युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'हर घर तिरंगा' अभियान साजरे करण्यासाठी 'माय भारत'तर्फे 'भारताचा राष्ट्रध्वज प्रश्नमंजुषा 2026'


प्रश्नमंजुषा 15 ऑगस्टपर्यंत खुली,उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवकांना भारताच्या सीमावर्ती भागांना भेट देण्याची संधी

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2026 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 जुलै 2026

देशव्यापी 'हर घर तिरंगा' अभियान आणि भारताच्या 79व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून, युवा व्यवहार विभागाने 'माय भारत'च्या माध्यमातून 'माय भारत' पोर्टलवर 'भारताचा राष्ट्रध्वज प्रश्नमंजुषा 2026' सुरू केली आहे. ही प्रश्नमंजुषा 15 ऑगस्ट 2026 पर्यंत खुली राहील. या प्रश्नमंजुषेमुळे देशभरातील युवा नागरिकांना राष्ट्रध्वज आणि त्याचे चिरस्थायी महत्त्व याबद्दलची त्यांची समज अधिक दृढ करण्याची एक आकर्षक संधी मिळणार आहे.

गेल्या वर्षी आयोजित केलेल्या 'राष्ट्रध्वज प्रश्नमंजुषेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाच्या आधारावर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या आवृत्तीद्वारे, 'माय भारत'चा उद्देश युवकांमध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाचा इतिहास, उत्क्रांती, महत्त्व आणि प्रतिष्ठा याबद्दल जागरूकता निर्माण करणे, तसेच देशभक्ती, घटनात्मक मूल्ये आणि 'माय भारत' व्यासपीठावरील सहभाग वाढवणे, हा आहे.

ही प्रश्नमंजुषा 'माय भारत' पोर्टलच्या सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी खुली आहे. यामध्ये 20 बहुपर्यायी प्रश्न 10 मिनिटात सोडवायचे आहेत. ही प्रश्नमंजुषा पोर्टलवर उपलब्ध ‘भाषिणी’ प्रणालीच्या माध्यमातून सर्व उपलब्ध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक नोंदणीकृत वापरकर्ता ही प्रश्नमंजुषा एकदाच सोडवू शकतो. प्रत्येक योग्य उत्तराला एक गुण असून, चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण नाहीत.

प्रश्नमंजुषेत देशाच्या राष्ट्रध्वजाची उत्क्रांती आणि इतिहास, ध्वज विकासाशी संबंधित नामवंत व्यक्तींचे योगदान, तिरंग्याशी संबंधित घटनात्मक तरतुदी, भारतीय ध्वज संहिता-2002, राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा-1971 आणि भारताच्या राष्ट्रीय चिन्हांशी संबंधित इतर महत्त्वाच्या तथ्यांवर आधारित प्रश्नांचा समावेश आहे. 

प्रश्नमंजुषा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व नोंदणीकृत सहभागींना ई-प्रमाणपत्र दिले जाईल. याशिवाय 21-29 वर्ष वयोगटातील नोंदणीकृत सहभागी, निर्धारित अटी पूर्ण केल्यास विजेते म्हणून निवडले जाण्यास पात्र ठरतील. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पात्र सहभागींमधून संगणक-आधारित यादृच्छिकीकरण प्रक्रियेद्वारे विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांना भारताच्या सीमावर्ती भागांना किंवा इतर योग्य ठिकाणी भेट देण्याची संधी दिली जाऊ शकते.

'भारताची राष्ट्रध्वज प्रश्नमंजुषा' हा, डिजिटल शिक्षणाला राष्ट्रउभारणीच्या उपक्रमांशी जोडून तरुणांमध्ये सुजाण आणि सक्रिय नागरिकत्वाची प्रेरणा देण्याच्या 'माय भारत'च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे.  देशभरातील तरुणांनी या अनोख्या ज्ञानाधारित उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन तिरंग्याचा उत्साह साजरा करावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

ही प्रश्नमंजुषा MY Bharat Portal:( https://mybharat.gov.in/quiz/quiz_dashboard/UndZOTQ1S3FyU1BYSmVGZmkyaGRpZz09 ) वर उपलब्ध असून ती 15 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहील.

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2287477) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Malayalam