लोकसभा सचिवालय
लोकसभेच्या अध्यक्षांनी सोमनाथ चॅटर्जी यांना वाहिली पुष्पांजली
प्रविष्टि तिथि:
25 JUL 2026 11:57AM by PIB Mumbai
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांच्या जयंतीनिमित्त संविधान सदनाच्या केंद्रीय सभागृहात त्यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी खासदार, माजी खासदार आणि इतर मान्यवरांनीही संविधान सदनाच्या केंद्रीय सभागृहात सोमनाथ चॅटर्जी यांना पुष्पांजली अर्पण केली.
लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंग यांनीही चॅटर्जी यांना आदरांजली वाहिली.
सोमनाथ चॅटर्जी यांचा जन्म 25 जुलै 1929 रोजी आसाममधील तेजपूर येथे झाला होता. पेशाने निष्णात वकील असलेल्या चॅटर्जी यांनी 1968 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि 1971 साली ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यांच्या असामान्य संसदीय कारकिर्दीत त्यांनी सलग 10 वेळा खासदार म्हणून सेवा बजावली. 4 जून 2004 रोजी चॅटर्जी यांची 14 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड झाली. 31 मे 2009 पर्यंत त्यांनी हे पद अत्यंत प्रतिष्ठेने, आणि प्रभावीपणे सांभाळले.
आपली बुद्धिमत्ता, वक्तृत्व आणि संसदीय मूल्यांप्रती असलेल्या गाढ निष्ठेसाठी ओळखल्या जाणाऱ्या चॅटर्जी यांनी, सभागृहातील चर्चेचा दर्जा उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संसदीय प्रणालीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना 1996 मध्ये 'उत्कृष्ट संसदपटू' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी संसदीय कामकाजाचे आधुनिकीकरण करण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम सुरू केले. प्रामुख्याने, त्यांनी जुलै 2006 मध्ये 'लोकसभा टेलिव्हिजन' (LSTV) या 24 तास चालणाऱ्या संसदीय दूरचित्रवाणी वाहिनीची सुरुवात केली आणि ऑगस्ट 2006 मध्ये उच्च तंत्रज्ञान युक्त संसदीय संग्रहालयाचे उद्घाटन केले.
संविधान सदनातील पूर्वीच्या लोकसभा सभागृहाच्या बाहेरील प्रवेशिकेमध्ये (आऊटर लाॅबी) सोमनाथ चॅटर्जी यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे. हे चित्र मनिष कुमार राव यांनी रेखाटले असून, 10 फेब्रुवारी 2014 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले होते.
***
अंबादास यादव/आशुतोष सावे/परशुराम कोर
(रिलीज़ आईडी: 2289308)
आगंतुक पटल : 12