अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या वित्तीय गुप्तचर विभागाला अझरबैजानमधील बाकू इथे, प्रतिष्ठित बेस्ट एगमॉन्ट केस अवॉर्ड 2026 अंतर्गत उपविजेतेपदाचा बहुमान

प्रविष्टि तिथि: 10 JUL 2026 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2026

 

अझरबैजानमधील बाकू इथे पार पडलेल्या एगमॉन्ट समुहाच्या प्लेनरी अर्थात सर्वसाधारण सभेत भारताच्या वित्तीय गुप्तचर विभागाला (FIU-IND - Financial Intelligence Unit–India) प्रतिष्ठित बेस्ट एगमॉन्ट केस अवॉर्ड 2026 अंतर्गत उपविजेतेपद मिळाले. व्यापक स्तरावरील सायबर फसवणुकीशी संबंधित एका प्रकरणासाठी भारताच्या वित्तीय गुप्तचर विभागाला हा बहुमान लाभला आहे. विभागाचे संचालक अमित मोहन गोवील यांच्या बहुआयामी नेतृत्वात गुप्तचर विभागाने हा आणखी एक आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवला आहे.

बेस्ट एगमॉन्ट केस अवॉर्ड हा एगमॉन्ट समुहाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च बहुमानांपैकी एक मानला जातो. वित्तीय गुप्तचर क्षेत्र, आंतरराष्ट्रीय सहकार्यात केलेली उत्कृष्ट कामगिरी तसेच, पैशांचे बेकायदेशीर व्यवहार आणि दहशतवादी कारवायांना पुरवल्या जाणाऱ्या वित्तपुरवठ्याला आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, यासंदर्भातील उल्लेखनीय प्रकरणांकरता हा पुरस्कार दिला जातो. एगमॉन्ट समुहाच्या 182 सदस्य देशांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत आलेल्या प्रस्तावांमधून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या दोन प्रकरणांमध्ये भारताच्या वित्तीय गुप्तचर विभागाने हाताळलेल्या प्रकरणाचाही समावेश होता. त्यानंतर या प्रकरणाला उपविजेतेपदाचा मान जाहीर केला गेला.

भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून (I4C - Indian Cyber Crime Coordination Centre) एका व्यापक स्तरावरील सायबर फसवणुकीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर या प्रकरणाचा छडा लागला होता.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान एगमॉन्ट सिक्युअर वेबच्या (ESW) माध्यमातून लाभलेले आंतरराष्ट्रीय सहकार्यही अत्यंत मोलाचे ठरले होते. याअंतर्गत भारताच्या वित्तीय गुप्तचर विभागाने अनेक देशांच्या वित्तीय गुप्तचर विभागांसोबत वित्तीय माहितीची देवाणघेवाण केली. या माहितीच्या आधारे सीमेपलीकडून होत असलेल्या क्रिप्टोकरन्सी व्यवहारांचा छडा लावला गेला, आणि जागतिक स्तरावरील बेकादेशीर आर्थिक व्यवहारांचा माग काढण्यात यश आले. योग्य वेळेत झालेल्या माहितीच्या देवाणघेवाणीमुळे तपासाला मोठी बळकटी मिळाली, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय गुन्हेगारी रोखण्यासाठी जागतिक सहकार्याचे महत्वही अधोरेखित झाले.

भारताच्या वित्तीय गुप्तचर विभागाला मिळालेला हा आंतरराष्ट्रीय बहुमान, वित्तीय गुप्तचर क्षेत्रातील भारताच्या विस्तारत्या नेतृत्वाची प्रचिती देणारा ठरला आहे. यासोबतच प्रगत कार्यपद्धतींचे विश्लेषण, देशांतर्गत भक्कम समन्वय आणि आंतरराष्ट्रीय माहितीची प्रभावी देवाणघेवाण या माध्यमातून देशातील बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना प्रतिबंधक आणि दहशतवादाला मिळणाऱ्या आर्थिक बळाविरोधाच्या आराखड्याला अधिक बळकटी देण्याप्रती भारताच्या वित्तीय गुप्तचर विभागाची वचनबद्धताही या बहुमानाने अधोरेखित केली आहे.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2283508) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Gujarati , Tamil , Telugu