माहिती आणि प्रसारण मंत्रालय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाला दुसऱ्या वेव्ह्ज् आवृत्तीचे अधिक भव्य आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांनी मुंबईत होणाऱ्या वेव्हज् 2027 च्या तयारीबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माहिती दिली
प्रविष्टि तिथि:
17 JUL 2026 7:07PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई,17 जुलै 2026
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज् ) 2027 च्या दुसऱ्या आवृत्तीच्या आयोजनाच्या तयारीबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली.

वेव्हज् 2025 ची उद्घाटन आवृत्ती प्रचंड यशस्वी ठरली असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. वेव्हजची उद्घाटन आवृत्ती 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेव्हजला जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचे व्यासपीठ बनविण्याचे आवाहन केले आहे. या माध्यमातून चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या क्षेत्रातील जागतिक प्रतिभेचे दर्शन घडवून आणण्याबरोबरच जगभरातील कलाकार आणि सर्जकांमध्ये सहकार्याला चालना देण्याचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. दुसऱ्या वेव्ह्ज आवृत्तीचे अधिक भव्य आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने अधिक समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीदरम्यान,माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव, चंचल कुमार यांनी, मुख्यमंत्र्यांना 2027 मध्ये मुंबईत होणाऱ्या 'वेव्हज'च्या दुसऱ्या आवृत्तीसाठी सुरू असलेली तयारी आणि प्रमुख उपक्रमांची माहिती दिली.


या प्रसंगी उपस्थित असलेल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, अतिरिक्त सचिव प्रभात, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक (पश्चिम विभाग) स्मिता वत्स-शर्मा, सहसचिव (बौद्धिक संपदा आणि संवाद) सी. सेंथिल राजन, सहसचिव (प्रसारण) पृथुल कुमार, सहसचिव (चित्रपट) डॉ. अजय नागभूषण एम. एन., सहसचिव (संस्था) डॉ. के. के. निराला, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांचा समावेश होता. या बैठकीला उपस्थित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, प्रधान सचिव (उद्योग, गुंतवणूक आणि सेवा) डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धावसे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त अश्विनी भिडे यांचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीपूर्वी,माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव, चंचल कुमार यांनी वेव्हज् 2027 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेतली आणि त्याचे अध्यक्षस्थान भूषवले. या आढावा बैठकीनंतर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरची पाहणी करण्यात आली. याच ठिकाणी 2025 मध्ये वेव्हज्'ची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती आणि आता पुढील आवृत्तीचे आयोजनही येथेच करण्याचा प्रस्ताव आहे.



शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
रिलीज़ आईडी:
2285884
| Visitor Counter:
30