पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया आणि भारत मुख्य कार्यकारी अधिकारी मंच तसेच इकॉनॉमिक रोडमॅप बिझनेस या कार्यक्रमांना केले संबोधित

Posted On: 09 JUL 2026 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,9 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनीज यांनी 9 जुलै 2026 रोजी मेलबर्न इथे आयोजित ऑस्ट्रेलिया आणि भारत मुख्य कार्यकारी अधिकारी मंच (CEOs Forum) तसेच इकॉनॉमिक रोडमॅप बिझनेस या कार्यक्रमाला संयुक्तपणे संबोधित केले. भारत आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उद्योग व्यावसाय क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्त्वे, ऑस्ट्रेलियातील प्रमुख सुपरएन्युएशन फंडांचे (वृद्धी आणि निवृत्तीवेतन निधी) प्रतिनिधी, संस्थात्मक गुंतवणूकदार आणि ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या विद्यापीठांचे कुलगुरू या दोन्ही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाला केले. आपल्या संबोधनातून त्यांनी, भारताची भक्कम आर्थिक प्रगती, धोरणात्मक सुधारणा, डिजिटल परिवर्तन आणि नवोन्मेषाची विस्तारत असलेली परिसंस्था ऑस्ट्रेलियन भागीदारांसाठी उद्योग व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करत असल्याची बाब अधोरेखित केली. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थांमधील परस्पर पूरक घटकांचा उल्लेखही पंतप्रधानांनी कैला. या अनुषंगाने भारतातील उत्पादन, हरित ऊर्जा, अत्यावश्यक खनिजे, खाणकाम, पायाभूत सुविधा, शहर विकास, विमान वाहतूक, रसद पुरवठा व्यवस्थापन (लॉजिस्टिक्स), प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, वित्तीय तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या अफाट संधींही त्यांनी अधोरेखित केल्या. भारतातील व्याप्ती आणि ऑस्ट्रेलियाचे कौशल्य यामुळे दोन्ही देशांसाठी लाभदायक स्थिती असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. 

ऑस्ट्रेलियातील गुंतवणूकदारांनी भारतातील दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधींचा लाभ घ्यावा असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या भारतातील वाढत्या अस्तित्वाचे त्यांनी स्वागतही केले. उच्च शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमधील दृढ सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील युवा वर्ग भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होता येईल, यासोबतच त्यांना जागतिक संधींचा लाभ घेण्यातही मोठी मदत होईल असे ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या बैठकीनंतर, दोन्ही देशांमधील 200 पेक्षा जास्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग व्यावसाय क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तिमत्वांचा व्यापक सहभाग असलेल्या इकॉनॉमिक रोडमॅप बिझनेस या कार्यक्रमालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नैसर्गिक समन्वय असल्याची बाब त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केली. दोन्ही देशांमधील परस्पर सामायिक लोकशाही मूल्ये, भारत - प्रशांत क्षेत्रासाठीचा एकसमान दृष्टिकोन, दोन्ही देशांतील नागरिकांमधील सौहार्दाचे संबंध आणि दृढ राजकीय सामंजस्य यांमुळे दोन्ही देशांमधील उद्योक - व्यावसाय विषयक भागीदारीचा विस्तार करण्यासाठी तसेच एकत्रितपणे प्रगती आणि समृद्धता साध्य करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशांमध्ये 2022 मध्ये झालेल्या आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (ECTA) आधारित व्यापार आणि गुंतवणुक विषयक संबंधांच्या प्रगतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच, परस्परांमधील उद्योग व्यावसाय विषयक संबंधांना नवी उंची गाठून देण्यासाठी प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराची (CECA) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उद्योग व्यावसाय क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तिमत्वांनी दोन्ही देशांमधील परस्पर पूरक क्षमतांचा पूरेपूर उपोयग करून घ्यावा आणि त्या माध्यमातून विशेषतः दुर्मिळ खनिजे, लिथियम, बॅटऱ्या, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संरक्षण विषयक पुरवठा साखळी या क्षेत्रांशी संबंधित जागतिक पातळीवरील उपाययोजना विकसित कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. दोन्ही देशांमधील उद्योग व्यावसाय विषयक द्विपक्षीय संबंधांना नव्या पातळीवर नेण्यासाठी भारतातील राज्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रांतांनी आपापल्या प्रमुख क्षमतांच्या आधारावर बहुआयामी आर्थिक भागीदारी स्थापित करणे गरजेचे असल्याचा सल्लाही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून दिला. या दोन्ही मंचांच्या निमित्ताने झालेल्या चर्चेतून सकारात्मक वातावरण निर्माण झाले, तसेच अनेक अर्थपूर्ण कल्पनाही समोर आल्याचा दखलपूर्ण उल्लेखही पंतप्रधानांनी केला. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील आर्थिक संबंध सातत्याने वृद्धिंगत होत राहतील असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.


नेहा कुलकर्णी/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2283099) अभ्यागत कक्ष : 48