अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालयाची सोन्याच्या तस्करांवरील कारवाई तीव्र; देशभरात राबवलेल्या विशेष मोहिमेत तस्करांनी आणलेले 27 किलो सोने जप्त, 12 जणांना अटक

प्रविष्टि तिथि: 25 JUL 2026 4:01PM by PIB Mumbai

 

सोन्याची तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांच्या जाळ्याविरोधातील आपली मोहीम तीव्र करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशभरात गुप्त माहितीच्या आधारे अनेक कारवाया केल्या आहेत. यामध्ये विदेशी बनावटीचे तस्करी करून आणलेले 27 किलोपेक्षा जास्त सोने जप्त करण्यात आले असून 12 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांदरम्यान विमानातील शौचकूप, वाहने व भांड्यांमध्ये बनवलेले विशेष कप्पे आणि शरीरात सोने लपवण्यासारख्या अत्याधुनिक पद्धती उघडकीस आल्या आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 23-24.07.2026 रोजी अदीस अबाबा येथून आलेल्या 3 प्रवाशांना रोखले. विमानाची कसून तपासणी केली असता, मागच्या टॉयलेटच्या छताच्या पॅनेलमध्ये लपवलेल्या सुमारे 12 किलो वजनाच्या विदेशी सोन्याच्या 6 लगडी सापडल्या. विमानतळ कर्मचाऱ्यांमार्फत हे सोने नंतर बाहेर काढले जाणार होते, असे चौकशीत आढळले. सोने जप्त करून तिन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

23.07.2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआय अधिकाऱ्यांनी ब्रह्मपुत्रा मेलने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला उत्तर प्रदेशात पकडले. तिच्या कमरेचा पट्टा आणि हँडबॅगमधून सुमारे 5 किलो वजनाच्या  विदेशी सोन्याच्या 42 लगडी जप्त करण्यात आल्या. हे सोने बांगलादेशमार्गे भारतात आणल्याचे तिने कबूल केले. हे सोने जप्त करण्यात आले आणि या प्रवासी महिलेला अटक करण्यात आली.

गुप्तचरांनी दिलेल्या आणखी एका माहितीच्या आधारे मुंबई विमानतळावर  22-23.07.2026 दरम्यान केलेल्या दुसऱ्या एका कारवाईत, विमानातील शौचालयात मेणाच्या रूपात सोन्याची भुकटी लपवून तस्करी करणाऱ्या टोळीची कार्यपद्धती उघडकीला आणली. हे सोने सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले जात होते. या कारवाईत 3.7 किलो सोने जप्त करून मुख्य वाहक, सफाई कर्मचारी, हँडलर आणि खरेदीदारासह 5 जणांना अटक करण्यात आली.

19-20.07.2026 रोजी, कोलकाता रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाकडून 4.6 किलो विदेशी सोने जप्त करण्यात आले, जे खास तयार केलेल्या भांड्यांमध्ये लपवले होते. हे सोने म्यानमारमार्गे भारतात आणले गेले असल्याचे चौकशीत उघड झाले. हे सोने जप्त करण्यात आले आणि या प्रवाशाला अटक करण्यात आली.

आठवड्याभरात, इतर दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये, कोची आणि गुवाहाटी येथील डीआरआय अधिकाऱ्यांनी सुमारे 2 किलो विदेशी सोने जप्त केले. कोची विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाच्या शरीरात लपवून आणलेले सोने जप्त करण्यात आले, तर गुवाहाटी येथे एका कारमध्ये विशेष प्रकारे बनवलेल्या गुप्त कप्प्यात लपवलेल्या सोन्याच्या बिस्किटांची जप्ती करण्यात आली. या कारवायांमध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

***

माधुरी पांगे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2289397) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu , Malayalam