आयुष मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लष्करी आणि क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये आयुष उपचार सेवांच्या विस्ताराबाबत पत्र
प्रस्तावात, संरक्षणकर्मींसाठी प्रतिबंधात्मक, आरोग्य संवर्धनात्मक आणि सर्वांगीण आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित
Posted On:
22 JUL 2026 11:37AM by PIB Mumbai
आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून, लष्करी आणि क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये आयुष बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्याचा तसेच आयुष -आधारित उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
सशस्त्र दल वैद्यकीय सेवा, देशाच्या सैनिकांना विविध ठिकाणी आणि अनेकदा आव्हानात्मक कार्यक्षेत्र स्थितीत, आरोग्यसेवा पुरवण्यात निभावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर केंद्रीय मंत्री जाधव यांनी या पत्रात प्रकाश टाकला आहे. सशस्त्र दलांकडे सक्षम आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा जरी असल्या तरी त्याला भारताच्या पारंपरिक वैद्यक पद्धतींची जोड दिल्यास संरक्षणकर्मींसाठी प्रतिबंधात्मक, आरोग्य संवर्धनात्मक आणि सर्वांगीण आरोग्यासाठीची सेवा अधिक बळकट करता येऊ शकेल, असे जाधव यांनी नमूद केले आहे.
संरक्षण मंत्रालयांतर्गत सध्या काही मोजक्याच संस्थांमध्ये आयुष उपचार सुविधा उपलब्ध आहेत. अनेक लष्करी आणि क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये अद्याप स्वतंत्र आयुष सेवा उपलब्ध नसल्याचे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. या रुग्णालयांमध्ये आयुष सुविधांचा विस्तार केल्यास सैनिकांना प्रामाण्य आधारित पारंपरिक आरोग्यसेवांचा, विशेषतः प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, जीवनशैली व्यवस्थापन, पुनर्वसन आणि सर्वांगीण आरोग्य या संदर्भातील सेवांचा, अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल, असे जाधव यांनी सुचवले आहे.
आयुष सेवांचा समावेश विद्यमान आरोग्यसेवा रचनेला पूरक ठरेल आणि सशस्त्र दलातील जवानांसाठी अधिक व्यापक व रुग्ण केंद्रित सेवा प्रारूप पुरवण्यात योगदान देईल, यावर जाधव यांनी भर दिला आहे. तसेच अशा पुढाकारांमुळे देशाचा समृद्ध पारंपरिक वैद्यकीय वारसा, देशाच्या सार्वजनिक आरोग्यसेवा वितरण व्यवस्थांना जोडण्यात अधिक चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
केंद्रीय मंत्री जाधव यांनी, सर्व लष्करी आणि क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये आयुष ओपीडी व उपचार सुविधा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा विचार करण्याची विनंती, संरक्षण मंत्रालयाला केली आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व तांत्रिक सहाय्य, व्यावसायिक मार्गदर्शन आणि सामंजस्य करारावरील स्वाक्षरीसह संस्थात्मक सहकार्य पुरवण्यासाठी आयुष मंत्रालय पूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी कळवले आहे.
प्रस्तावित सहयोग, एकात्मिक आरोग्यसेवा दृष्टिकोनाला चालना देण्याच्या आणि देशातील सशस्त्र दलांच्या जवानांसह समाजातील व्यापक घटकांपर्यंत देशाच्या पारंपरिक वैद्यकीय पद्धतींचे लाभ पोहोचवण्याची सुनिश्चिती करण्याच्या सरकारच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
***
AshishSangle / SonaliKulkarni / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2287576)
अभ्यागत कक्ष : 79