वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-स्पेन आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी उच्च-स्तरीय बैठकांसह केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या स्पेन दौऱ्याला प्रारंभ
पीयूष गोयल आणि स्पेनचे प्रथम उप-अध्यक्ष यांच्यात व्यापार, गुंतवणूक आणि नवोन्मेषी क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा
उत्पादन आणि नाविन्यपूर्ण भागीदारीला चालना देण्यासाठी पीयूष गोयल यांची स्पेनच्या उद्योग मंत्र्यांशी चर्चा
भारत-स्पेन व्यापार मंचाद्वारे द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्याच्या नवीन संधींचा शोध
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2026 10:48AM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अधिकृत स्पेन दौऱ्याचा प्रारंभ 13 जुलै, 2026 रोजी झाला. त्यांनी दौ-याच्या सुरूवातीला भारत-स्पेन आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणे आणि व्यापार, गुंतवणूक, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढवणे या उद्देशाने त्यांनी अनेक उच्च-स्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय आर्थिक संबंध बळकट करण्याच्या आणि प्राधान्य क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याच्या दोन्ही देशांच्या सामायिक वचनबद्धतेवर या दौऱ्यामध्ये भर दिला गेला आहे. उभय देश त्यांच्या राजनैतिक संबंधांची 70 वर्षे साजरी करत आहेत आणि 'भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता द्विवर्ष 2026' साजरा करत आहे, त्यामुळे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा आहे.
दिवसभरात, मंत्र्यांनी स्पेन सरकारच्या वरिष्ठ सदस्यांशी उच्च-स्तरीय द्विपक्षीय बैठका घेतल्या, तसेच उद्योग क्षेत्रातील नेते आणि गुंतवणूक संस्थांशी संवाद साधला. त्यांनी 'भारत-स्पेन व्यापार मंचा'ला संबोधित केले आणि भारतीय व्यापार शिष्टमंडळाच्या सदस्यांशी चर्चा केली. या माध्यमातून आर्थिक सहकार्य वाढवणे, औद्योगिक भागीदारी सुलभ करणे आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतात निर्माण होत असलेल्या संधींचे दर्शन घडवणे हे उद्दिष्ट होते.
मंत्री पीयूष गोयल यांनी स्पेन सरकारचे प्रथम उप-अध्यक्ष आणि अर्थव्यवस्था, व्यापार तसेच व्यवसाय मंत्री कार्लोस कुएरपो कॅबलेरो यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध बळकट करणे, व्यावसायिक सहकार्य वाढवणे, नवोन्मेषी उपक्रमांवर आधारित विकासाला चालना देणे आणि आर्थिक सहकार्यासाठी नवीन क्षेत्रे निश्चित करणे यावर चर्चा केली. बाजारपेठेतील प्रवेश सुधारणे, लवचिक पुरवठा साखळी निर्माण करणे आणि दोन्ही देशांमधील व्यावसायिक भागीदारीचा विस्तार करणे, यावर या चर्चेत भर देण्यात आला; यामध्ये विशेषतः अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, प्रगत उत्पादन, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या क्षेत्रांचा समावेश होता. त्यांनी 'भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारा'बाबतही विचार-विनिमय केला आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याच्या तसेच स्पेनसोबत भारताचा व्यावसायिक सहभाग वाढवण्याच्या मार्गांचा शोध घेतला. नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि व्यावसायिक विश्वास दृढ करण्यासाठी 'फास्ट ट्रॅक यंत्रणे'चा पूर्ण वापर करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली; तसेच, या वर्षाच्या उत्तरार्धात 'भारत-स्पेन संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगा'चे पुढील सत्र आयोजित करण्यास उत्सुकता व्यक्त केली.
मंत्र्यांनी स्पेनचे उद्योग आणि पर्यटन मंत्री जॉर्डी हेरेउ बोहेर यांचीही भेट घेतली. औद्योगिक सहकार्य वाढवणे, शाश्वत उत्पादन प्रक्रियेला चालना देणे, तंत्रज्ञानविषयक भागीदारीला पाठिंबा देणे आणि स्वच्छ ऊर्जा, गतिशीलता, प्रगत उत्पादन आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य वृद्धिंगत करणे यावर या चर्चेत प्रामुख्याने भर देण्यात आला. उभय बाजूंनी वाहन उद्योग, रेल्वे आणि स्मार्ट पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांत सहकार्य विस्तारण्याबाबतही चर्चा केली. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत औद्योगिक सहकार्याचे एक प्रमुख उदाहरण म्हणून त्यांनी 'सी-295' या कार्यक्रमाचे स्वागत केले. पर्यटन या क्षेत्राला दोन्ही देशांच्या दृष्टीने सामायिक प्राधान्य असल्याचे मंत्र्यांनी अधोरेखित केले. वर्ष 2026 हे 'भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष' म्हणून साजरे केले जाणार आहे. हे वर्ष दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था आणि जनतेला अधिक जवळ आणणाऱ्या भागीदारीचे प्रतीक आहे, असे यावेळी नमूद केले. उद्योग-ते-उद्योग संबंध बळकट करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा दोन्ही बाजूंनी पुनरुच्चार केला.
या भेटीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'भारत-स्पेन बिझनेस फोरम' हा आहे. त्याचे आयोजन फिक्की म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ स्पेन, स्पॅनिश कॉन्फेडरेशन ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन्स आणि आयसीईएक्स स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांनी संयुक्तपणे केले. आर्थिक सहकार्याच्या नवीन संधी शोधण्यासाठी या फोरमने दोन्ही देशांतील वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि व्यावसायिक प्रतिनिधींना एका व्यासपीठावर आणले.
या फोरमची सुरुवात चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ स्पेनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इनमाकुलॅदा रिएरा; ‘सीईओई’ च्या आंतरराष्ट्रीय संबंध समितीच्या अध्यक्षा मार्टा ब्लँको; फिक्कीचे अध्यक्ष अनंत गोयंका; सीआयआय म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष आर. मुकुंदन, स्पेन आणि अँडोरा येथील भारताचे राजदूत जयंत एन. खोब्रागडे यांच्या स्वागतपर भाषणांनी झाली.
मुख्य सत्रामध्ये स्पेन सरकारच्या उद्योग विभागाचे राज्य सचिव . जॉर्डी गार्सिया ब्रुस्टेंगा आणि पीयूष गोयल यांची भाषणे झाली. आपल्या भाषणादरम्यान आणि स्पेनमधील प्रमुख उद्योग प्रतिनिधी तसेच व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधताना, मंत्री पीयूष गोयल यांनी जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय, भारताची मजबूत आर्थिक वाढ, पुरोगामी सुधारणा आणि गुंतवणुकीच्या अफाट संधी यांवर प्रकाश टाकला. त्यांनी स्पॅनिश कंपन्यांना भारतात आपला विस्तार करण्याचे आणि उत्पादन, पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, प्रगत उत्पादन, डिजिटल तंत्रज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था आणि नवोपक्रम यांसारख्या क्षेत्रांतील भारताच्या विकासगाथेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. मुख्य भाषणांनंतर प्रश्नोत्तरांचे सत्र आणि नेटवर्किंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. यामुळे दोन्ही देशांतील व्यावसायिक नेत्यांना व्यापारी भागीदारीचा विस्तार आणि गुंतवणुकीच्या संधींबाबत विचार-विनिमय करण्याची संधी मिळाली.
यावेळी पीयूष गोयल यांनी स्पेनची व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन संस्था असलेल्या 'ICEX España Exportación e Inversiones' च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. या चर्चेत द्विपक्षीय गुंतवणुकीचा ओघ वाढवणे, व्यावसायिक संबंध सुलभ करणे आणि भारताच्या विकासगाथेत स्पॅनिश कंपन्यांचा सहभाग वाढवणे या उपाययोजनांवर भर दिला. गुंतवणूक भागीदारीला चालना देणे, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणि दोन्ही देशांतील व्यवसायांना पाठिंबा देणे या मुद्द्यांवर या चर्चा केंद्रित होत्या.
दिवसभराच्या कार्यक्रमाच्या शेवटी, मंत्री पीयूष गोयल यांनी फिक्कीच्या नेतृत्वाखालील भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाच्या सदस्यांशी संवाद साधला. या आढावा सत्रादरम्यान, त्यांनी उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी भेटीदरम्यान ओळखल्या गेलेल्या संधींबाबत चर्चा केली आणि आगामी काळात स्पेनसोबत अधिक भारतीय गुंतवणूक तसेच व्यावसायिक भागीदारी वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.
व्यापार, गुंतवणूक, औद्योगिक सहकार्य, नवोपक्रम आणि परस्पर जनसंपर्क यांद्वारे आपली धोरणात्मक आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या भारत आणि स्पेनच्या सामायिक वचनबद्धतेवर या भेटीमुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. दोन्ही देशांमधील दृढ राजकीय सामंजस्याच्या आधारे, या भेटीचे परिणाम द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवण्यास तसेच व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी निर्माण करण्यास हातभार लावतील, असा विश्वास उभय बाजूंनी व्यक्त केला.
***
AmbadasYadav / SuvarnaBedekar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284393)
आगंतुक पटल : 6