषय आहे! सकाळची सुरुवात असो, मित्रांची भेट असो किंवा कुटुंबासोबत काही क्षण घालवणं असो, 'चहा' प्रत्येक प्रसंगाचा भाग बनतो. तसं तर चहाशी माझं काय नातं आहे, हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे! पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे, त्यानं केवळ स्वादच दिला नाही, तर अनेक बहिणींच्या जीवनात स्वावलंबनाचा नवा सुगंधही पसरवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील बचत गटांमध्ये सहभागी महिलांनी 'विदुर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी' हा औषधी वनस्पतींपासून बनवलेला चहा तयार केला आहे. यामध्ये गवतीचहा, गुळवेल, ज्येष्ठमध, तुळस, ओली हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यांसारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश आहे. आपल्या अनोख्या स्वाद आणि गुणांमुळे या चहानं अतिशय कमी वेळात लोकांमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रयागराजच्या महाकुंभ आणि दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सवामध्ये या हर्बल चहाचं खूप कौतुक झालं आहे. परदेशातून आलेल्या लोकांनीही यात रस दाखवला आहे.
मित्रांनो, सर्वात प्रेरणादायक बाब म्हणजे या उपक्रमाची सुरुवात. हा संपूर्ण प्रयत्न अवघ्या एक लाख रुपयांपासून सुरू झाला होता. आज हा ब्रँड देशातील अनेक मोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. हा उपक्रम आपल्याला सांगतो की, जेव्हा स्थानिक ज्ञान, निसर्ग आणि महिलांचा आत्मविश्वास एकत्र येतो, तेव्हा छोटासा प्रयत्नही मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज देशभरात 'एक पेड माँ के नाम' मोहिमेच्या माध्यमातून नागरिक निसर्गाप्रती आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. जेव्हा संपूर्ण समाज या भावनेशी एकरूप होतो, तेव्हा अनेक सुंदर आणि प्रेरणादायक उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, अहमदाबादमध्ये लोकसहभागाची अद्भुत शक्ती पहायला मिळाली. भाडज परिसरात अवघ्या एका तासात साडेतीन लाखांहून जास्त रोपं लावण्यात आली. या उपक्रमात 25 हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. शाळकरी मुलं, एनसीसी कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांनी उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभाग नोंदवला. येत्या काही वर्षांत ही रोपं दाट शहरी जंगलाचं रूप धारण करतील. या उल्लेखनीय उपक्रमाची नोंद 'गिनीज जागतिक विक्रमा' मध्येही झाली आहे. मित्रांनो, 'एक पेड माँ के नाम' मोहिमे अंतर्गत उत्तर प्रदेशातही लोकशक्तीचा अद्भुत संकल्प पाहायला मिळाला. तिथे 12 जुलै रोजी अवघ्या एका दिवसात 35 कोटींहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. उत्तर प्रदेशचा खासदार म्हणून ही बाब माझ्यासाठी विशेष अभिमानाची आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, झाडं केवळ माणसांसाठीच नसतात; ती असंख्य जीवांचं आश्रयस्थानही असतात. गुजरातमधील गीर जंगलात तब्बल 60 वर्षांनंतर 'इंडियन ग्रे हॉर्नबिल'-भारतीय राखाडी धनेश या पक्ष्यानं पुन्हा आपला अधिवास निर्माण केला आहे. गीरमध्ये अनेक वर्षांपासून सातत्यानं सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांचं हे फलित आहे. हॉर्नबिलला जंगलाचा 'शेतकरी' असही म्हटलं जातं. हा पक्षी फळं खातो आणि त्यांतील बिया दूरवर पसरवतो. त्या बियांपासून जंगलात नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे हा छोटासा पक्षी जंगल पुन्हा हिरवेगार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. मी तुम्हा सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की, आपल्या आयुष्यातील प्रत्येक विशेष प्रसंग निसर्गाशी जोडण्याचा निर्धार करूया. 'एक पेड माँ के नाम' अभियाना अंतर्गत एक झाड नक्की लावा. आज लावलेलं एक छोटसं रोप उद्याच्या पिढ्यांसाठी हिरवाई, शुद्ध हवा आणि सुंदर भविष्याचा अमूल्य वारसा ठरू शकतं.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण सर्वजण जाणतो की आज प्लास्टिक प्रदूषण संपूर्ण जगाच्या पर्यावरणासमोर एक मोठं आव्हान बनून उभं ठाकलं आहे. ‘सिंगल यूज प्लास्टिक'-एकदा वापरुन फेकून द्यायचं प्लास्टिक, अनेक वर्षं पर्यावरणाला हानी पोहोचवत राहतं. त्यामुळे अशा प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, बिहारच्या सीतामढीमध्ये 'वेस्ट टू वेल्थ' (कचऱ्यापासून उपयुक्त पदार्थ निर्मिती) चं एक उत्कृष्ट उदाहरण समोर आलं आहे. इथे कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून त्यापासून आकर्षक बाकडी बनवली जात आहेत. एक बाक तयार करण्यासाठी सुमारे 40 किलो सिंगल यूझ प्लास्टिक वापरलं जातं. ही मजबूत, टिकाऊ आणि आरामदायक असण्यासोबतच पर्यावरणपूरकही असतात. ही बाकडी सरकारी शाळा, उद्यानं आणि सार्वजनिक ठिकाणी बसवली जात आहेत. याद्वारे लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीही वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक घटकांसोबतच जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची भूमिका आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. सीतामढीचा हा उपक्रम आपल्याला सांगतो की रिड्यूस, रियूज आणि रीसायकल (कमी वापर-पुनर्वापर-पुनर्प्रक्रिया) ही आज केवळ एक घोषणा राहिली नसून आपल्या जीवनाचा भाग बनत चालली आहे.
मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की गेल्या वेळी 'मन की बात'मध्ये मी 'गणेशोत्सवा'विषयी बोललो होतो. मी विनंती केली होती की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तींचीच पूजा केली पाहिजे. प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा परदेशातून आलेल्या गणेशमूर्तींऐवजी आपल्या देशातील मातीपासून साकारलेली गणेशमूर्तींची घरात प्रतिष्ठापना करण्याला आपण प्राधान्य द्यावे. या विषयावर अनेक लोकांनी मला संदेश पाठवले आहेत आणि आपले विचार मांडले आहेत. लोकांनी सांगितलय की, त्यांनी माझ्या विनंतीचा मान राखला आहे. त्यांनी स्थानिक मातीपासून तयार होणाऱ्या गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा निर्धार केला आहे. अनेकांनी मला लिहून कळवलं आहे की, 'मन की बात'मध्ये यावर आधीच चर्चा झाल्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यास मदत झाली. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तीचीच घरी प्रतिष्ठापना करा आणि भक्तिभावानं तिची पूजा करा. तुमचा हा छोटासा प्रयत्नही एक प्रकारे निसर्गपूजाच ठरेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे, ज्यांच्याविषयी ऐकून तुम्हाला निश्चितच अभिमान वाटेल. विज्ञान आणि नवसंशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीनं कार्य करत जगभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी ही व्यक्ती आजही आपल्या मुळांशी तितकीच घट्ट जोडलेली आहे. संधी मिळताच ते आपल्या मातृभूमीचा सन्मान करायला कधीच विसरत नाहीत. ते म्हणजे मणिपूरचे डॉ. रोनाल्डो रेश्राम. नाव रोनाल्डो असलं, तरी व्यवसायानं ते एक ॲस्ट्रोफिजिसिस्ट (खगोलभौतिकशास्त्रज्ञ) आहेत. ते सध्या जपानमध्ये कार्यरत असून, 'यंग गॅलक्सीज' या आकाशगंगांच्या विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या संशोधकांच्या चमुचे ते सदस्य राहिले आहेत. तुम्हाला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की त्यांनी नेमकं काय केलं आहे. त्यांनी या आकाशगंगांच्या संपूर्ण समूहाला मणिपूरमधील सुंदर 'लोकटक' तलावाच्या नावावरून 'लोकटक प्रोटो क्लस्टर' असं नाव दिलं आहे. लोकटक हा गोड्या पाण्याचा एक खूप मोठा तलाव आहे. लोकटक तलावातील तरंगणाऱ्या 'फुमडी' (वनस्पती-मातीचे तरंगते पुंजके) मिळून एक अद्वितीय नैसर्गिक निसर्गदृश्य तयार होतं. ते दृश्य पाहताना विशाल जलाशयात छोटी-छोटी बेटं तरंगत असल्याचा भास होतो. याचप्रमाणे विश्वात या 'यंग गॅलक्सीज' एकत्र येऊन एका विशाल संरचनेची निर्मिती करतात. अशा प्रकारे मणिपूरमधील लोकटक तलावानं आता केवळ भारताच्या नकाशावरच नव्हे, तर अथांग ब्रह्मांडातही स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. ही कामगिरी प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढवणारी आहे. आपल्या तरुण पिढीला यातून ही प्रेरणा मिळते की, आपल्या परंपरा आणि संस्कृतीशी नातं जपतही नवनवीन उंची गाठता येते. ही मुळं अशी आहेत, जी अथांग ताऱ्यांच्या विश्वालाही उजळवून टाकण्याची ताकद बाळगतात !
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आणखी काही दिवसांत, 7 ऑगस्ट रोजी, आपला देश 'राष्ट्रीय हातमाग दिवस' साजरा करणार आहे. या निमित्तानं आपण आपल्या विणकर बंधू-भगिनींच्या कौशल्याचा, सर्जनशीलतेचा आणि परिश्रमांचा गौरव करतो. आपल्या या विणकर बांधवांनी पिढ्यानुपिढ्या चालत आलेली समृद्ध परंपरा जतन करत ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवली आहे.
मित्रांनो, हातमागावर विणलेला प्रत्येक पोशाख एखाद्या प्रदेशाची, एखाद्या समुदायाची आणि त्यामागे अहोरात्र परिश्रम करणाऱ्या असंख्य कारागिरांची कहाणी सांगतो. हे असे लोक आहेत, जे अभिमानानं भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपत आहेत. आजच्या दिवशी माझं आवाहन आहे की आपण हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपल्या विणकर सहकाऱ्यांचा सन्मान करूया. चला, आपण 'व्होकल फॉर लोकल'-स्थानिक उत्पादनांच्या आग्रहाची व्यापक भावना अधिक सशक्त करूया.
मित्रांनो, आज देशात हातमाग क्षेत्राला ज्या पद्धतीनं प्रोत्साहन दिलं जात आहे, त्यामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. पोचमपल्लीपासून पाटण्यापर्यंत आणि कुथमपल्लीपासून कच्छपर्यंत अशी अनेक प्रेरणादायक उदाहरणं आज आपल्याला पाहायला मिळतात. आज देशभरात अनेक व्यक्ती आणि गट हातमागाच्या आपल्या समृद्ध परंपरेला नवी ऊर्जा आणि नवी ओळख देण्याचं काम करत आहेत. कुणी 'पोचमपल्ली इकत' ची सुंदर परंपरा पुढे नेत आहे, तर कुणी महिला विणकरांना एकत्र आणून लोकरीची उत्पादनं तयार करत आहे. काही जण केरळची पारंपरिक 'कसावू' विणकला जतन करण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहेत. या प्रयत्नांमुळे आपल्या माता-भगिनींना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होत आहेत.
मित्रांनो, मी विशेष उल्लेख करू इच्छितो असा आणखी एक विषय म्हणजे 'खादी'. आपण सर्वजण जाणतो की 'खादी' महात्मा गांधींना अत्यंत प्रिय होती. गेल्या काही वर्षांत 'खादी' खूप लोकप्रिय झाली आहे. गेल्या 12 वर्षांत खादीची विक्री 6 पटीनं वाढली आहे. विक्रीचा हा आकडा आता 8,000 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांत खादीचे, हातमागाचे किंवा हस्तकलेचे कोणते ना कोणते उत्पादन नक्की खरेदी करा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, तुम्हाला जर कुणी विचारलं की भारतात किती प्रकारची पारंपरिक वाद्यं आहेत, तर क्षणभर तुम्हीही विचारात पडाल. कारण आपल्या देशात असंख्य वाद्यं आणि त्यांच्याशी निगडित समृद्ध परंपरा आहेत. अशाच वाद्यांपैकी एक म्हणजे त्रिपुराचं 'चौंगप्रेंग' (Chawngpreng) वाद्य. हे वाद्य तेथील आदिवासी समुदायांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. बांबूपासून तयार केलेल्या या वाद्याला तीन तारा असतात. यातून उमटणारे मधुर स्वर सरोदच्या सुरांची आठवण करून देतात. काही कारणांमुळे गेल्या काही वर्षांत तरुण पिढीमध्ये या वाद्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशा परिस्थितीत सुरज कुमार देबबर्मा यांनी हे वाद्य पुन्हा लोकप्रिय करण्याचा निश्चय केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. ते केवळ चौंगप्रेंगच नव्हे, तर तेथील इतर पारंपरिक वाद्यांचही सादरीकरण करतात. कोकबोरोक लोकगीतं, बाऊल गीतं आणि बंगाली लोकगीतं सादर करण्यात त्यांना विशेष रस आहे. आता मी तुम्हाला एक छोटीशी ध्वनिचित्रफीत ऐकवू इच्छितो. हे संगीत तुम्ही कधीही विसरू शकणार नाही.
मित्रांनो, मला खात्री आहे की हे संगीत ऐकून तुमच्या मनाला खूप आनंद झाला असेल. देबबर्माजींचा मला मनापासून अभिमान आहे. मित्रांनो, मला विश्वास आहे की पारंपरिक संगीत लोकप्रिय करण्याचा देबबर्माजी यांचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, तुमच्या परिसरातील पारंपरिक वाद्यांविषयीची माहिती समाजमाध्यमांवर अवश्य टाका. तुमचा हा प्रयत्न इतरांनाही भारताच्या समृद्ध पारंपरिक संगीत वारशाची ओळख करून देईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या 27 जुलै रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जी यांची पुण्यतिथी आहे. डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक प्रेरणादायक पैलू होते; मात्र त्यांना शिक्षकाची भूमिका सर्वाधिक प्रिय होती. ते नेहमी मुलांना आणि युवकांना मोठी स्वप्नं पाहण्याची प्रेरणा देत असत. योगायोगानं, याच आठवड्यात आपण 'गुरुपौर्णिमा' हा पवित्र सण साजरा करू. आपले आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात. त्यानंतर शाळेतील शिक्षक आपल्याला अक्षरज्ञान देतात आणि ज्ञानाचा मार्ग दाखवतात. गुरुपौर्णिमा ही अशा सर्व गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. मी देशातील सर्व शिक्षक आणि गुरुजनांना आदरपूर्वक प्रणाम करतो.
मित्रांनो, काही आठवड्यांनंतर आपण आपल्या स्वातंत्र्याचा महोत्सवही साजरा करू. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. 'भारतमाते' च्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या असंख्य वीरांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्या त्यागामुळे आणि तपश्चर्येमुळे आज आपल्या हातात तिरंगा आहे. या तिरंग्यात आपल्या संविधानाचे आदर्श आहेत.
मित्रांनो, गेल्या काही वर्षांत 'हर घर तिरंगा' मोहिमेनं संपूर्ण देशाला एका अद्भुत भावनेनं बांधलं आहे. घराघरात, गल्लीबोळात तिरंग्याचा उत्सव दिसून येतो. यंदाही आपल्याला 'हर घर तिरंगा' मोहीम पूर्ण उत्साहानं पुढे न्यायची आहे. आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवायचा आहे.
मित्रांनो, दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वी तुम्ही मला अनेक विचार आणि सूचना पाठवता. यंदाही तुम्ही तुमचे विचार MyGov वर नक्की व्यक्त करा. मला तुमच्या सूचनांची प्रतीक्षा आहे.
मित्रांनो, 'मन की बात' मध्ये आज इतकच. पुढील महिन्यात आपण पुन्हा भेटूया देशवासियांच्या अनेक नव्या कामगिरी आणि प्रेरणादायक प्रयत्नांसह! तोपर्यंत मला अनुमती द्या. खूप खूप आभार, नमस्कार!
***
शिल्पा पोफळे/आकाशवाणी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2289575)
आगंतुक पटल : 47
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Urdu
,
Telugu
,
Manipuri
,
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam