पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा न्यूझीलंडमधील उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी संवाद
Posted On:
11 JUL 2026 11:48AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज दोन्ही देशांतील निवडक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी संवाद साधला.
भारत आणि न्यूझीलंड हे देश सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य, विविधता आणि शाश्वत विकासाप्रती असलेली वचनबद्धता या सूत्रांनी परस्परांशी जोडलेले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. हेच घटक दोन्ही देशांमधील महत्त्वाकांक्षी आणि दूरगामी आर्थिक भागीदारीसाठी एक भक्कम पाया रचतात, असे ते म्हणाले. भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार एक ऐतिहासिक टप्पा असून, यामुळे द्विपक्षीय आर्थिक संबंधांना गती मिळेल, तसेच बाजारपेठेतील प्रवेश, गुंतवणूक, सेवा, तंत्रज्ञान आणि गुणवत्तेच्या देवाणघेवाणीसाठी नव्या संधी निर्माण होतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
भारताचा सतत वाढत असलेला आर्थिक विकास दर, तरुण व कुशल मनुष्यबळ, विस्तारणारा मध्यमवर्ग, डिजिटल क्रांती, अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारणीला दिलेली गती आणि सातत्यपूर्ण आर्थिक सुधारणा या सर्व बाबी न्यूझीलंडमधील कंपन्यांसाठी व्यापार, गुंतवणूक आणि नवसंशोधनाच्या अभूतपूर्व संधी उपलब्ध करून देत असल्याचे मोदी यांनी नमूद केले. राजकीय स्थैर्य आणि विकासाच्या शाश्वत वाटचालीमुळे भारताने जागतिक आर्थिक वृद्धीमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान देणारा देश म्हणून आपले स्थान निर्माण केल्याचे ते म्हणाले. पायाभूत सुविधांचा विकास, नागरी विमानचालन, लॉजिस्टिक्स, हरित ऊर्जा, शहरी गतिशीलता, जल आणि कचरा व्यवस्थापन आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्ये भारताचे भागीदार होण्याचे आमंत्रण पंतप्रधानांनी, न्यूझीलंडच्या गुंतवणूकदारांना आणि व्यावसायिक संस्थांना दिले. भारतातील गतिमान स्टार्टअप परिसंस्थेबद्दल बोलताना, त्यांनी नवसंशोधन, फिनटेक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांच्या खाजगी क्षेत्रांनी अधिक जवळून काम करण्याचे आवाहन केले. दुग्धव्यवसाय विज्ञान, फलोत्पादन आणि वनीकरण या क्षेत्रांमधील न्यूझीलंडचे नैपुण्य आणि भारताची अफाट ग्राहक बाजारपेठ, फूड पार्क्स व कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य हे सर्व एकत्र येऊन जागतिक अन्न मूल्य साखळी निर्माण केली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांतील व्यावसायिकांना आपली गुंतवणूक आणि व्यावसायिक भागीदारी वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले, जेणेकरून 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून तो 7 अब्ज न्यूझीलंड डॉलरवर (अंदाजे 35,000 कोटी रुपये) नेण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. भारत आणि न्यूझीलंडमधील आर्थिक भागीदारी ही सर्वसमावेशक व शाश्वत व्यापाराचा एक आदर्श वस्तुपाठ आणि नवसंशोधन व समृद्धीचे एक माध्यम बनू शकते, यावर त्यांनी विशेष भर दिला.
* * *
आशिष सांगळे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2283561)
अभ्यागत कक्ष : 51
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam