सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
भारतातील सर्वात मोठे जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन 'भारत टेक्स 2026' मधील 'खादी इंडिया पॅव्हिलियन' चे केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज गोयल यांच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,15 जुलै 2026
भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज गोयल यांनी मंगळवारी 'भारत टेक्स 2026' मधील हॉल क्रमांक 10 येथे 'खादी इंडिया पॅव्हेलियन'चे उद्घाटन केले. त्यांनी या दालनाची सविस्तर पाहणी केली आणि तेथील प्रदर्शक, कारागीर व खादी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.


नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेला 'भारत टेक्स 2026' हा भारतातील सर्वात मोठे जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने उभारलेल्या या दालनात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची विस्तृत श्रेणी, डिझाईनवर आधारित नाविन्यपूर्ण प्रयोग आणि देशभरातील विविध खादी संस्थांनी सादर केलेले विशेष कलेक्शन प्रदर्शित करण्यात आले आहे.


आपल्या या भेटीदरम्यान, गोयल यांनी विविध राज्यांतून आलेल्या खादी संस्थांच्या प्रतिनिधींशी आणि कारागिरांशी चर्चा केली, तसेच त्यांचे अनुभव आणि त्यांनी केलेले नवे प्रयोग याविषयी सविस्तर माहिती घेतली. या प्रसंगी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे तसेच 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादी'चे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

खादीची नवकल्पना: समकालीन जीवनशैलीसाठी परंपरा, या संकल्पनेवर आधारित हे 'खादी इंडिया पॅव्हेलियन' खादीचे विविध पैलू आणि आयाम सादर करते. समकालीन गृहसजावटीच्या वस्तू, स्थानिक किंवा स्वदेशी धाग्यांपासून तयार केलेली नाविन्यपूर्ण उत्पादने, पारंपरिक खादी उपकरणांचे व साधनांचे प्रदर्शन, आणि तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी "नये भारत की नयी खादी – खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन, खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन" या संकल्पनेअंतर्गत विकसित केलेली खादी उत्पादनांची एक विशेष आणि आधुनिक श्रेणी, ही या दालनाची विशेष आकर्षणे आहेत.


'भारत टेक्स' चे आयोजन 14 ते 17 जुलै 2026 या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे करण्यात आले आहे. या जागतिक सोहळ्याने भारत आणि परदेशातील हजारो खरेदीदार, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, डिझायनर्स, व्यावसायिक आणि धोरणकर्त्यांना एकाच मंचावर आणले आहे. या 'खादी इंडिया पॅव्हेलियन'च्या माध्यमातून, खादी आणि ग्रामोद्योग आयोग भारताचा समृद्ध खादी वारसा, नाविन्यता, उत्कृष्ट डिझाईन्स आणि शाश्वत विकासाप्रति असलेली आपली वचनबद्धता जागतिक पटलावर अत्यंत प्रभावीपणे मांडत आहे.


शैलेश पाटील/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285168)
आगंतुक पटल : 18