संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही सेनादलांतील केवळ महिलांचा समावेश असलेल्या पहिल्याच जग प्रदक्षिणा सागरी मोहिमेहून परतलेल्या पथकाचे स्वागत केले
प्रविष्टि तिथि:
22 JUL 2026 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, 22 जुलै 2026 रोजी ‘समुद्र प्रदक्षिणा’ या तिन्ही सेनादलांतील केवळ महिलांचा समावेश असलेल्या पृथ्वीप्रदक्षिणा नौकानयन मोहिमेचे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून स्वागत केले. देशाच्या तिन्ही सेनादलांमध्ये कार्यरत असलेल्या नऊ महिला अधिकाऱ्यांनी, भारतीय लष्कराच्या त्रिवेणी या नौकानयन नौकेच्या मदतीने चार महासागरांमधून प्रवास करताना, सुमारे 25,500 सागरी मैलांचे अंतर पार करत, 314 दिवसांची ही सागर प्रदक्षिणा यशस्वीपणे पूर्ण केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, 11 सप्टेंबर 2025 रोजी आभासी पद्धतीने झेंडा दाखवून या मोहिमेची मुंबई येथून सुरुवात करून दिली होती.


याप्रसंगी बोलताना संरक्षणमंत्र्यांनी या मोहिमेच्या यशस्वी पूर्ततेला भारताच्या नारी-शक्तीची साक्ष देणारा प्रसंग, देशाच्या निर्धाराचे प्रतीक, तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि संयुक्ततेचा पुरावा आणि आव्हानांवर मात करून इतिहास घडवणाऱ्या ‘नव्या भारता’चा उत्सव असे संबोधले.
आयएएसव्ही त्रिवेणीच्या पथकाचे धैर्य, जिद्द आणि दृढनिश्चय यांची प्रशंसा करताना राजनाथ सिंह म्हणाले की मानवी धैर्य कोणत्याही वादळापेक्षा मोठे असते हे या मोहिमेने सिद्ध केले आहे. देशातील महिला आज संधी निर्माण करत आहेत, पहिल्या फळीतून नेतृत्व करत आहेत आणि इतिहासाच्या पानांवर स्वतःचे नाव कोरत आहेत हे अधोरेखित करत ते म्हणाले, “महासागराच्या लाटा उंच उसळतात, पण भारताच्या कन्यांचा उत्साह त्यापेक्षाही उंच भरारी घेतो.”


या मोहिमेने एकत्रित नियोजन, अखंडीत आंतरपरिचालन क्षमता तसेच सामायिक नेतृत्वाचे दर्शन घडवत, एकल मोहिमेसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अधिकाऱ्यांना एकत्र आणले. दहा महिन्यांहून अधिक काळ एकत्र राहणे, प्रशिक्षण घेणे आणि नौकानयन करणे यातून या पथकाने संयुक्तता ही केवळ संघटनात्मक संकल्पना म्हणून नव्हे तर परिचालनात्मक परिणामकारकता तसेच राष्ट्रीय कर्तुत्वात भर घालणाऱ्या शक्ती वर्धकाचे काम करते याचे दर्शन घडवत एक सुसंगत संघ म्हणून कार्य केले.
आयएएसव्ही या स्वदेशी पद्धतीने निर्मित 50 फुटी जहाजाने भारताची तांत्रिक निपुणता, नवोन्मेष आणि आत्मविश्वास यांचे दर्शन घडवल्यामुळे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या जहाजाला ‘आत्मनिर्भर भारता’चे मूर्त रूप असे संबोधले. “हे जहाज भारताची अभियांत्रिकी उत्कृष्टता, स्वदेशी कर्तृत्व आणि धोरणात्मक आत्मविश्वास यांचा दाखला ठरले आहे,” असे ते म्हणाले.


* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2287930)
आगंतुक पटल : 9