उपराष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रीय छात्र सेना आणि सैनिक शाळांबाबत संरक्षण मंत्रालयाने उपराष्ट्रपतींना दिली माहिती
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2026 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2026
उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांना आज नवी दिल्लीत उपराष्ट्रपती भवन इथे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय छात्र सेना आणि सैनिक शाळांबाबत सविस्तर माहिती दिली.
या सादरीकरणात सुमारे 20 लाख सदस्यसंख्या असलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वाढीचा आढावा, तिच्या प्रशिक्षण आणि राष्ट्र उभारणीसंबंधी उपक्रमांची माहिती तसेच सैनिक शाळांची कार्यपद्धती आणि विस्तार यांचा समावेश होता. देशभरात सैनिक शाळांचे जाळे अधिक बळकट करण्यासाठीची रूपरेषाही यावेळी मांडण्यात आली.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या राष्ट्रनिर्माणातल्या योगदानाचे कौतुक करताना उपराष्ट्रपतींनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ शिबिरांना ‘राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठीचे उत्कृष्ट उपक्रम’ असे संबोधले. तसेच ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ यांसारख्या समुदाय सेवा उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आणि राष्ट्रीय छात्र सेना माजी विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेचे स्वागत केले.राष्ट्रीय छात्र सेना अधिक सक्षम करणे ही संपूर्ण देशाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करताना उपराष्ट्रपतींनी पायाभूत सुविधांचा विकास, जमीन व प्रशिक्षण सुविधांबाबत राज्य सरकारांशी समन्वय वाढवणे यावर भर दिला. राज्यांशी संवाद साधण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सैनिक शाळांच्या कार्यप्रणाली आणि विस्ताराबाबतही त्यांना माहिती देण्यात आली. यावेळी विद्यमान प्रारुप तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून सुरू असलेल्या शाळांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये वाढत्या मागणीचा विचार करून प्रत्येक राज्यात तीन ते पाच सैनिकी शाळा असाव्यात, अशी सूचना उपराष्ट्रपतींनी केली. तसेच विद्यमान सैनिकी शाळांची प्रवेश क्षमता वाढवण्याची शक्यता पडताळून पहावी असेही ते म्हणाले.
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284138)
आगंतुक पटल : 15