आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सोळाव्या ब्रिक्स आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीचे 22 ते 24 जुलै दरम्यान चंदीगढ येथे भारताकडून आयोजन


तीन दिवसीय ब्रिक्स आरोग्य कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, आरोग्यमंत्र्यांची बैठक आणि 'डिजिटल आरोग्य आणि एआय'वर होणार चर्चा

केंद्रीय आरोग्य सचिव आणि आयुष मंत्रालयाच्या सचिवांनी 16 व्या ब्रिक्स आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीच्या पूर्वतयारीची दिली माहिती

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2026 10:08PM by PIB Mumbai


नवी दिल्ली,21 जुलै 2026

ब्रिक्सचे 2026 च्या अध्यक्षपदाचा भाग म्हणून  22 ते 24 जुलै 2026 दरम्यान चंदीगढ येथे 16 वी ब्रिक्स आरोग्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत ब्रिक्स देशांचे आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. आरोग्य सुरक्षा, डिजिटल आरोग्य, साथीच्या रोगांची तयारी आणि सर्वांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्यावर चर्चा होणार आहे.

मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी आज चंदीगड येथे पत्रकार परिषद झाली. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव आणि आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी प्रसारमाध्यमांना ब्रिक्स आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीची तयारी, प्रमुख विषय आणि अपेक्षित निर्णयांची माहिती दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले की, या मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांची पूर्वतयारी, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या दरातील औषधांची उपलब्धता, पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्र, क्षयरोग, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि लवचिक आरोग्य यंत्रणा यासारख्या क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला जाईल. सर्वांना आरोग्यसेवेचे संरक्षण मिळावे आणि ब्रिक्स देशांतील आरोग्यसेवा अधिक चांगली व्हावी, हे या सहकार्याचे समान उद्दिष्ट आहे. ब्रिक्स देशांमधील सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढल्याने 'ग्लोबल साउथ' च्या आरोग्यविषयक गरजांना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती  आणि इंडोनेशिया या 11 ब्रिक्स सदस्य देशांचे आरोग्यमंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तांत्रिक तज्ञ एकत्र येतील. हे सर्व देश मिळून जगातील जवळपास निम्म्या लोकसंख्येचे आणि जागतिक जीडीपीच्या सुमारे 40 टक्के भागाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे जागतिक आरोग्य सहकार्याला आकार देण्यात ब्रिक्सची वाढती भूमिका अधोरेखित होते.

या अधिकृत कार्यक्रमाची सुरुवात 22 जुलै 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीने होईल.

त्यानंतर 23 जुलै 2026 रोजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत् प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली 16 वी ब्रिक्स आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडेल. या बैठकीत सर्व आरोग्यमंत्री प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमांवर चर्चा करतील आणि 16 व्या ब्रिक्स आरोग्यमंत्री जाहीरनाम्याचा स्वीकार करण्यावर विचार करतील.


निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2287482) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Gujarati