कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संरक्षणाचा महासंकल्प : वृक्ष मित्रांच्या लोकचळवळीच्या माध्यमातून हरित भारताचा नवा अध्याय
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2026 7:33PM by PIB Mumbai
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पर्यावरण संरक्षणाला लोकचळवळीचे रूप देण्याचा एक महासंकल्प आज व्यक्त केला. नवी दिल्ली इथल्या पुसा संकुलात पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रम आणि वृक्ष मित्र संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांनी हा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातून जवळपास 17,000 वृक्ष मित्र जोडले गेले आहेत. या सर्वांनी लोकसहभागाच्या माध्यमातून वृक्ष, जल, जमीन, ऊर्जा संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैलीची मिलाफ साधत पृथ्वी वाचवण्याचा सामूहिक संदेश दिला.

यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वृक्ष मित्रांकडून मिळालेल्या सूचना आणि संवादाच्या आधारे पर्यावरण संरक्षणाला एका ठोस लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी सुस्पष्ट भूमिका असलेला एक मार्गदर्शक आराखडा सर्वांसमोर मांडला. वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, मुलांचा जन्म आणि आई वडिलांच्या अनमोल स्मृती जपण्याच्या निमित्ताने होणाऱ्या कौटुंबिक प्रसंगांच्या वेळी प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून त्याचे रूपांतर वृक्षोत्सवात करावे असे त्यांनी सुचवले. यामुळे हळूहळू ही परंपरा प्रत्येक घराची सवय बनेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक वृक्ष मित्राने वर्षाला किमान एक झाड लावावे आणि या मोहिमेत किमान पाच नवीन लोकांना जोडून घेण्याचा संकल्प करावा असे त्यांनी सांगितले. या सगळ्यांनी अशा उपक्रमांना आपल्या समाज माध्यमांवरील संदेशाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवावे, यामुळे 12 ऑगस्ट रोजी साजऱ्या केल्या जाणार असलेल्या हरियाली अमावस्येपर्यंत एक भक्कम जाळे तयार होईल असे त्यांनी सुचवले.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या संबोधनाच्या सुरुवातीलाच पर्यावरणीय संकटाचे गंभीर्य मांडले . हे संकट म्हणजे केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून मानवी अस्तित्वावरचे संकट आहे, याची जाणीव त्यांनी सर्वाना करून दिली. समुद्राची वाढती पाणी पातळी, वाढती उष्णता, प्रदूषित हवा, प्रदुषित पाणी आणि वेगाने लोप पावत असलेली जैवविविधता म्हणजे भावी पिढ्यांच्या जीवनासमोरचा थेट धोका आहे असे ते म्हणाले. जगभरातील घडामोडी आणि विज्ञाननिष्ठ तथ्य पुराव्यांचा संदर्भही त्यांनी यानिमित्ताने दिला. जर आताच ठोस पावले उचलली नाहीत, तर 2050 आणि त्यानंतरचे चित्र अत्यंत चिंताजनक असू शकते या धोक्याची जाणिव त्यांनी करून दिली.

***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2283953)
आगंतुक पटल : 10