ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
ग्राहक व्यवहार विभागाकडून उच्च-क्षमतेच्या वजन मापक यंत्रांच्या पडताळणीसाठी वैध मापनशास्त्र नियमांमध्ये सुधारणा
सुधारणेमुळे अनुपालनाचा बोजा कमी होणार, पडताळणी खर्चात कपात आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2026 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,6 जुलै 2026
व्यवसाय सुलभतेच्या एका महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत, ग्राहक व्यवहार विभागाने वैध मापनशास्त्र (सामान्य) नियम, 2011 मध्ये सुधारणा केली आहे. या अंतर्गत वैज्ञानिक आणि पुनरावृत्ती-आधारित पडताळणी पद्धत सुरू करून, उच्च-क्षमतेच्या वजन मापक यंत्रांच्या पडताळणीसाठी लागणाऱ्या प्रमाणित वजनांची आवश्यकता लक्षणीयरित्या कमी करण्यात आली आहे. पूर्वीच्या तरतुदींमधील या संदर्भातल्या आवश्यकतेमुळे अनेकदा उद्योगांना आणि वेईंग ब्रिज (वाहनांमधील मालासह वजन मोजणारा काटा) चालकांना मोठ्या प्रमाणावर लॉजिस्टिक आव्हाने, वाहतूक खर्च आणि परिचालनात्मक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
सुधारित तरतुदींनुसार, ही आवश्यकता आता तर्कसंगत करण्यात आली आहे. पुनरावृत्ती चाचणीच्या यशस्वी वापरावर आधारित, स्थिर भाराचा वापर करण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या प्रमाणित वजनांचे अनिवार्य प्रमाण कमाल क्षमतेच्या 50 टक्क्यांवरून कमी करून ते कमाल क्षमतेच्या एक पंचमांश म्हणजे 20 टक्के ठेवण्यात आले आहे आणि हे करताना पडताळणीची अचूकता आणि विश्वासार्हता यांचे विहित निकष देखील राखण्यात आले आहेत.
सुधारणेचे मुख्य फायदे
उद्योग, गोदामे , लॉजिस्टिक्स ऑपरेटर आणि वेईंग ब्रिज मालकांवरील अनुपालनाचा बोजा लक्षणीयरित्या कमी होईल.
प्रमाणित वजनांची मोठ्या प्रमाणावर ने-आण करण्यासाठी लागणारा वाहतूक आणि हाताळणीचा खर्च कमी होईल.
उच्च-क्षमतेच्या वजन मापक यंत्रांची पडताळणी जलद गतीने होईल, ज्यामुळे कामकाजातील व्यत्ययाचा काळ कमी होईल.
अचूकता किंवा ग्राहक संरक्षणाशी तडजोड न करता, वैध मापनशास्त्रविषयक पडताळणीच्या कामांची कार्यक्षमता सुधारेल.
सुलभ आणि विज्ञान-आधारित नियामक आवश्यकतांद्वारे व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन मिळेल.
सरकारी प्राधिकरणांद्वारे पडताळणी संसाधनांचा अधिक चांगला वापर करता येईल.
सुधारणेचा वैज्ञानिक आधार
ही सुधारणा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेल्या मापनशास्त्राच्या सिद्धांतांवर आधारित आहे, ज्यामध्ये पुनरावृत्ती चाचणी (रिपिटेबिलिटी टेस्ट) वजन मापक यंत्राची सुसंगतता आणि स्थिरता स्थापित करते. यामुळे प्रमाणित वजनांचे प्रमाण कमी करूनही विश्वसनीय पडताळणी करणे शक्य होते.
वस्तुनिष्ठ सुधारणांद्वारे वैध मापनशास्त्र बळकट करणे
ही सुधारणा वस्तुनिष्ठ नियामक सुधारणांद्वारे वैध मापनशास्त्र चौकटीचे आधुनिकीकरण करण्याच्या विभागाच्या निरंतर वचनबद्धतेला अधोरेखित करते आणि भक्कम ग्राहक संरक्षणासह व्यापारातील सुलभतेचा समतोल साधते.
हा विभाग अनुपालन सुलभ करण्यासाठी, नियामक बोजा कमी करण्यासाठी, पडताळणी परिसंस्था बळकट करण्यासाठी आणि वैध मापनशास्त्रामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने सुधारणांची मालिका राबवत आहे.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2281809)
आगंतुक पटल : 14