संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विशाखापट्टणम इथे संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत, स्वदेशी बनावटीची विनाशिका युद्धनौका, आयएनएस महेंद्रगिरी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल


युद्धनौकेचा 75 टक्के भाग स्वदेशी असून, अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली आणि विनाशिकेची वैशिष्ट्ये असलेली ही 17 ए फ्रिगेट श्रेणीतील सहावी युद्धनौका, हवाई, जमिनीवरचे आणि पाण्यातून होणाऱ्या हल्ल्यांपासून देशाचे संरक्षण करण्यास सक्षम

ही आघाडीची युद्धनौका, आत्मनिर्भर भारताचे आणखी एक प्रतीक आणि तंत्रज्ञान-अत्याधुनिक आणि युद्धसज्ज नौदलाच्या उभारणीसाठीच्या देशाच्या कटिबद्धतेचे मूर्तिमंत स्वरूप: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

“आयएनएस महेंद्रगिरी मुळे सागरावरची भारताची ताकद वाढेल आणि हिंद महासागरातील भारताचे अस्तित्व अधिक मजबूत होईल” -राजनाथ सिंह

प्रविष्टि तिथि: 11 JUL 2026 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जुलै 2026


आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम इथे, आज म्हणजेच 11 जुलै 2026 रोजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात, स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक नाशिका युद्धनौका, आयएनएस महेंद्रगिरी भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यात, समाविष्ट करण्यात आली. ही आघाडीची युद्धनौका, जहाजबांधणी क्षेत्रात भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे प्रतिबिंब असल्याचे संरक्षण मंत्री आपल्या भाषणात म्हणाले. अत्यंत अद्वितीय अशी संरचना क्षमता, निर्मितीमधील उत्कृष्टता आणि नौदल-उद्योग क्षेत्रातील समन्वय यात झालेली वाढ, आणि, नियोजित वेळेत, अत्याधुनिक उत्पादने देण्याची या उद्योगांची वाढती कार्यक्षमता अशा सर्वांचे मूर्त प्रतिबिंब या युद्धनौकेतून होत आहे, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

‘आयएनएस महेंद्रगिरी ही भारताच्या 17 अ या विनाशिका फ्रिगेट श्रेणीतील, भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणारी, केवळ दीड वर्षातील सहावी युद्धनौका आहे. या श्रेणीतील पहिली युद्धनौका, आयएनएस निलगिरी जानेवारी 2025 मध्ये नौदलात दाखल झाली. त्यानंतर आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी ऑगस्ट 2025 मध्ये, आयएनएस तारागिरी एप्रिल 2026 मध्ये आणि आयएनएस दुनागिरी गेल्या महिन्यात नौदलात समाविष्ट करण्यात आली. भारतीय नौदलाच्या युद्धनौका संरचना विभागाने या जहाजाची संरचना केली असून, मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड इथे त्याची उभारणी करण्यात आली आहे. ही युद्धनौका, नौदलाच्या सर्व प्रकारच्या सागरी मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे. ताफ्याचे हवाई, जमिनीवरचे युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, सागरी प्रतिबंधात्मक कारवाया सागरी टेहळणी यांसह, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्यांचा समावेश आहे.

या युद्धनौकेच्या बनावटीत, 75 टक्के स्वदेशी साहित्य आणि उपकरणे वापरण्यात आले असून, तिचे वजन सुमारे 6,670 टन आणि 28 नौटिकल वेगाने जाण्याची क्षमता आहे. या युद्धनौकेत, सुपरसॉनिक म्हणजेच अतिवेगवान गतीने, पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची पृष्ठभागावरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे, पाणबुडीविरोधी युद्धक्षमता, तसेच बहुउद्देशीय हेलिकॉप्टर तैनात करण्याची सुविधा आहे. याशिवाय, अत्याधुनिक युद्धनौकेची वैशिष्ट्ये, आधुनिक सेन्सर्स, नेटवर्क-केंद्रित युद्धप्रणाली आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली, यांनी ही युद्धनौका सुसज्ज आहे.

“आयएनएस महेंद्रगिरी वरुन ब्राह्मोस हे जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्यास सक्षम क्षेपणास्त्रही चालवता येईल, याशिवाय, दूरवरच्या हवाई धोक्यांचा शोध घेऊन त्यांचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यास सक्षम अशा बहुउद्देशीय रडार आणि पृष्ठभागावरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची प्रणालीही या युद्धनौकेत आहे. या युद्धनौकेच्या शस्त्रसज्जतेमध्ये स्वदेशी रॉकेट लाँचर, टॉर्पेडो प्रक्षेपक, एकात्मिक पाणबुडीविरोधी संरक्षण प्रणाली, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि संरक्षण शस्त्र प्रणाली यांचाही समावेश आहे. "या सर्व क्षमतांमुळे ही युद्धनौका अत्यंत शक्तिशाली आणि सक्षम ठरली आहे," असे राजनाथ सिंह म्हणाले. ही सागरी युद्धनौका केवळ भारताच्या किनारपट्टीलगतच नव्हे, तर दूरवरच्या महासागरांमध्येही देशाच्या सागरी हितसंबंधांचे प्रभावीपणे संरक्षण करेल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

सागरी आणि वित्तीय सुरक्षा परस्परांशी निगडीत आहेत हे अधोरेखित करत, महासागरे केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने नाही, तर व्यापार, पुरवठा साखळ्या, ऊर्जा सुरक्षा, आणि वित्तीय वाढीसाठी देखील सागरी सुरक्षा महत्वाची असते, असे राजनाथ सिंह म्हणाले.  हिंद-प्रशांत क्षेत्राचे सामरिक महत्त्वही अधोरेखित करत, या संपूर्ण प्रदेशाची सुरक्षा आणि वृद्धीसाठी भारताची कटिबद्धता त्यांनी अधोरेखित केली.

पश्चिम आशियातील संघर्षाच्या काळात, भारतीय नौदलाच्या भूमिकेविषयी बोलतांना, संरक्षण मंत्री म्हणाले की, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा अंतर्गत भारतीय नौदलाने 9,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा अत्यावश्यक माल वाहून नेणाऱ्या 18 व्यापारी जहाजांना संरक्षण प्रदान केले. या प्रयत्नांमधून भारतीय नौदल केवळ लढाऊ दल म्हणूनच नव्हे, तर भारताच्या आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करणारा एक महत्त्वाचा संरक्षक म्हणूनही आपली भूमिका प्रभावीपणे बजावत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आयएनएस महेंद्रगिरी ही युद्धनौका भारताच्या एकूण सागरी धोरणाला आणखी बळकटी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही युद्धनौका भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील सामरिक क्षमता अधिक मजबूत करेल, भारताच्या सागरी क्षमतेचा विस्तार करेल आणि हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा वावर अधिक दृढ करेल, असे ते म्हणाले.

आयएनएस महेंद्रगिरी विषयी

भारताच्या पूर्व घाटावरुन नामकरण करण्यात आलेली, आयएनएस महेंद्रगिरी करण्यात आले असून, हे नाव सामर्थ्य, दृढता आणि अदम्य निर्धाराचे प्रतीक असून, तिचे बोधवाक्य सामर्थ्यवान, भव्य, अतुलनीय असे आहे. 200 हून अधिक भारतीय उद्योगांच्या, विशेषतः अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या, योगदानातून उभारण्यात आलेली ही युद्धनौका, भारताच्या वाढत्या संरक्षण उत्पादन क्षमतेचे प्रतीक आहे. ही युद्धनौका, भारताच्या  'महासागर' या धोरणाअंतर्गत भविष्यासाठी सज्ज भारतीय नौदल उभारण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देईल.

 

* * *

राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2283688) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu_Vw , Telugu , Malayalam