वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या स्पेन, बेल्जियम, फिनलंड आणि इस्टोनिया या देशांच्या यशस्वी भेटीचा समारोप, युरोपसमवेत भारताची आर्थिक भागीदारी दृढ
Posted On:
19 JUL 2026 7:51PM by PIB Mumbai
उच्चस्तरीय भारतीय उद्योजकांच्या शिष्टमंडळासह केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा स्पेन, बेल्जियम, फिनलंड आणि इस्टोनिया या देशांचा पाच दिवसांचा दौरा 13-18 जुलै 2026 या कालावधीत संपन्न झाला. या भेटीदरम्यान, त्यांनी या देशांचे मंत्री, वरिष्ठ सरकारी नेते, उद्योग क्षेत्रातील अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांशी अनेक उच्चस्तरीय चर्चा केल्या. भारत-युरोपीय महासंघ यांच्या दरम्यान मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर निर्माण झालेली गतीमानता कायम राखून, भारताची युरोपसमवेतची आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणे, गुंतवणूक साखळीचा विस्तार करणे, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे आणि उद्योगांतील परस्पर संबंधांना चालना देणे, हा या दौऱ्याचा उद्देश होता.
स्पेनच्या दौऱ्यादरम्यान, गोयल यांनी स्पेनचे उपपंतप्रधान आणि अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगमंत्री महामहीम कार्लोस कुएर्पो कॅबलेरो आणि उद्योग आणि पर्यटन मंत्री महामहीम जोर्डी हेरेउ बोहेर यांच्याशी फलदायी चर्चा केली. व्यावसायिक क्षेत्राचा सहभाग असलेली भारत-स्पेन संयुक्त आयोगाची बैठक घेण्याचा प्रस्ताव गोयल यांनी यावेळी मांडला, तर स्पेनने द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी एक समर्पित भारतीय विशेष गट स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला.
बेल्जियममध्ये ब्रसेल्स येथे गोयल यांनी तिसऱ्या भारत-युरोप व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या मंत्रिस्तरीय बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले. त्यांनी टीटीसी कृती आराखडा 2026-27 स्वीकारल्याचे, आणि भारतीय मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आणखी 21 आस्थापनांचा यादीत समावेश झाल्याचे स्वागत केले. त्यामुळे मान्यताप्राप्त आस्थापनांची एकंदर संख्या 625 वर पोहोचली आहे. भारतीय जहाज पुनर्वापर केंद्रांच्या समावेशाचा मुद्दाही भारताने उपस्थित केला आणि कौशल्य, शिक्षण व प्रतिभा गतीशीलता या मुद्द्यांवर भारत-युरोप यांच्या दरम्यान संवाद सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला.
फिनलंडमध्ये गोयल यांनी प्रभारी पंतप्रधान आणि अर्थमंत्री रिक्का पुर्रा आणि आर्थिक व्यवहार मंत्री साकारी पुईस्टो यांची भेट घेतली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 6जी, क्वाटंम तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, चक्रीय अर्थव्यवस्था, प्रगत उत्पादन आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्यावर चर्चेत भर देण्यात आला.
18 जुलै 2026 रोजी मंत्र्यांनी आपल्या इस्टोनियाच्या दौऱ्याची सांगता केली. 2021 मध्ये टॅलिन येथे निवासी भारतीय दूतावास सुरू झाल्यानंतर ही भारताची पहिलीच मंत्रिस्तरीय भेट होती, आणि यामधून द्विपक्षीय आर्थिक संबंधांचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस त्साहक्ना यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, डिजीटल प्रशासन, अर्थतंत्रज्ञान, एकीकृत युपीआय, ई-निवास, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांतील सहकार्याच्या शक्यतेवर चर्चा झाली. इस्टोनियाने भारत -युरोप मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी भक्कम पाठिंबा दिला आणि भारताला इस्टोनिया डिजीटल परिषदेमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रणही दिले.
या दौऱ्यामुळे युरोपसोबतच्या भारताच्या विस्तारणाऱ्या आर्थिक संबंधांना नवी गती मिळाली. या दौऱ्यादरम्यान झालेल्या सामंजस्य करारांमुळे तंत्रज्ञानविषयक भागीदारी बळकट होईल, गुंतवणुकीचा ओघ वाढेल, भारतीय निर्यातदारांसाठी बाजारपेठेतील उपलब्धता सुधारेल आणि भविष्याभिमुख क्षेत्रांमधील सहकार्य विस्तारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
***
माधुरी पांगे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2286410)
अभ्यागत कक्ष : 45